Friday, November 20, 2015

जनरेशन गॅप - परदेश


’आजीबाई आजीबाई थकलात का? नेटवर नातवाला भेटलात का?
मुलांना शिकवून केला गुन्हा (!), परदेशी गेल्या लेकी सुना
नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हाऊन जा
नातवाने वाचला नन्नाचा पाढा, रिकामा राहिला आजीचा वाडा’
या विषादपूर्ण ओळी व्हॉट्स ऍप वर वाचल्या. सहानुभूती साहजिक आजीच्या वाट्याला जाते आणि आजची पिढी- मुलं, सुना, नातवंडं दुष्ट ठरतात. खरं तर कुठलीच पिढी सरसकट काळी किंवा पांढर्‍या रंगाची नसते. मागच्या पिढीला येथेच सोडून परदेशी गेलेले सगळेच निष्ठूर, कृतघ्न वगैरे नसतात.

एका स्नेह्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला, संशोधन केले आणि पुढे लग्न करून तेथेच स्थायिक झाला. सुरूवातीला ते मुलाच्या प्रगतीचे गोडवे गाताना थकत नसत कारण मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होताना बघणे हेच प्रत्येक पालकाप्रमाणे त्यांच्याही आयुष्याचे ध्येय होते. त्यातले अप्रूप आणि नावीन्य ओसरल्यावर आणि विशेषत: पत्नी निवर्तल्यावर त्यांना एकटे वाटू लागले. मुलाने तिकडे राहण्यास बोलावले परंतु तिथले हवामान, तिथली संस्कृती याच्याशी जुळवून न घेऊ शकल्याने ते भारतात परतले आणि एकटे राहू लागले. काही नातलगांनी ’एवढं शिकवलं मुलाला पण संस्कार तेवढे करायचे राहिले, आता घ्या’, ’आपल्या देशासाठी काही करायला नको, नुसती डॉलरची हाव!" वगैरे मुक्ताफळे उधळली. अशा नातलगांपैकी कित्येकांना परदेशी गेलेल्यांबद्दल असूया असते, आपल्याही मुलांनी परदेशी जावं असं स्वप्न असतं आणि नाहीच जमलं तर त्यांना एकदम ’देशप्रेम’ वगैरे आठवतं. आपल्याकडेही स्वेच्छेने किंवा नाईलाजाने गावी राहणारे आईबाप आणि शहरात स्थायिक झालेली पुढची पिढी हे चित्र काहीसे असेच नाही का! भारतात राहणारे सगळेच आपल्या देशासाठी काही महान कार्य वगैरे करतात का? कित्येक जण इथेच आयुष्य घालवूनही मॉल संस्कृतीचे गुणगान करीत येथील प्रत्येक गोष्टीला नाके मुरडत असतात. आजच्या काळात नवनवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, वैश्विक अनुभव घेण्यासाठी परदेशी जाणे म्हणजे पाप नाही. अर्थात आजन्म तिथे राहून स्वत:ला अकारण श्रेष्ट समजणे आणि स्वदेशाला नावे ठेवणे नक्कीच गैर आहे.

 'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात अपर्णा वेलणकर यांनी मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. विदेशात व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर परत आलेले अनेक जण भारतातील लाल फीतीच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला कंटाळून पुन्हा परदेशी जातात. आपल्या समाजात अनेक रुढी,परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते त्यामुळे काहींच्या पत्नीचा परत येण्याला विरोध असतो. तिकडे जाऊन लोक संस्कृती विसरतात असाही एक आक्षेप घेतला जातो. ते तिकडे पूर्ण समरस होऊ शकत नाहीत आणि इकडे पुन्हा स्वीकारले जात नाहीत. एक अनुभव वाचनात आला, त्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका स्त्रीला तिच्या भारतातल्या आईने सुचवलं, "दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस." त्यातल्या त्यात तिथे भारतीय सणवार एकत्र येऊन साजरे करून भारतात नसल्याची उणीव भरून काढण्याचा ते आपल्या परीने प्रयत्न करतात. भारतीय कार्यक्रमांचे, कलाकारांचे तिकडे आवर्जून स्वागत करतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली नाळ देशाशी जोडून ठेवतात. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत त्यांच्यामुळे भर पडत राहते. अनेक परदेशस्थ भारतीयांनी येथील अनेक सामाजिक प्रकल्पांना भरघोस मदत दिलेली आहे. ती घ्यायला आणि त्यांच्यातल्या कुणाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला की लगेच ते ’भारतीय वंशाचे’ आहेत म्हणून श्रेय घ्यायला मात्र आपण तयार असतो.

थोडक्यात परदेशी गेलेल्या सगळ्यांना एक तर नायक नाहीतर खलनायक ठरवण्याची टोकाची मानसिकता आपण बदलायला हवी. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या देशाचे काही देणे लागतो की नाही! निश्चितच. विशेषत: येथील आयआयएम, आयआयटी सारख्या अनेक नामांकित शिक्षणसंस्थातील विद्यार्थी त्या संस्थांचा शिडीसारखा उपयोग करतात आणि परदेशी निघून जातात. या पिढीने हे विसरता कामा नये की येथील सवलतींचा फायदा घेऊन मिळवलेल्या विशेष ज्ञानाचा देशाला उपयोग करून देणे त्यांचेही कर्तव्य आहे. ते त्यांनी इथे राहून पार पाडावे अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथून. आजच्या पिढीत हे भान जपणार्‍यांची संख्या हळूहळू वाढते आहे ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्रेनड्रेनच्या प्रश्नाचा सुवर्णमध्य साधणार्‍यांची, परदेशात जाऊन उच्चशिक्षण आणि अनुभव घेऊन, जगाच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देऊ शकतील असे फॅशन, वैद्यकीय क्षेत्रा पासून सौर उर्जेपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी परतणार्‍यांची संख्या वाढते आहे. (संदर्भ: इकॉ. टाईम्स २४-१-१५) ’स्नॅपडील’ या वेबसाईटद्वारा येथील रोजगारनिर्मितीत भर घालणार्‍या रोहित बन्सल आणि कुणाल बहल सारखे, अनेक परदेशस्थ भारतीय तरूण विवीध उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी मायदेशाची निवड करू लागले आहेत. स्वदेशाबद्दलची बांधीलकी केवळ देशात राहूनच जपता येते आणि तरच देशप्रेम सिद्ध होते असे नाही तर देशासाठी असे काही तरी केल्यामुळे सिद्ध होते.

प्रत्येक दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आता पंचक्रोशी किंवा प्रांत ओलांडण्यापुरता उरला नाही तर सातासमुद्रापार पोचला आहे. वेलणकरांनी म्हटल्यानुसार जागतिकीकरणाची अपरिहार्यता म्हणून पुढच्या पिढीच्या रूपाने स्वदेश-परदेशाच्या निवडीचा संघर्ष तुमच्याही आयुष्यात रोरावत येईल तेव्हा मूल्यसंस्कारांची मुळे घट्ट रोवून त्याला आनंदाने आणि खुल्या मनाने सामोरे जायला हवे. 

Friday, October 16, 2015

जनरेशन गॅप -वाचन


’वाचनाने मला काय दिले’ या विषयावर खास पालकांसाठी आयोजित एका निबंध स्पर्धेचे परिक्षण करण्याची मला संधी मिळाली. सगळ्या निबंधांमधे एक समान धागा होता तो म्हणजे आजची पिढी पुस्तकांशिवाय ’घडते’ (!) आहे याबद्दलची खंत आणि अस्वस्थता. कवी गुलजार हीच खंत व्यक्त करताना म्हणतात..
 "जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी,
लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय.

यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. हे खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही. पुस्तकातल्या माहितीचा ज्ञानात आणि ज्ञानाचा ’शहाणीवेत’ हळूहळू रूपांतरित होत जाणारा सुंदर प्रवास, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली अनुभवता येत नाही. आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. त्यात दोन धोके आहेत, मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. यावर जर पालक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले तर या माध्यमांच्या मदतीने कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो.

 आजीआजोबांनी मुलांना गोष्टी सांगण्याची प्रथा विभक्त कुटुंबांबरोबर कमी होत गेली आहे. एकत्र कुटुंबांमधेही आजीआजोबांना आता टीव्ही मालिका पाहायच्या असतात. ज्या आजीआजोबांना आजही नातवंडाच्या बौद्धिक विकासासाठी काही करावसं वाटतं त्यांच्यात आणि नातवंडांमधे तंत्रज्ञानाच्या मार्‍यामुळे खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आपोआप येणारे वाक्प्रचार, म्हणी, जुने शब्द याला नातवंड मुकतायत. शब्दकोडी सोडवणं, वर्डगेम्स अशा प्रयोगातून शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर त्या शब्दातून उमटणार्‍या चित्रांवर, गीतांवर, निसर्गावर, पर्यावरणावर प्रेम करायला मुलं आपोआप शिकतील. मात्र त्यांच्या बालसुलभ कुतुहलाला आपण संवादातून प्रोत्साहन द्यायला हवं.

 परंतु आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलांशी बोलायचं केव्हा! ती सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात. या संदर्भात जेनेल हॉफमन या अमेरिकन आईचं उदाहरण वाचनात आलं. मुलाला तिने मोबाईल बरोबर एक १८ कलमी नियमावली दिली. मुलांनी फोन कसा, किती, कुठे, का वापरावा याची ती जणू आचारसंहिताच होती. अशी काळजी घेतली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे पुढे उद्भवणारे प्रश्न आधीच निकाली निघून त्याचा सकारात्मक वापर होण्याच्या शक्यता वाढतील. मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांच्या तंत्रप्रेमाचा उपयोग करून त्यांना ई-बुक्स, ऑडीओ बुक्स ची ओळख करून द्यायला हवी. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. awesomelibrary.org ह्या साईटवर इंग्रजी तर मराठी आणि हिंदीत हा खजिना उपलब्ध आहे arvindguptatoys.com या साईटवर. भारतीय पात्र असणा-या कथांसाठी pitara.com ही साईट उत्तम आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर http://www.britishcouncil.org/kids हा वाचनिय आणि माहितीपूर्ण बालविभाग आहे. (संदर्भ:पालकनीती) पण हे सगळं घडून यायचं असेल तर पालकांनी आधी स्वत: तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी. तंत्रज्ञान आणि मुलं ही जोडी फोडणं आता अवघड आहे पण पालकांना त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं प्रयत्नांती शक्य आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीक सारख्या वाहिन्यांवरचे साहित्यातही न सापडणार्‍या अनेक विषयांवरचे दर्जेदार माहितीपट मुलांसह पालकांनी आवर्जून बघावेत. वाचनापासून दुरावलेल्या मुलांच्या वैचारिक कक्षा रूंदावण्याचे इतर पर्याय शोधणे आता भाग आहे. ’आमचा मुलगा अजिबात वाचत नाही हो’ अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं की ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी त्यांना एक महिन्याने पुन्हा बोलावले आणि मग त्या मुलाला गोड खाणे बंद कर असे समजावून सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की हे तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली आणि मग त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला". मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी पालकांनी स्वत:ला विचारावं, आपलं वाचन whatsapp च्या मेसेजेस पुरतं मर्यादित आहे, पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! घरातील वातावरण वाचनाला पोषक असेल तर मुलं आपोआप पुस्तकांकडे वळतील. मात्र त्यातूनही ती वाचत नसतील तर किमान त्यांना वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचायचा आग्रह करायला हवा. ते ही होत नसेल तर आपण त्यांना त्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, त्यावर मुलांसमोर सोप्या भाषेत चर्चा करू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो.

 आईने मुलाला झोपवताना गोधडी पांघरली काय आणि ब्लॅंकेट पांघरलं काय, खरी उब त्या पांघरूणापेक्षाही तिच्या स्पर्शात असते. मुलांच्या वाचनाच्या प्रश्नाकडे, वाचनाच्या बदलत्या माध्यमांकडे आता आपण याच दृष्टीने पाहायला हवं. जगातलं उत्तमोत्तम साहित्य डिजीटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागलं आहे. भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा पुस्तक वाचनाचा खरा हेतू तर निखळ आनंद हा त्याचा आणखी एक फायदा. छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक सारखं डिजीटल माध्यम (अर्थात अतिरेक टाळून) त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो मुलांपर्यंत पोचला म्हणजे झालं. -

Friday, October 2, 2015

भारतीय सौंदर्याला ओहोटी ??


तुम्हाला आदिती आर्या कोण हे माहीत आहे? तिने या वर्षीचा मिस इंडीय़ा किताब पटकावला आहे. बरं, गेल्या वर्षीची विजेती ,कोयल राणा आठवत असेल. ती ही नाही? तुम्हाला ऐश्वर्या, सुश्मिता, प्रियांका, लारा मात्र अजूनही लगेच आठवतात. लकाकते मुकुट घातलेले त्यांचे रूपवान चेहरे, त्यांचे निकाल ऐकून विस्फारलेले चमकदार डोळे आजही तुमच्या नजरेसमोर आहेत, मग या आजच्या सुंदरी तुम्हाला का आठवत नाहीत? कारण सोपं आहे, या आजच्या मुली फक्त भारतसुंदरी आहेत, त्या जगतसुंदरी किंवा विश्वसुंदरी होऊ शकलेल्या नाहीत. ९० च्या दशकानंतर कुणीही भारतीय सुंदरी विश्वसुंदरी ठरलेली नाही.

अचानक असे काय झाले की जागतिक पातळीवर पोचलेल्या भारतीय सौंदर्याला पार ओहोटी लागली? कारण सोपे आहे, ते जागतिकीकरणाचे दशक होते. भारतातील नव्या मध्यमवर्गाचे रूपांतर ग्राहकामधे करण्याचा, या स्पर्धांचे प्रायोजक म्हणून मिरवणार्‍य़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मनसुबा या सहस्त्रकाच्या आगमनापावेतो सफल झाला.

आज भारतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतरच्या सुधारणांतून तयार झालेल्या या मध्यमवर्गाची लोकसंख्या सुमारे 30 कोटीहून अधिक आहे. सौंदर्याचे अभारतीय मापदंड स्वीकारून त्यानुसार आधुनिक(!) जीवनशैली घडवण्य़ाची अहमहमिका तेव्हा पासूनच मध्यमवर्गात लागली. जागतिकीकरणामुळे निम्नमध्यमवर्गाचीही राहणी बदलू लागली. त्या विशिष्ट जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या तमाम उत्पादनांच्या खपात प्रचंड वाढ झाली. एसटी चा जेथे थांबा देखील नाही अशा दुर्गम खेड्य़ातही शाम्पूचे पाऊच, कोकाकोला सहज पोचू लागले. सौंदर्याची ही अद्भुत दुनिया सिनेमा, टीव्ही आणि सोशल नेटवर्क वरील वेगवेगळ्या जाहिराती व कार्यक्रमांच्या माध्यमातून, चकचकीत चित्रणाच्या मदतीने दररोज आपल्या समोर अवतरते आहे. त्यामुळे ९० च्या दशकात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हेतुपुरस्सर घडवलेला भारत नावाचा ’बाजार’ एव्हाना स्थिरावलाच नाही तर वेगाने वाढतो आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला एकदा अशा उत्पादनांची चटक लावल्यानंतर या सार्‍या घातचक्राचे केंद्र असलेल्या जागतिक सौंदर्यस्पर्धांच्या विजेतेपदावर भारतीय नावे कोरण्यातले बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्वारस्य संपले असेल तर यात नवल काय!

१९३४ मध्ये डी मिले ने दिग्दर्शित केलेला ‘क्लिओपात्रा’ हा सिनेमा व त्याच्या निर्मितीची कथा यादृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे. त्यात कलेचा भागही होता पण अमेरिकन उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती हा अंतस्थ हेतू होता. जबरदस्त जाहिरातीमुळे या चित्रपटाने जगभरात जोरदार धंदा केला. मुख्य भूमिकेतली क्लाउडेटी कोलबर्ट ही अमेरिकन अभिनेत्री युरोपियन प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. मूळ युरोपियन संस्कृतीत अमेरिकन उत्पादनांविषयीचे आकर्षण रूजले. चित्रपट संस्थांशी जोडलेल्या साखळी-दुकानांतून पिनांपासून कपड्य़ांपर्यंत अनेक ’क्लिओपात्रा उत्पादने’ विक्रीस आली. लक्स साबणापासून ओल्ड गोल्ड सिगारेट पर्यंत अनेक कंपन्यांशी व्यावसायिक संधान बांधले गेले. (संदर्भ: मेरी हमर) कपडे किंवा वस्तूच नव्हे तर दृष्टिकोन, विचार, मूल्ये, श्रध्दा सगळ्यांचेच अमेरिकीकरण करण्याची ताकद हॉलिवूडच्या चित्रप्रदर्शनात होती आणि आहे. ९० च्या दशकात हीच क्लॄप्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय मानसिकतेला व राहणीला बदलवण्य़ासाठी सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून वापरली.

तसे पाहता भारतीय स्त्री विश्वसुंदरी होण्यात गैर काय, असे मनात येते. (प्रख्यात वृत्तपत्रांनी सुद्धा त्या यशाचे वार्तांकन ’world's envy, India's pride' असे केले होते). त्यासाठी या स्पर्धांची परिणीती लक्षात घ्यायला हवी. प्राचीन काळी मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी माहिती आढळते. यूरोपमध्ये ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे कलाकार, कवी, बुद्धिवंत, आणि सेनापती असत. (संदर्भ- विश्वकोश) १९५४ मध्ये ‘मिस् अमेरिका’ ही सौंदर्यस्पर्धा तेथील दूरचित्र-वाणीवर प्रसारित झाली आणि मग हे लोण जगभर पसरत गेले. जागतिकीकरणानंतर एकाएकी या स्पर्धा भारतीय सुंदरी जिंकू लागल्या, मग निदान यातून भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान वगैरे बदलले का! नाही. नव्वदच्या दशकानंतर तमाम मध्यम -उच्चमध्यमवर्गीय पालकांना आपली मुलगी जागतिक व्यासपीठावर चमकत असल्याची दिवास्वप्ने मात्र पडू लागली होती. असे निरिक्षण संतोष देसाई हे जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ नोंदवतात.

म्हणायला या स्पर्धांमधे बुद्धीचातुर्याचा समावेश होता परंतु प्रत्यक्षात स्त्रीने कसे दिसावे, बोलावे, चालावे, बसावे किंवा वावरावे याचे निकष यातून ठरू लागले. या बिरूदांमधे भारतीयत्वाचा सन्मान नव्हताच उलट आंतरराष्ट्रीय मानका नुसार चेहरा-३० टक्के, बांधा-२० टक्के, चाल-२० टक्के, व्यक्तिमत्व-२० टक्के आणि हजरजबाबीपणा-१० टक्के अशी चक्क विभागणी करून सौंदर्यवती(!) घडवण्य़ासाठी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. बाईची कचकड्याची बाहुली झाली, पण हे इथेच थांबले नाही.

कार्ल मार्क्सच्या उक्तीनुसार, उत्पादनं आणि देवाणघेवाणीची इतकी प्रचंड साधनं तयार केली गेली आहेत की आता त्याची परिस्थिती एका गोष्टीतल्या जादूगारासारखी झाली आहे. त्याने जगावर राज्य करण्य़ासाठी आपल्या जादूटोण्याने इतकी भुतं निर्माण केली की त्यांच्यावर ताबा ठेवण्याला आता त्याची स्वत:ची शक्ती अपुरी पडू लागली आहे. या साधनांच्या धुंदीमधे सौंदर्याचे सारे संदर्भ बदलू लागले. भारतीय स्त्री सौंदर्य किंवा शरीरसौष्ठवाच्या व्याख्या राजा रविवर्मा किंवा दीनानाथ दलालांच्या चित्रांमधे अडकून पडणं शक्य नव्हतं, त्या कालानुरूप नैसर्गिकपणॆ बदलत गेल्या असत्या. मात्र सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून पाश्चात्य जगाने त्यांच्या व्याख्या भारतीयांवर लादल्या आहेत. भारतीय सिनेअभिनेत्रीच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियादेखील त्या व्याख्येला अनुरूप होण्य़ासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. भारतीय आहारशास्त्राला अव्हेरणारे ’झीरो फिगरचे’ खूळ त्यातूनच निर्माण झाले. कुपोषित मॉडेल्सच्या फौजा रॅम्पवर चालू लागल्या. यातून झालेली रोजगारनिर्मिती काही अंशी फायद्याची मानली तरी या ग्लॅमरजगातली स्पर्धा आणि त्यातून जगाला स्त्री शोषणाचा मिळालेला नवा मार्ग हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ग्लॅमरचे वेड आणि दिखाऊपणाच्या नादात आजची तरूणाई सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात आणि स्वप्रतिमेत गुरफटत गेली आहे. जगण्य़ातली साधी सोपी मूल्य झाकोळून गेली. सौंदर्यस्पर्धा किंवा फॅशन शोकरिता अनेक मॉडेल बोटॉक्स उपचार करून घेत. पण आता मात्र लहान मोठ्या समारंभाला जाण्यासाठी केवळ तीन-चार माहिनेच परिणाम टिकणार्‍या अशा उपचारांना तरुणी प्राधान्य देत आहेत. मानसोपचारतजज्ज्ञ म्हणतात, त्याच्या अतिवापराने चेहरा निर्विकार होतो. कित्येकदा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसतात, तसे झाल्यास ती तरुणी नैराश्याने ग्रासली जाण्याचीही शक्यता असते. सध्या भारतात चरबी काढण्य़ासाठी होणार्‍या लिपोसक्शन शस्त्रक्रियेला जास्त मागणी आहे. याचा खर्च दोन लाखांपर्यंत असतो. पुरूषही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत स्त्रियांच्या जगणय़ाभोवती असलेल्या कृत्रिमतेच्या विळख्यात पुरूषही सापडले आहेत.

गोर्‍या रंगाचे आकर्षण भारतात ब्रिटीश राजवटीपासून रूजले, जेत्यांचा रंग आपल्यालाही लाभावा यासाठीच्या आकांताला सौंदर्यस्पर्धांमधल्या विजेत्या युवतींनी जाहिरातींमधून खतपाणी घातले.  ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपयांवर वर होता ,तो दरवर्षी १८ % इतक्या वेगाने वाढतो आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन अशा जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने मात्र ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे.’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची प्रचारकर्ती नंदिता दास म्हणते, आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या. आपण सुंदर, आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी  ही साधी सहज मानवी भावना आहे. त्यात काहीही गैर नाही पण ही भावना आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपल्या मनांमधे कधी डोकावणार की नाही !

तुलनेने इतर देश आता या संदर्भात बदलू लागले आहेत. नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी दोन वषापूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. पुरूषसत्ताक समाजाने निर्माण केलेली ही स्पर्धा आहे या भावनेतून आजच्या सुविद्य मुली यापासून काहीशा दूर राहायला लागल्या आहेत. मिस ग्रेट ब्रिटन साठी गेल्या वर्षी फक्त एका भारतीय वंशाच्या मुलीची प्रवेशिका आली होती. तरूणाईने दर्जेदार व्यक्तिमत्व स्पर्धा जरूर गाजवाव्यात परंतु तथाकथित सौंदर्याच्या छोट्य़ा आणि कोत्या व्याख्यांपलीकडे जाऊन स्वत:ची रेघ मोठी करावी. संस्कॄतीतल्या उत्तम मूल्यांशी तडजोड न करता आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्य़ाचे आव्हान पेलायला हवे. भारतीय स्त्रीने खुज्या आणि तकलादू स्पर्धांच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या आंतरिक सौंदर्याची मोहोर जगावर उमटवता येईल इतकी उंची गाठायला हवी.

('दिव्य मराठी' मध्ये कॅन्व्हास पानावर प्रसिद्ध झालेला लेख )