Tuesday, March 7, 2017

किरा- चेतनेचे स्फुल्लिंग

एका स्त्रीचं आंतरिक भान किती परिपक्व, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती देणारी एक अप्रतिम व्यक्तिरेखा म्हणजे ’किरा आर्गुनोव्हा’. आयन रॅंड या गाजलेल्या लेखिकेच्या ’वि द लिव्हींग’ या झपाटून टाकणार्‍या पुस्तकाची किरा ही नायिका. आयन रॅंड ही फक्त लेखिका नाही तर एक विचारधारा मानली जाते. रशियातल्या समूहवादाला झुगारून व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणार्‍या अमेरिकेत ती स्थायिक झाली. तिथे तिने निर्माण केलेल्या व्यक्तिवादी, वास्तववादी साहित्यकृतींपैकी एक म्हणजे ’’वि द लिव्हींग’. लेखिकेचे वैचारिक प्रतिबिंब म्हणजे ’किरा’. खरं तर १९३६ मध्ये म्हणजे जवळपास ८० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली, बरीचशी आत्मचरित्रात्मक किंवा स्वानुभवावर आधारित मानली गेलेली ही कादंबरी आहे. यातली ’चेतनेचे स्फुल्लिंग’ असलेली, व्यक्तिवादाचं तत्त्वज्ञान ठामपणे मांडणारी  किरा मात्र मला कालातीत वाटते. किराच्या संकल्पना निश्चित आहेत. ’जगणं म्हणजे काय? जगण्यातलं सौंदर्य म्हणजे काय?’ हे तिला नेमकं माहीत आहे. आजच्या स्त्रीला सुद्धा अप्राप्य वाटेल असा नि:शंकपणा, ठामपणा किरामध्ये आहे.  

तसं पाहिलं तर किरा म्हणजे कोणी असामान्य स्त्री नव्हे. जगाचा किंवा एखाद्या देशाचा इतिहास ढवळून किंवा उजळून टाकावा असं तिने काहीही केलं नाही. परंतु हेच तिचं वेगळेपण आहे. अवघं जग बदलून टाकण्याची, प्रत्यक्षात न पेलणारी, भव्यदिव्य स्वप्नं म्हणजे तिला वेडगळ कवीकल्पना वाटते. स्वत:च्या प्रतिभेच्या आणि बुद्धीमत्तेच्या बळावर स्वतःचं चिमुकलं पण परिपूर्ण असं जग निर्माण करण्य़ाची क्षमता दर्शनी नाजूक असलेल्या किराच्या मनगटात आहे. तिच्या भोवतीचं लहानसं जग बदलण्याची तिची स्वप्न वास्तववादी आहेत. त्यासाठी झोकून देण्याची तिची तयारी आहे. तिला जे मिळवायचय ते तिच्या क्षमतेवर. किरा मला भावते ती यामुळेच.

बोल्शेविक क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकारचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. लेनिनच्या मृत्युनंतर प्रतिस्पर्ध्यांना नामशेष करून स्टॅलिनने सत्ता स्वत:कडे घेतली. गुप्तहेर संस्थांमार्फत नागरिकांवर वचक ठेवून त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊन पहिल्या महायुद्धात रशियाबरोबरच जिंकलेल्या लहान देशांवर तो निरंकुश सत्ता चालवत होता. या कादंबरीत पडद्यामागचा सूत्रधार तोच आहे असे दिसत असले तरी यात रँडने साकारलेली किरा ही एकूणच ’सामर्थ्याच्या गैरवापराला नकार देणार्‍या, स्वत्व शाबूत असलेल्या मानवी मनोवृत्तीची’ प्रतिनिधी आहे. हे राजकीय अराजक माजलं तेव्हा आयन रॅंडने नुकतचं तारुण्यात पदार्पण केलं होतं. साम्यवादाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणारा समाज पाहिला, समाजल्याण आणि मानवतावादाच्या नावाखाली मूलभूत हक्कांची गळचेपी होताना पाहिली, त्या धगीत तीही होरपळून निघाली. या सगळ्य़ा भावभावनांचे पडसाद किराच्या व्यक्तिरेखेत उमटले आहेत. १९२२-२९ या काळात घडलेली ही कादंबरी केवळ अमुक एका काळातले आक्रंदन मांडत नाही, वेदनेचे भांडवल करत नाही. उलट वेदना महत्वाची नसून माणसाने त्याविरूद्ध दिलेला लढा, माणसाची विजिगीषु वृत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे, ते मानवी अस्तित्वाचं वैशिष्ट्य आहे हेच सार्वकालिक तत्वज्ञान आयन रँडने किराच्या भूमिकेतून मांडलं आहे.

अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवर आपल्या आकांक्षा जपत राहणारी ’किरा’ हे या कादंबरीतलं एकमेव, खर्‍या अर्थाने जिवंत पात्र. कादंबरी सुरू होते तेव्हा राज्यक्रांती दरम्यान विस्थापित झालेलं तिचं कुटुंब पेट्रोग्राडला (सत्तांतरानंतर ’लेनिनग्राड’) नुकतच परत आलेलं असतं. लहानपणापासून निसर्गात भटकणं, वाहत्या नदीत तराफ्यांवर पाय रोवून सुसाट रोरावत जाणं या सगळ्यातून किराला एक गोष्ट गवसलेली असते ती म्हणजे ’एकटेपणातला आनंद’. याचा अर्थ ती माणूसघाणी असते असा नव्हे. नातलगांशी तिचे सौहार्दाचे संबंध असतात. क्रांतीपूर्वी सुखवस्तू आयुष्य उपभोगू शकलेल्या नागरिकांची आता बूर्झ्वा म्हणून हेटाळणी होत असते. आता साम्यवादी सत्तेच्या टाचेखाली आलेल्या या नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी झगडावे लागत असताना १८ वर्षांची किरा मात्र अभियंता होऊन बांधकामतज्ज्ञ होण्य़ाचे ध्येय बाळगून असते. त्यावेळॆस एखाद्या सभ्य सुसंस्कृत मुलीने हे क्षेत्र निवडणे म्हणजे गहजबच. "स्त्री म्हणून स्वत:च्या अंगभूत गुणांचा समाजासाठी उपयोग करून द्यायचा सोडून, तू हे भलतच, पुरूषी क्षेत्र का निवडते आहेस," असं व्हिक्टर हा तिचा साम्यवादी मावसभाऊ तिला जरबेने विचारतो. "आपल्या थोर श्रमिक देशाची सेवा करता यावी म्हणूनच तंत्रक्षेत्र निवडलस ना तू?" हा प्रश्न तंत्रशाळेत नव्याने भेटलेली साम्यवादी सहाध्यायी सोनिया देखील तिला विचारते. दोघांनाही ती शांतपणे एकच उत्तर देते." फक्त स्वत:ची आवड, पॅशन म्हणून हे शिकते आहे. बस्स. लाल म्हणजेच साम्यवादी सरकारसाठी किंवा समाजासाठी नव्हे." आजही कित्येक जणांना आपल्या आयुष्याबद्दल इतक्या नेमकेपणाने निर्णय़ घेता येत नाहीत. 

लिपस्टीक सारख्या प्रसाधनाकडे सुद्धा ’व्यक्तीवादी वस्तू’ म्हणून पाहणार्‍या या देशात, सामाजिक बांधिलकी, संपत्तीचं समान वाटप अशा देखण्य़ा शब्दांमागचा पोकळपणा किरा पुरेपूर ओळखून असते. जेव्हा तिचा तंत्रशाळेतला नितळ मनाचा पण कट्टर साम्यवादी मित्र आंद्रेई टॅगानोव्ह तिला विचारतो, "साम्यवादात चूक काय आहे? माणसाने माणसासाठी जगावं याहून जगण्याचं उत्तम ध्येय काय असू शकतं?" त्यावर किरा म्हणते, "हे म्हणणं सोपं आहे पण जे लोक हुशार, प्रतिभावंत, सर्वोत्तम आहेत त्यांना समान दर्जाच्या नावाखाली कर्तृत्वशून्य, लायक नसलेल्या लोकांच्या पातळीला का ओढून आणायचं? लाखो निस्तेज, खुरडणार्‍या आत्म्यांसाठी या उत्कट, उमद्या, जीवनाचा अर्थ समजलेल्या, खर्‍या अर्थाने माणूस असलेल्या लोकांचा बळी का द्यायचा? " तिचे हे अगदी विरूद्ध पण स्पष्ट विचार ऐकता ऐकता या प्रकाशशलाकेत आंद्रेईसह आपणही गुंतत जातो. किराने मांडलेलं हे तथ्य वास्तवात येऊन त्याची परिणिती १९९० साली रशियाची शकले होण्यात झाली हे आपण जाणतोच. आदर्शवाद हा दिसायला सुंदर असला तरी व्यवहार्य असतोच असे नाही. किराचा ’वास्तववाद’ हा मला तिच्या व्यक्तिमत्वाचा एक विलोभनीय पैलू वाटतो. साम्यवादाला कडाडून विरोध करणारी, ’हे तत्त्व राबवणारी माणसे नव्हे तर हा विचारच मुळात चूक आहे’ हे ठणकावून सांगणारी किरा निव्वळ वैचारिक मतभेद आहेत म्हणून आंद्रेईशी मैत्री मात्र तोडत नाही. तिला त्यापलीकडचा माणूस दिसतो. ती तो निखळ मनाने जपते. मला वाटतं ’माणसाने माणसासाठी कसं जगावं’ हे खरं तर किराला अधिक नीट उमगलेलं आहे. साहजिकच या पारदर्शी व्यक्तिमत्वाबद्दलचे आंद्रेईचे आकर्षण, तो साम्यवादी संघटनेत वरिष्ठ पदावर पोचल्यानंतरही वाढतच राहते.

परंतु किरा गुंतली असते लिओ केव्हालेन्स्कीमध्ये. साम्यवादयांच्या हेरगिरीला, कारवायांना न जुमानता तिला आसुसून भेटायला येणारा फरार प्रतिक्रांतिवादी, देखणा लिओ! सुरूवातीला एकमेकांच्या साथीने सगळ्य़ा अडचणींवर मात करू म्हणत एकमेकात रममाण झालेले हे दोन आशावादी जीव सगळीकडून होणार्‍या सरकारी मुस्कटदाबीमुळे घुसमटू लागतात. किरा मात्र त्यांची स्वप्नं उराशी धरून लिओला धीर देत राहते. गरीबी, अन्याय, आजार आणि अपमान याला कणखरपणे तोंड देणारी किरा आपल्याला चकित करते तशीच लिओलाही. लिओ म्हणतो, "माझी आता एकच आस आहे, ती म्हणजे आयुष्यात एखाद्या गोष्टीची तीव्र आस कशी बाळगावी असावी ते मला तुझ्याकडून शिकायचे आहे." साम्यवादी विचारसरणीच्या कोणत्याही संघटनेचं सदस्यत्व घेतलं तर सरकारकडून चार सोयी मिळायच्या, रेशनकार्डावर अन्न थोडं अधिक मिळायचं, घरभाडं कमी लागायचं परंतु आपल्या विचारांशी, मूल्यांशी प्रतारणा करण्य़ाच्या बदल्यात मिळणार्‍या या सवलती लिओ आणि किरा नाकारतात. दोघांना आपली जुजबी नोकरीही गमवावी लागते. बूर्झ्वा असल्याचा शिक्का कपाळी असल्याने नवी नोकरी मिळणॆ अशक्य होते. कसंबसं दोघं शिकत राहतात पण लिओ आता खचू लागतो. ’आपण पेकाटात लाथ मारू हाकलून दिलेली दोन कुत्री आहोत’ असं तो उद्वेगाने म्हणू लागतो. एवढं होऊनही त्यांचे परस्परांवरील प्रेम सुतराम कमी होत नाही.

किरा आणि आंद्रेईची तंत्रशाळेत अधूनमधून भेट होत राहते, पण इतकी उपासमार होत असतानाही स्वाभिमानी किरा कधीही आंद्रेई जवळ परिस्थितीचे रडगाणॆ गात नाही. त्यालाच ते जाणवते. तिच्या अंतर्मनातलं सौंदर्य तिच्या चेहर्‍यावर झळकत राहतं. तिच्या देहबोलीतून व्यक्त होत राहतं. त्याची भूल लिओहून अधिक आंद्रेईला पडते. आणि आपल्यालाही. मजुरीची कष्टाची कामे करत कदान्न खात राहिल्याने प्रकृती ढासळलेल्या लिओमध्ये क्षयाची लक्षणे दिसू लागतात. त्याला हवापालटासाठी पाठवता यावं म्हणून किरा जीवाचं रान करते. ’लाखो कामगार क्रांतिकाळात गेले, एक बूर्झ्वा मेला तर काय हरकत आहे’ अशा संवेदनाहीन शब्दात तिला आर्थिक आणि सरकारी मदतीची दारे बंद केली जातात. शेवटी लिओला जगवण्य़ासाठी तिला एकच मार्ग दिसतो- आंद्रेई. त्याबदल्यात ती त्याला शरीराबरोबरच प्रेमाची खोटी कबुली देते. तिच्या आणि लिओच्या नात्याची कल्पना नसलेला, किरावर निरातिशय पण अव्यक्त प्रेम करणारा आंद्रेई तिच्यावर सर्वस्व उधळून देतो. किरा प्रेम हे मूल्य जीवापाड जपणारी आहे त्यामुळेच तिच्या प्रेमासाठी ती ’स्व-पलीकडे’ पाहू शकली असावी. अनाथालयाची कळा आलेल्या त्या शहरात लिओ बरा होऊन किरासाठी परत येतो पण फक्त शरीराने. मनाने तो जणू मृतप्राय अवस्थेत असतो. 

तडफडत किंवा साम्यवाद्यांना शरण जाऊन रोज तिळ तिळ मरण्य़ापेक्षा काळाबाजार करून उरलेले ४ दिवस चैनीत जगणे परवडले या निष्कर्षाला पोचलेला लिओ विवेक बाजूला ठेवतो. किराच्या विरोधाला न जुमानता वाममार्गाला लागतो. त्याला आतून जगावसं वाटावं, आपल्या जबाबदारीपोटी तरी त्याची नैतिकता जागी राहावी म्हणून किरा त्याला लग्नाची गळ घालू लागते तेव्हा आधीच पूर्णत: खचलेला लिओ तिला म्हणतो, "तू जर मला थांबवू शकत नाहीयेस तर ’तो लाल कारकुनाने खरडलेला एक कागदाचा तुकडा’ मला कसा थांबवू शकेल?" इथे मला किराचा विस्मय वाटतो. लिओने लग्नाला होकार द्यावा म्हणून ती त्याच्यावर भावनिक दबाब टाकू शकली असती, स्त्रीसुलभ आक्रोश करू शकली असती पण किरा असामान्य आहे. कागदोपत्री नात्यापेक्षा मनाचे भावबंध तिच्यासाठी अधिक महत्वाचे आहेत, तितकेच लिओचे व्यक्तिस्वातंत्र्यदेखील.

साम्यवादी संघटनेचा वरिष्ठ अधिकारी या नात्याने लिओवर कारवाई करण्यासाठी आंद्रेईला लिओच्या घराच्या झडतीचा परवाना मिळतो आणि तिथल्या कपाटात त्याला त्याने किराला भेट दिलेले पोशाख, वस्तू दिसतात. सुरा खुपसल्यासारखं ते सत्य काळजात रूतलेला आंद्रेई मनाने कोलमडतो. एव्हाना तथाकथित साम्यवादाचा खोटा जयजयकार करणार्‍या सहकार्‍यांची वैचरिक अधोगती पाहणार्‍या आंद्रेईला साम्यवादाचा फोलपणा जाणवू लागलेला असतो. किरा विपरीत स्थितीतही साम्यवादाला शरण जात नाही हे पाहताना ’माणूस कसा असू शकतो, कसा असायला हवा हे मी तुझ्यात पाहतो’ हे तो तिला सांगतो. तिने आपल्याला वापरलं ते स्वार्थासाठी नाही तर केवळ लिओवरच्या तिच्या निस्सीम प्रेमाखातर हे त्याला कळतं तेव्हा किरा त्याच्या नजरेला अधिकच उंच भासू लागते. ’समाजहिताच्या नावाखाली वैयक्तिक भावनांचा चुराडा करण्य़ाचा हक्क साम्यवाद्यांना नाही’ हे रोखठोकपणे सांगणार्‍या किराने आंद्रेईच्याच नव्हे तर समूहवादी मानसिकतेच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे. किरा दुसर्‍या कुणाची असणं हे पहाडासारखं दु:ख अंगावर कोसळतं तेव्हा माणसाच्या वैयक्तिक भावना त्याचं विश्व कसं आणि किती व्यापून टाकतात हे त्याला लख्ख उमगतं. साम्यवादाने नाकारलेलं माणसाचं खासगीपण हाच त्याच्या जगण्याचा आधार आणि उर्जा असते हे सत्य मान्य करून आंद्रेई आपलं आयुष्य संपवतो. 

आपल्या पाठीमागे किरा आणि आंद्रेई यांच्यात निर्माण झालेल्या संबंधांबद्द्ल कळल्यावर किराने आपला विश्वासघात केला असं समजुन लिओ व्यथित होतो. परंतु त्या आधीच त्याने सॅनिटोरियम मध्ये ओळख झालेल्या स्त्रीच्यासोबत परदेशात जाऊन आयुष्य़ घालवायची बेगमी केलेली असते. इथे लिओ कणाहीन झाल्याचे स्पष्ट दिसते. किरा त्याला आंद्रेई बद्दल कोणतेही स्पष्टिकरण देत नाही कारण तिचा आत्मा निष्कलंक असतो. ’जर तू जिवंत असलास आणि विसरला नाहीस तर भेटू’ अशी अनिश्चितता त्यांच्या प्रत्येक भेटीच्या निरोपाच्या क्षणी स्वीकारणारी किरा आतून शांत राहते ती यामुळेच. ज्याच्या प्रेमासाठी आपण आपलं शील पणाला लावलं त्याने आपल्याला त्यागावं याचा खेद ती वाटून घेत नाही.  निरपेक्ष प्रेम कदाचित यालाच म्हणत असावेत. किरा स्त्रीवादी असती तर कदाचित या अन्यायाने पेटून उठली असती पण किरा स्त्री-पुरूष या भेदांच्या पलीकडे खुल्या मनाने पाहणारी, व्यक्तिवादी आहे कदाचित म्हणूनच ती या घटनाक्रमाकडे विद्ध मनाने पण वस्तुनिष्ठपणे पाहू शकली आहे. एकाकी किरा स्वप्नांची साथ सोडत नाही. वैध मार्गाने परवानगी मिळत नाही म्हटल्यावर छुप्या मार्गाने देशाबाहेर पळ काढण्याचा निकराचा प्रयत्न करते. अश्रू ओघळल्याने सुद्धा वेदना व्हाव्यात अशी कडाक्याची थंडी साहत रात्रभर चालत राहते. सीमेवरील साम्यवादी सरकारी पहारेकर्‍याची गोळी तिचा वेध घेते तेव्हा हाडं गोठवणार्‍या बर्फातून स्वातंत्र्याच्या दिशेने चालत राहिलेल्या किराचं शरीर कोसळतं पण आत्मा तसाच राहतो..अलांच्छित, अवध्य, अभंग आणि अविनाशी. 

नायिका म्हणून आपल्या नजरेसमोर किरा अचूक उभी करण्य़ात लेखिकेची साहित्यिक प्रतिभा महत्वाची आहेच परंतु किरा एक विचारदीप घेऊन उभी आहे आणि वाचनाअंती तो ती आपल्या सुपूर्द करते. त्यागमूर्ती म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या, सामाजिक, धार्मिक अपेक्षांच्या दडपणाखाली घुसमटणार्‍या अनेक स्त्रियांना त्यांना काय हवं आहे याचा उच्चार करण्याचं, निर्णय घेण्याचं धैर्य किरा देऊ शकते. केवळ स्त्रियांनाच नव्हे तर झुंडशाहीमुळे दडपलेल्या गेलेल्या अनेक आवाजांना हुंकारण्य़ाचं बळ देण्य़ाची ताकद किरामध्ये आहे. खुज्या विचारांच्या काळोखात किरा तिच्या स्वयंप्रेरणॆने चमकत राहते आणि इतर अनेक आयुष्यांना कळत- नकळत प्रेरणा देत राहते. आपणही तिच्यासवे जगण्य़ातली मूल्यं प्रामाणिकपणे पण वास्तववादी भूमिकेतून जपण्यातलं सौंदर्य शोधायला लागतो. मग वाटायला लागतं, क्षणाचं असो वा दीर्घ, आयुष्य असावं तर किरासारखं, स्वतंत्र आणि अपराजित. 

Ref :
(We the living by Ayn Rand
marathi version - Manjiri Joshi)
मधुरिमा- दिव्य मराठी विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख

Monday, February 27, 2017

'My मराठी’ कडे वाहत चाललेले तारू

‘टू बीएचकेचा थर्ड फ्लोरचा फ्लॅट बुक केलाय, बाल्कनीतून इतका क्लासिक व्ह्यू दिसतो.’
‘सगळं मिक्स करून त्याचे बॉल्स ब्रेडक्रम्समध्ये रोल करून डीप फ्राय करायचे आणि सॉसबरोबर सर्व्ह करायचं.’
‘स्ट्रेट ये, मग लेफ्ट टर्न घे, प्रिन्सेस ब्यूटिपार्लरचा बोर्ड दिसेल, जस्ट साइडची बिल्डींग.’
‘माय गॉड, मंथ एंडला एग्झाम आहे, मग सिलॅबस केव्हा कम्प्लीट करणार?’

मराठीचा वापर आपण हा असा, फक्त क्रियापदांपुरता करत असू तर हे प्रकरण गंभीर आहे. अशा भाषेचा आपल्याला अभिमान वाटेल तरी कसा! मराठी भाषा दिन ‘साजरा’ करायचाय तो आपल्याला आपल्या भाषिक भरकटलेपणाचे भान यावे म्हणून. जागतिकीकरणाच्या झंझावातात आपले ‘My मराठी’ कडे नकळत वाहत चाललेले तारू पुन्हा ‘माय-मराठी’च्या किनाऱ्याला लागावे म्हणून...
उदा: त्यासाठी सर्वप्रथम बोलताना, लिहिताना शक्य असेल तिथे चांगल्या आणि सोप्या मराठी शब्दांचा वापर करायचा...जग जवळ आलेय ते तंत्रज्ञानामुळे, बरेचसे तंत्रज्ञान आले ते विदेशातून ,साहजिकच त्यांचे शब्द आपल्याला स्वीकारावे लागले. तांत्रिक शब्दांना काही वेळेस पर्यायी शब्द चपखल बसत नसतील आणि वापरण्याचा अट्टाहास केला तर ते विनोदी वाटतात, उदा: सॉफ्टवेअर ला ’मृदु प्रणाली’, हार्डवेअर ला ’कठीण प्रणाली’..कुणाला समजणारेय ही किचकट ’प्रणाली’..असे काही अपवाद सोडले तर नेमके प्रतिशब्द वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे अवघड नाही. अनावश्यक जागी इंग्रजी शब्द आपण का पेरतो? शब्द आठवत नाहीत म्हणून रूळलेले इंग्रजी शब्द पटकन बोलले जातात, काही जणांना तर मराठी शब्द आठवत नाहीत याचा चक्क अभिमान वाटतो. कॉम्प्युटर 'शटडाऊन कर’ याऐवजी ’बंद कर’, ’फॅन ऑन कर’ला ’पंखा सुरू कर’ असं म्हणता येतं ना! 

 एखाद्या ’प्ले ग्रुप’ म्हणजेच शिशुवर्गात शिकणार्‍या लहानशा पियूकडे बघा. पियूच्या बाबांचं पाहुण्यांसमोर प्रात्यक्षिक सुरू होतं. "मून कुठे अश्तो?" पियू आकाशाकडे बोट दाखवत ’अप’ म्हणते. त्यावर खूष होऊन तिला खाऊ देत आई म्हणते."‘वेली गुड आणि स्टार्स कसे करतात?" पियू बोबड्या स्वरात म्हणते, "टिंकल टिंकल." असे पियू किंवा राजू मोठे होतात तेव्हा एक धेडगुजरी व्यक्तिमत्त्व तयार होतं. त्यांची मराठी मातॄभाषा तर असते पण त्या भाषेचे ज्ञान मात्र जुजबी असते. ’मोर थुईथुई म्हणजे आनंदाने नाचतो’ असे त्यांना सांगितले तर ते ’मी थुईथुई हसतो’ असा वाक्यात उपयोग करू शकतात. यावर कपाळाला हात लावण्यापेक्षा मुलांवर इंग्लीश बरोबरच उत्तम मराठीचे संस्कार घरातून व्हायला हवेत आणि त्यासाठी मुळात आपली भाषा, आपलं वाचन सकस असायला हवं याची जाणीव पालकांना आहे का? 

पर्यटन करून आल्यावर विशेषत: दक्षिण भारतातून किंवा परदेशातून आलेल्यांना जाणवतं की, भाषेचा दुराभिमान गैरसोयीचा देखील ठरतो. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधे अनेक भाषा अवगत असलेल्या लोकांना विशेष संधी आणि प्राधान्य दिलं जाते. बहुभाषिकता हे यापुढच्या पिढ्यांचे लक्षण ठरणार आहे. उच्च शिक्षण, करिअर व वैश्विक संवाद यासाठी इतर संपर्कभाषा शिकायलाच हव्यात. मात्र आपल्या समाजातील व कुटुंबातील व्यवहार, सांस्कृतिक व्यवहार होतात ते मातृभाषेत..मराठीत .आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब जगात उमटवणे हे यापुढले आव्हान आहे. यासाठी मराठीतले उत्तम साहित्य अनुवादाद्वारे जगभर पोचवता येणे शक्य आहे. मराठी साहित्य संमेलनातील राजकारणामुळे अशा संमेलनांकडे रसिक पाठ फिरवू लागले आहेत. मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणे हेच या समस्यांवर उत्तर आहे मात्र वाचनसंस्कृती जोपासल्याशिवाय हे शक्य नाही. वाचू आनंदे, लिहावे नेटके यासारखी पुस्तके, उत्तम मराठी बालसाहित्य मुलांसाठी उपलब्ध आहे. त्याची गोडी मुलांना लागावी ही पालकांची जबाबदारी आहे.

हे सगळं ठीक आहे पण या समस्येचे मूळ इंग्लीश माध्यमात आहे ना मग सरळ मातृभाषेतूनच शिक्षण घ्या ना, अशी आग्रही भूमिका स्वत:ची नातवंडे इंग्लीश माध्यमात घातलेले अनेक जण मांडतात. मुद्दा ठसवण्य़ासाठी मातृभाषेतून शिकून यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली जातात. जात्याच हुशार मुलांचे यश शिक्षणाच्या माध्यमावर अवलंबून नसते पण सर्वसामान्य मुलांना मराठी माध्यमातून शिकून पुढे इंग्लीशमधे उच्चशिक्षण घेणे अतिशय जड जाते. शिवाय काही सन्माननीय अपवाद वगळता मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे, त्यामुळे सेमी-इंग्लीशचा सुवर्णमध्य अधिक सयुक्तिक नाही का! इंग्लीश भाषेमुळे मराठीला दुय्यम मानले जाते आहे अशी निरर्थक ओरड करण्यापेक्षा बहुभाषक होण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, हे आता तरी आपण मान्य केले पाहिजे. 

‘इंग्लीशच्या अतिक्रमणाला उत्तर म्हणून मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे’ हे हल्लीचे सर्वाधिक लोकप्रिय घोषवाक्य आहे. विशेषत: राजकीय भाषणात वापरण्याचे. मातृभाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करणाऱ्या युरोपातील काही राष्ट्रांची उदाहरणं यासंदर्भात दिली जातात. मुळात ती राष्ट्रे लोकसंख्येचा विचार करता जेमतेम आपल्या मुंबई इतकी असतात. भारतात अठरापगड भाषा आहेत.समजा उद्या उच्चशिक्षण मराठीतून उपलब्ध झाले आणि ती तांत्रिक अर्थाने ज्ञानभाषा झाली असे आपण गृहीत धरले तरीही मराठी माध्यमातून डॉक्टर झालेली व्यक्ती परराज्यात कसे काम करू शकेल? परराज्यात शिक्षक म्हणून कसे शिकवू शकेल?

इंग्रजीच्या अपरिहार्यतेमुळे किंवा समाजाने केलेल्या तिच्या व्यापक स्वीकारामुळे आधुनिक व्यवहार मराठी किंवा एकूणच भारतीय भाषांमधे होणे शक्य नसेल तर त्यांच्या संवर्धनाचा आव आणण्यापेक्षा त्यांचे जतन करण्यावर अधिक भर द्यायला हवा. हे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे, परंतु स्पर्धेच्या भीतीने त्यांचा रस अर्थकारणात अधिक आहे, साधं उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी क्रिकेट सामन्याचं समालोचन (म्हणजे आजच्या मराठीत ’कॉमेंट्री’ बरं का!) आकाशवाणीवरून प्रसारित व्हायचं. त्यामुळे चौकार, षटकार, शतक, धावचीत, झेल, बळी, सामनावीर असे किती तरी सोपे मराठी प्रतिशब्द सहजपणे रुळले. आता मराठी वाहिन्यांवरील कार्यक्रमांची नावे ’ग्रेट भेट, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, लिटिल चॅम्प्स, रिपोर्ताज, ग्रँड फिनाले’ अशी असतात. मराठी माध्यमांनी आज ही जबाबदारी नाकारली तर त्यात त्यांचेही नुकसान आहे. 'भारतीय विमानपत्तन प्राधिकरण’ अशी पाटी वाचल्यावर डोक्यात काही तरी प्रकाश पडेल का! भाषेची क्लीष्टता हे सामान्य माणूस तिच्यापासून दुरावण्याचे एक कारण मानले जाते. ग्रामीण मराठीचा ठसका आणि गोडवा खरं तर वेगळाच, शिवाय आता मराठीची अनेक रूपे साहित्यातून मांडली गेली आहेत. तरीही भाषेची दुर्बोधता आणि नागरी व ग्रामीण मराठी असा भेद दुरावा वाढवतो. 

काही राजकीय पक्षांनी मराठीतून पाटया लावणे अनिवार्य केले, मात्र त्या पाट्या लिपीने देवनागरी झाल्या, अर्थाने मराठी झाल्या नाहीत.रिटेल शोरूम, जनरल स्टोअर्स, हायस्कूल, हेअर कटींग सलून, मेडीकल्स हे शब्द तसेच रूढ झाले आहेत फक्त ते देवनागरीतून लिहीले गेले इतकच. आचार्य अत्र्यांची मराठी सोपी असूनही त्यांच्या साहित्यिक दर्जाला उणेपणा आला नाही, उलट तेच त्यांचे वैशिष्ट्य ठरले. संस्कृतप्रचुर मराठीपेक्षा ती जितकी साधी, सुगम होत जाईल तितकीच व्यापकतेने स्वीकारली जाईल. स्वा. सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना उदा: महापौर, चित्रपट, नगरपालिका, क्रीडांगण असे सुटसुटीत मराठी स्वरूप दिले आहे. याचा वापर होत गेला आणि ते रूढ झाले. मराठी भाषेचे असे सुलभीकरणच तिला सर्वसमावेशक करू शकेल.. आपल्यावर जबाबदारी आहे ती अशा आणखी नव्या शब्दांना प्रचारात आणण्याची...

त्या त्या वेळचे प्रचलित शब्द सामावून घेत भाषा प्रवाही होते त्यामुळे ज्या परभाषेतील शब्दांना सोपे प्रतिशब्द नाहीत ते तसेच ठेवून मराठीत त्यांचे विलीनीकरण व्हावे. किमान व्यवहारात तरी मराठीला मानाचे स्थान देणे आपल्या हातात आहे .मराठी जतन करण्यासाठी ती वाचत राहणं, ऐकत राहणं, बोलत राहणं एवढं तर आपण नक्कीच करु शकतो नं! जी मराठी भाषा आपल्याला ओळख देते, तिचा आदर करायलाच हवा. मराठी मातीचा सुगंध, मराठी लोकजीवनाचा, भावबंधांचा, उत्तम साहित्याचा आनंद आपण अनुभवू शकतो तो या भाषेमुळेच. मराठीचं अस्तित्व हेच आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मराठी भाषेसोबत मराठी संस्कृतीची नाळ जुळलेली आहे. ती जगणं सुंदर करण्यासाठी आहे, हे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अधोरेखित व्हावं. त्यासाठी मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान नको, मराठीवर नितांत प्रेम असायला हवं. 


---

मराठी दिना निमित्त दिव्य मराठी मध्ये प्रकाशित झालेला लेख 

https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-mohini-mahesh-modak-article-about-globalisation-and-marathi-language-5538242-NOR.html

Tuesday, December 6, 2016

रांग आणि आपण


नुकत्याच व्यवहारातून बाद केल्या गेलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी प्रचंड मोठ्य़ा रांगा लागल्या. आता जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी जुन्या नोटा रांगेत उभं राहून बदलून घेणं, ज्यांच्याजवळ इतर आर्थिक व्यवहाराचे पर्याय नाहीत त्यांना यासाठी प्राधान्य देणं, ही सामाजिक शिस्तीशी संबंधित साधी आणि देशहिताचीच गोष्ट आहे. परंतु या रांगातून आपल्याला दोन मनोवृतींचे दर्शन झाले. मोदीविरोधकांनी सरकारच्या या देशपातळीवरच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांची कशी गैरसोय होते आहे याची ओरड सुरू केली, ओरड करणारे सगळे रांगेत स्वत: उभे होते असे मुळीच नाही. दुसर्‍या बाजूला मोदीसमर्थकांनी या रांगेत उभं राहण्य़ाच्या सहनशीलतेची तुलना थेट सीमेवर अविरत खडा पहारा देणार्‍या भारतीय सैनिकांच्या मनोबलाशी करून आपण देशासाठी प्रचंड काहीतरी करतो आहोत असा त्याला रंग दिला. अर्थात त्या भावनेमुळे का होईना, एरवी रांगेला वैतागणार्‍या बहुसंख्य जनतेने फारशी कुरकुर न करता परिस्थितीचा स्वीकार केला हे सत्य आहे. नोटांचा पुरवठा निर्धारित वेळेत करण्य़ात काही प्रशासकीय त्रुटी जाणवत आहेत, हे काही अंशी खरे असले तरी मुळात आपल्याकडे समंजस ’रांग-संस्कृती’ नसल्याने त्राग्याची तीव्रता ’वाढवण्य़ात’ आली हे नाकारता येत नाही.

लग्नसराई किंवा शालेय सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची झुंबड उडते. सार्वजनिक बस मधे ’खिडकीतून रूमाल टाकून’ किंवा आतल्या एखाद्या भोळसर दिसणार्‍या व्यक्तीला शेजारची सीट आपल्यासाठी राखून ठेवायला बजावून, ऐटीत जाऊन जागा पकडायची भन्नाट पद्धत चढताना रांग लावण्यापेक्षा कित्ती सोपी. स्वत:ऐवजी आपल्या चपला रांगेत ठेवून स्वत: मोबाईल मध्ये डोकं घालून बाकावर बसलेल्या मंडळींचा एक फोटो मध्यंतरी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला होता. एकूणच भारतीयांना, नोटबदल घटनेसारखे अपवाद सोडले तर रांगेत उभं राहणं हे फार कंटाळवाणं, कटकटीचं तर काहींना ते चक्क कमीपणाचं वाटतं. त्यापेक्षा त्यांना अशा युक्त्या सोयीच्या(!) वाटतात. दोन इंग्रज माणसं एखाद्या काऊंटरवर काही कामासाठी गेली तर शेजारी शेजारी उभं न राहता ते एकामागे एक असे रांगेत उभे राहतात असे त्यांच्या मनोवृत्तीचे वर्णन केले जाते. इंग्रज हा देश सोडून जाताना भारतीयांवर चार बर्‍या गोष्टींची छाप सोडून गेले. त्यापैकी महत्वाच्या काही म्हणजे स्वच्छता व टापटीप याचं भान, जगण्याशी संबंधित प्रत्येक घटकातले सौंदर्य शोधण्याची वृत्ती आणि शिस्त. अर्थात त्या बदल्यात दीडशे वर्षात ते ’डुगना लगान’ घेऊन आपल्याला पुरते लुटून निघून गेले. देश स्वतंत्र झाल्यावर आपण साहेबाकडून लादली गेलेली इंग्लीश भाषा आणि क्रिकेटप्रेम पुरेपूर उचलले, पण सामाजिक शिस्त आणि प्रत्येक गोष्ट दर्जेदार करण्य़ाची वृत्ती मात्र मन:पूर्वक स्वीकारली नाही. मुंग्यांना सुद्धा ज्याचे महत्व कळते ती रांगेची शिस्त तर अद्यापही आपल्यामधे पूर्णपणे भिनलेली नाही. ’हम जहाँ खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’.. अमिताभ बच्चन यांचा हा अजरामर संवाद कृतीत आणण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेक जण आजही निकराने करत असतात.

रांगेत परिक्षा असते संयमाची, सहनशक्तीची पण आपल्याला प्रचंड घाई आहे, कशाची कोण जाणे! सिग्नलला उभ्या असलेल्या पुढच्या गाड्या जर दिवा हिरवा होण्य़ाची वाट पाहत असतील तर त्यांना ओलांडून मागच्या रांगेतील गाडीवाल्यांना पुढे जायचे असते. बरं, तेवढी आणीबाणी असेल म्हणावे तर यातल्या कित्येकांना पुढच्या चौकात थांबलेल्या मित्राला भेटून फार तर पान तेवढे खायचे असते. एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट काढावे तर तिकीट घेताना हात बाहेर येणे मुश्कील कारण बर्‍याचदा त्या लहानशा खिडकीत आपल्यासोबत मागच्या एकदोन माणसांचा हात अडकलेला असतो. गाडीत चढता उतरताना रांग लावण्य़ाऐवजी दोन्ही पार्ट्यांचा घोळका पार गाडी सुटायची वेळ येईतो दारातच एकमेकात अडकून राहतो. उच्चभ्रू लोकदेखील याला अपवाद नाहीत, विमानतळावर रांगेची शिस्त मुकाट्याने पाळणारे बरेच लोक पार्कींग करताना मात्र गाड्य़ा योग्य त्या अंतरावर रांगेत न ठेवता ’आपल्याला गाडी काढताना सोयीचे होईल ना’ एवढाच निकष वापरतात. निदान शक्य आहे तिथे थोडा धीर धरला आणि रांगेचे नियम पाळले तर फारशा समस्या निर्माण होणार नाहीत.

जिथे रांगेला पर्याय नसेल, जसे पेट्रोल भरणे किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे, तिथे रांग हाताळण्याची बहुतेक कर्मचार्‍यांची चुकीची पद्धत, लोकांची संधी साधून ’मधे घुसण्य़ाची’ मानसिकता यामुळे आपण रांग-संस्कृती विकसित करू शकलो नाही. अशा कर्मचार्‍यांनी आपल्यालाही कधी ना कधी इतर कामासाठी कुठल्यातरी रांगेत उभे राहावे लागतेच हे विसरू नये. एखाद्या कंपनीची खास ऑफर, सिनेमाचा पहिला शो यासाठी स्वेच्छेने लागणार्‍या रांगांमधे सुद्धा हाणामार्‍या, गोंधळ, गडबड होणे आपल्याला नवीन नाही. यंदाच्या नोटबदल घडामोडीत मात्र बहुसंख्य बँक कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या रांगांना अतिशय कौशल्याने जादा तास वेगाने काम करून प्रतिसाद दिल्याच्या बातम्या येत आहेत ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.

असा बदल सर्व क्षेत्रात व्हायला हरकत नाही पण आपल्यासमोर लोकांच्या रांगा लागणं हे अनेकांना भूषणावह वाटतं. उदा: बहुतांशी डॉक्टर मंडळींना व्यवस्थापकीय तंत्र वापरून रूग्णांना विशीष्ट वेळ उपलब्ध करून देणं अशक्य नसतं. पण ताटकळत बसलेल्या रूग्णांच्या रांगेची लांबी हे जणू संबंधित डॉक्टरच्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) व्यावसायिक यशाच्या मापनाचं एकक झालं आहे. रांगेच्या समस्यांवर उपाय आहेत पण शोधण्याची इच्छाशक्ती हवी. रांग बिल भरण्य़ासाठी असो, की काही आर्थिक कागदपत्रांसाठी, अनेक रांगांच्या अवाढव्य लांबीला सर्वसामान्य भारतीयांची तंत्रज्ञानविषयक अनास्था देखील कारणीभूत आहे. एकतर अंतिम मुदत संपायला आली की आपल्याला जाग येते. अनेक सुशिक्षीत लोक ’ऑनलाईन’ व्यवहार करायला अद्याप भितात. केलेच तर ’कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय निवडतात. रोख रकमेसाठी पुन्हा एटीएम ला रांग लावतात. दारिद्र्य्ररेषेखालील लोकांची हतबलता आपण समजू शकतो परंतु सुमारे २२ कोटी भारतीय (संदर्भ- द हिंदू) स्मार्ट फोन्स आणि ४० कोटी भारतीय इंटरनेट वापरत असूनही फोन अथवा नेट बँकिंग समजून घेऊन त्याचा वापर करण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. बँकेने दिलेल्या तांत्रिक सूचनांचे नीट पालन केले तर यात हॅकींगचा धोका फारसा नसतो. रोख पैसे बाळगण्य़ापेक्षा नक्कीच कमी असतो. अगदी उच्चशिक्षीत लोक सुद्धा पेट्रोल वाया घालवून, हाफ डे घेऊन धडपडत लांबवर बिल भरायला जातात, रांगेतील गर्दीच्या नावाने खडी फोडतात, पण ऑनलाईन सुविधा वापरत नाहीत. खरं तर ’व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्याइतकच ते सोपं आहे. डिजीटल मनी, प्लास्टीक मनीचा वाढता वापर रांगेची गरज, अपरिहार्य असलेल्या रांगेची लांबी आणि त्यात होणारा वेळेचा अपव्यय निश्चित कमी करू शकेल.

रांगेचे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. अनेक विकसित देशात याच्या प्रणालींचा वापर सुपरमॉल सारख्या ठिकाणी केला जातो. तरीही याच्या उपयोगितेबद्दल स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ. मार्टिन म्हणतात ,"मानवी वर्तनाचं कोडं जोवर सुटत नाही तोवर रांगेचं व्यवस्थापन या संकल्पनेत तथ्य शोधण्य़ात अर्थ नाही." आपल्याकडे मात्र रांगेच्या व्यवस्थापनचं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे दर्शनबारीतील लहानथोर सर्वांचा ’माऊली’ म्हणून एकाच पातळीवर सन्मान करणारं, विदर्भातील शेगाव येथील धार्मिक संस्थान. केरळ राज्यात पर्य़टनासाठी गेले असताना एका प्रसिद्ध मंदिरात ’तात्काळ’ दर्शन घेता यावे म्हणून आम्ही ’देणगी’ दिली. रांगेत जास्त वेळ गेला तर पुढचे स्थलदर्शन हुकेल इतक्याच हेतूने ते केले. परंतु दर्शन घेऊन बाहेर पडताना कडेवर लहान मूल घेतलेल्या स्त्रिया, वृद्ध पुरूष यांच्यासह अनेक जण लांबलचक दर्शनबारी मधे तिष्ठत उभे असलेले पाहिले आणि अतिशय अपराधी वाटले. रांगेचा फायदा सर्वाना मिळायला हवा याची नैतिक जाणीव झाली. रांगेचा अपमान करणारा, ’पुढे घुसण्याचा’ असा अधिकृत परवाना, किमान आपण तरी यापुढे घ्यायचा नाही हे मनोमन पक्के ठरवले.

रांग कुणाला चुकलीय. अगदी चार खांद्यांवरून स्मशानात जातानाही ती चुकत नाही. परंतु पाण्य़ाच्या टॅंकरसाठी किंवा सिलेंडरसारख्या मुलभूत गरजांसाठी लागणार्‍या रांगा ही मात्र देशासाठी अभिमानाची बाब नाही, अशा रांगांची आवश्यकता न उरणे ही खरी प्रगती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळॆस इंग्लंड मधे अंड्यांचा तुटवडा भासत होता. ब्रिटीश सरकारने त्यांच्या नागरिकांना सैनिकांसाठी अंडी राखून ठेवा असे आवाह्न केले. अनेक नागरिकांनी तेव्हा रांगा लावल्या, पण त्या रांगा खरेदी केलेली अंडी परत करण्य़ासाठी होत्या. ही वदंता आहे की सत्यकथा माहित नाही पण देशप्रेमी नागरिकांची अशी रांग हीच देशाची खरी संरक्षक भिंत आहे असे म्हणता येईल. आपण आपले देशप्रेम नुसत्या नारेबाजीऐवजी रांग-संस्कृतीसारख्या लहानसहान बाबी नीट जोपासून व्यक्त करायला काय हरकत आहे ! जपानच्या प्रगतीत त्या देशातील सुदृढ रांग-संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे असे मानले जाते. आपल्याकडे सुद्धा सर्वंकष प्रगतीसाठी रांगांची संख्या आणि लांबी कमी व्हावी, मानवी तास वाचावेत. अर्थात वाचलेले मानवी तास सत्कारणी लागावे हे देखील तितकेच महत्वाचे.

उच्चपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका वयस्कर स्नेह्यांना सगळे तंत्रज्ञान अवगत आहे, त्यांच्याकडे डेबिट -क्रेडिट कार्ड सगळे काही आहे. अगदी आवश्यक असेल तेव्हा ते या तंत्राचा नीट वापर करतात परंतु एरवी बँक, पोस्ट, बिलभरणा केंद्र, चित्रपटगृह अशा बहुतेक ठिकाणी ते शक्यतो चालत जातात आणि रांगेत उभे राहून आपले काम करतात. कुणाला अडचण असेल तर फॉर्म वगैरे भरायला मदत करतात. "या निमित्ताने माझा व्यायाम होतो, वेळ छान जातो, रांगेची शिस्त एकूणच आपल्या जगण्य़ात उतरते, रांगेमधे आपण कुणी ’खास’ नसतो त्यामुळे आपण ’जमिनीवर’ राहतो, मुख्य म्हणजे माणसं दिसतात, भेटतात, अनुभवता येतात आणि या सगळ्य़ात एक वेगळीच गंमत आहे." असं त्यांचं म्हणणं. अशा विचारांच्या माणसांची आपल्या देशातली रांग मात्र कधीच संपू नये.

Article published in sunday special Divya Marathi
http://digitalimages.bhaskar.com/thumbnail/703x1096/divyamarathi/epaperimages/20112016/19akola%20city-pg10-0.jpg?11