Wednesday, April 4, 2012

भारतीय स्त्री आणि राजकारण


"बहुमताने निवडून आलेल्या नगरसेविका xxxताई यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत." सत्कारसभेत घोषणा होते. ताई उठतात, डोक्यावरचा पदर सारखा करतात, नजर धरणीला भिडवतात आणि कापर्‍या आवाजात म्हणतात,"मी आपल्या सर्वांची आभारी आहे, धन्यवाद." मग त्यांचे पतीराज माईक हातात घेतात आणि ताईंच्या वतीने भाषण ठोकतात. महिलांच्या नावावर पुरुषांनीच खरा कारभार चालवावा याचे हे सर्रास दिसणारे चित्र. हळूहळू यात बदल होऊ लागला असला तरीही राजकारणात प्राथमिक पातळीवर मात्र अशा अनेक चाचपडणार्‍या ताई आहेत. बहुतेक जणी आपल्या घरातील पुरूषांची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजीखुशीने स्वत:चा प्यादे म्हणून वापर करू देत आहेत. ही संधी त्यांना महिलांचा विकास किंवा उन्नती व्हावी म्हणून दिली गेली नसून महिला राखीव मतदारसंघांमुळे नाईलाजाने मिळाली आहे. एरवी निवडणुकात खुल्या प्रवर्गात महिला उमेदवारांची संख्या कमीच आढळते. कॉंग्रेस किंवा भा.ज.प सारख्या महिला आरक्षणाला (वरवर तरी) पाठिंबा दाखवणार्‍या पक्षांकडूनही महिलांना जास्त प्रमाणात उमेदवारी दिली जात नाही. मतदार म्हणून सुद्धा निर्णयाचा अधिकार फार कमी स्त्रियांना आहे. बहुतेक वेळा घरातल्या पुरुषांचा कल असेल त्या पक्षाला मतदान करणे हा पर्यायच त्या निवडताना दिसतात.

राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्य जनतेचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. त्यामुळे महिला त्यातल्या पैशाच्या,सत्तेच्या खेळातील गळेकापू स्पर्धेत उतरायला कचरतात आणि "उतरवल्या गेल्याच" तर त्यांचे महत्व सहीपुरते असते. विवीध समितींच्या सभांमधे लोकनियुक्त महिला प्रतिनीधींचे पती किंवा इतर पुरूष नातेवाईक खुर्च्या बळकावून बसतात आणि या महिलांना बसायला मिळणे सुद्धा अवघड होते ही वस्तुस्थिती आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर एका महाशयांनी आपल्या उमेदवार पत्नीच्या नावाशेजारी सरळ स्वत:चेच फोटो छापून घेतले होते. माजघरातील राबडीदेवींना थेट मुख्यमंत्रीपदी बसवणार्‍या लालूजींना आपण आदर्श मानतो असे ही वर सांगायला ते विसरले नव्हते.

भारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी आहे परंतु राजकारणातील महिलांच्या सहभागाबाबत जगभरातील संसदांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार भारताचा क्रमांक १०५ वा आहे. युगांडा, टांझानिया अशा मागासलेल्या देशांसह पाकिस्तानसुद्धा या बाबतीत भारताच्या पुढे आहे. लोकसभेत व राज्यसभेत महिलांचे प्रतिनिधित्व जेमतेम १० ते ११ टक्के आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधे महिला आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत पोचले ही जमेची बाजू असली तरी संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठीचे विधेयक गेल्या १६ वर्षांपासून मंजूर झालेले नाही. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष अशा पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय राजकारणात स्त्रियांचे महत्व आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. १९२५ मधे सरोजिनी नायडूंनी कॉंग्रेसचे प्रतिनिधीत्व केले, इंदिरा गांधी १९६६ मधे पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. देशाच्या अतिशय महत्वाच्या पदावर एक धडाडीची स्त्री आपली छाप उमटवू शकली ते पं.नेहरूंनी आपल्या मुलीला आपला राजकीय वारस मानून सर्वार्थाने घडवले म्हणूनच. सर्वसामान्य भारतीय स्त्रियांचे त्या प्रतिनिधीत्व करत नव्हत्या. राष्ट्रपतीपदावरील प्रतिभाताई सोडल्या तर पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात देखील आजवर राज्यपातळीवर नेतेपदावर पोचू शकलेली सुप्रिया सुळेंसारखी एखादीच स्त्री आहे.(उद्या कुणा एकाची निवड करायची वेळ आली तर चुलतभावासाठी त्याग करायचे औंदार्यही त्यांना दाखवावे लागू शकेल) कुणाही प्रथितयश राजकीय नेत्याची सून किंवा मुलगी नसूनही स्वप्रज्ञेवर राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या स्त्रियांची संख्या एकंदरीत नगण्य़ आहे. पक्षातील पुरूषी वर्चस्वाला स्त्रिया सहसा आव्हान देऊ शकत नाहीत. स्वत:चा नवीन पक्ष काढला तरच या स्त्रिया आपले नेतृत्वगुण सिद्ध करू शकतात. जयललीता किंवा ममता बॅनर्जींचे उदाहरण बोलके आहे.

बहुतेक राजकीय पक्षात महिला कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. सुषमा स्वराज, वृंदा कारंत, मेहबूबा मुफ्ती किंवा शीला दीक्षित यासारख्या मोजक्या महिलांचे अपवाद वगळले तर ज्या महिलांमधे विशेष क्षमता असते त्या महिलांना फारतर महिला गटापुरते नेतृत्व किंवा महिलांशी संबंधित प्रश्नापुरते (उद: दारूबंदी..खरे तर हा प्रश्न पुरूषांच्या अधिक जवळचा आहे) व्यासपीठ दिले जाते. महागाईसारख्या गृहिणींशी संबंधित समस्यांना शस्त्र म्हणून सत्ताधार्‍यांविरूद्ध वापरण्यासाठी या महिला आघाड्यांचा वापर केला जातो. यात गैर काही नसले तरी यापलीकडच्या मुद्यांसाठी पक्षाचे नेतृत्व करण्याची मुभा महिला कार्यकर्त्यांना अपवादानेच मिळते. पक्षश्रेष्ठी अगदी महिला असली तरीही, आणि ते जर पुरूष असतील तर मग राजकारणात वर्चस्व पुरूषांचेच.

राजकारणात थोडीफार संधी मिळालेल्या स्त्रिया त्यात मुरल्या की आपण पुरूषांपेक्षा मागे नाही हे दाखवून देत आहेत. निदान काही महिला तरी स्वकर्तृत्वावर सत्तेची सूत्रं हळूहळू हाती घेऊ लागल्या आहेत. दादा-भाईंप्रमाणेच मोठमोठाले फ्लेक्स लावून काही स्त्रिया भाषणबाजी करताना दिसू लागल्या आहेत. राजकारणाची ही अपरिहार्यता असलीच तर ती स्त्रियांनीही स्वीकारली आहे. मात्र अवगुणांच्या बाबतीतही काही स्त्रिया राजकारणाला कुरण मानणार्‍या कित्येक पुरूष नेत्यांच्या तुलनेत मागे नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते. मायावती, कनीमोळीवरील भ्रष्टाचारांच्या आरोपातील आकडे डोळे फिरवणारे आहेत. बर्‍याच उच्चपदावरील स्त्रिया पक्षांतर्गत राजकारणात इतर प्रतिस्पर्धी स्त्रियांचे पाय ओढण्यात पुढे असतात.

तरीदेखील मूल्यांची चाड तुलनेने स्त्रियांमधे बर्‍यापैकी शाबूत आहे आणि म्हणूनच त्यांचा राजकारणातला वाढता सहभाग गढूळलेल्या राजकारणाचे काही अंशी शुद्धीकरण करू शकेल. केवळ लोकशाहीच्याच नव्हे तर सामाजिक सक्षमीकरणासाठी स्त्रियांना समान राजकीय प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे आणि निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभागही वाढवणे आवश्यक आहे. समाजाने आजवर दडपून ठेवलेला त्यांचा न्याय्य हक्क त्यांना देणे म्हणजे उपकार नव्हेत. असे घडले तर आज पुरूषाचे बोट धरून ते नेतील त्या दिशेने धडपडत चालणार्‍या स्त्रिया लवकरच (संसदेत अद्याप न मिळालेल्या) आरक्षणाच्या कुबड्या फेकून स्वबळावर आपली दिशा निश्चित करू शकतील. हा बदल भारतीय राजकारणाला निश्चितच सुदृढ करेल.

Photo Courtesy - Google
for noncommercial use

Tuesday, March 27, 2012

ग्रेस



ग्रेस गेले. त्यांच्या साहित्यातल्या लखलखत्या अक्षर प्रतिमांनी पुन्हा पुन्हा चकित होणे एवढच त्यांच्या शब्दांवर प्रेम करणार्‍या रसिकांच्या हातात उरलय. एकीकडे "समजायला अतिशय कठीण", "निव्वळ शब्द-अभियांत्रिकी" अशी टीका ग्रेस यांच्या काव्यावरती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झाली आहे तर दुसरीकडे त्या गूढार्थाच्या शोधात कविताप्रेमी रमून गेले आहेत. ग्रेस स्वत: देखील म्हणत "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही." अनेकदा वाटतं की ग्रेस संपूर्ण कळतातच असं नाही, किंबहुना बहुतेक वेळा  अजिबात कळत नाही पण एखादी प्रतिमा, एखादा शब्द वाचकाला असा काही भारुन टाकतो की तो खुळावल्यासारखा त्या कवितेच्या मागे मागे जात राहतो. तिच्याबरोबरच कुठल्याशा गूढ डोहात सूर मारुन हाती लागलेले अर्थाच्या शक्यतांचे शिंपले चाचपडतो. त्यातून मोती निघाला तर मात्र त्या कवितेतून मुक्ती नाही. 

इन्ग्रिड बर्मन या अभिनेत्रीविषयी वाचलेल्या ’शी इज इन ग्रेस’ या प्रतिक्रियेने संमोहित होऊन माणिक सीताराम गोडघाट्यांनी 'ग्रेस' हे साहित्यिक नाव धारण केले असं म्हणतात. "संध्याकाळच्या कविता " या इ.स. १९६७ साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहामुळे चर्चेत आलेल्या ग्रेस यांचं वेगळेपण हे केवळ त्यांच्या शब्दातच नाही तर अवघ्या व्यक्तिमत्वात होतं. "राजपुत्र आणि डार्लिंग","चंद्रमाधवीचे प्रदेश","सांध्यपर्वातील वैष्णवी" मधल्या कवितांमधूनच नव्हे तर ललितलेख संग्रहांच्या अर्पणपत्रिकेपासून ते जाणवतं.
"मितवा" च्या सुरूवातीला ते लिहीतात " हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाहिये; मितवा मी अर्पण करतोय;
अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना."
तर "मृगजळाचे बांधकाम" अर्पण करताना ते लिहीतात "अर्पण, तर्पण, समर्पण आणि दर्पण (ही) यांचे, या सर्वांचे काही वेगळे अर्थ, अनर्थ असतात काय ? संभवतात काय ?" ’वार्‍याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना गतवर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तरीही रसिकप्रेमाचे वलय लाभले ते त्यांच्या कवितेला.

त्यांच्या कवितेवर भाष्य करावे एवढी माझी प्रज्ञा आणि प्राज्ञा नाही. आकलन आणि अनाकलनीयतेच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा मोह पाडणारे या कवितेत आहे तरी काय असा प्रश्न मात्र प्रत्येक रसिक मनाला नक्कीच पडत असेल.
शब्दचित्र उभे करणारी प्रतिभा हे ग्रेस यांचे वैशिष्ट्य..
"अन पाणवठ्याच्या पाशी खचलेला एकच वाडा
मोकाट कुणाचा तेथे कधी हिंडत असतो घोडा"

किंवा "घर थकलेले संन्यासी हळु हळु भिंतही खचते
आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते"

किंवा "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता"
अशा ओळी आधी त्या स्थळी आणि नकळत कवितेच्या आशयाकडे आपल्याला घेऊन जातात..

"दुःखाचा महाकवी " असं ज्यांना म्हटलं गेलं त्या कवीच्या कवितेतले दु:ख वास्तव आणि स्वप्न याच्या गुंत्यात आपल्याला अडकवते. एक समीक्षक म्हणतात,"त्यांच्या कवितेतली दु:खाची नक्षी वाचकाला भूल घालते, दु:ख नव्हे" परंतु मला वाटतं त्यांनी मांडलेली दु:खाची रूपं आपल्याला स्वा-नुभवाच्या पातळीवर अस्सल वाटू लागतात. दु:खाच्या प्रतिमा तर थेट मनाच्या तळाला जाऊन भिडतात.

"दु:ख भराला आले म्हणजे चंद्र नदीवर येतो
पाण्याचे ही अस्तर सोलून बिंब तळाला नेतो"

किंवा ग्रेस यांचे नाव काढताच आठवणार्‍या या ओळी..
"पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने"

किंवा "पक्षी पक्षी व्याकुळ व्याकुळ रूतवुनि काटा उर अभंग
दग्ध मुलीचे विदग्ध हसणे संध्येपाशी एक तरंग"
अशी विकल स्थिती असो.

कविता आपल्या अनुभवविश्वाला चाटून जाते तेव्हा ती कळल्यासारखी वाटते, ती संपूर्णपणे कळणे कदाचित कवीलाच शक्य आहे पण ग्रेसच्या कवितेतून झिरपणारे औदासिन्य आपल्या मनात अलगद पोचते
.
"अशी ही उदासी मला घेरणारी , जडावातल्या केशराची कळी
तिथे मावळे सूर्य माझा विरागी, जिथे फाटलेली दिसे पोकळी"

किंवा "वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करूण उभे की, सांज निळाईतले"

आणि या ओळीतले करूण सत्य तर प्रत्येकालाच पटणारे
"नाहीच कुणी अपुले रे , प्राणांवर नभ धरणारे
दिक्काल धुक्याच्या वेळी ,हृदयाला स्पंदविणारे"

ग्रेस यांच्या काही कवितांमधून सौंदर्यपूर्ण शब्दरचनेबरोबरच लोककथा, पुराणातले संदर्भ प्रतिमांच्या रूपाने समोर येतात. संस्कृती आणि सृजनामधला दुवा सांधतात. त्यातल्या नावीन्याने, लयबद्धतेने आपणही नादावतो.
"न्हात्याधुत्या कुंवारणी नदीपाशी दंग
पैंजणाने नादावती सोनियाचे अंग"

किंवा "केरळी चंदनी वारा तू सांग एवढे साधे
मोगरी चांदणे टिचले की तुझ्या बिल्वरी राधे"

किंवा "असुनी तुझा मी तुझी दूरता तुला झाकितो काल
सांग उर्मिले, कुणी बांधिले नयनी चंद्रमहाल"

या सगळ्या प्रतिमांच्या शब्दकळांमधे आपण केव्हाच गुरफटून जातो..

मात्र या सगळ्यापलीकडली जी देहातीत भावना ग्रेस यांच्या कवितेच्या गाभ्याशी दिसते.. त्याबद्दलचे माणसाला असलेले कुतूहल आणि त्याला मिळणारे परिणामकारक शब्दांचे कोंदण आपल्याला त्या कवितेशी अक्षरश: जखडून टाकते..

"मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकु येतो पावा"

हे वाचताना आपण स्तब्ध होतो. सृजनाचा स्त्रोत मात्र अखंड वाहत राहणार हे कविता सांगते या ओळीतून
"ते झरे चंद्र सजणाचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया"

ग्रेस यांच्या कवितेचा शोध त्यांच्याबरोबर संपणारा नाही आणि तो संपत नाही यात त्या कवितेची दुर्बोधता नव्हे तर अलौकिकत्व सामावले आहे असे मला वाटते. ग्रेस यांना कवितेतून खुद्द कवितेला हेच सांगायचं असेल का !....
"मी खरेच दूर निघालो ,तू येऊ नको ना मागे
पाऊस कुठे तरी वाजे, हृदयाचे तुटती धागे"

Tuesday, March 13, 2012

जपान


उगवत्या सूर्याचा देश- जपान
त्सुनामी आणि प्रलयकारी भूकंपाच्या धक्क्यातून जपान वेगाने सावरतो आहे. हुंदक्यांपासून हिमतीकडे जपानचा प्रवास सुरू आहे अशा तेथे परतलेल्या मूळ भारतीय नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत. पुनर्वसनासाठी अनेक स्तरावर यशस्वी प्रयत्न केल्याची ग्वाही त्यांचे पंतप्रधान नोडा यांनी दिली आहे. त्सुनामीच्या तडाख्याने जपान देश कोलमडला त्या घटनेला ११ मार्च २०१२ ला एक वर्ष पूर्ण झालं. भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेले अणुभटट्यांमधील स्फोट आणि किरणोत्सर्ग यामुळे घबराट पसरली होती. १९ हजाराहून अधिक नागरिक या घटनेत मृत्यु पावले. ही नैसर्गिक आपत्ती होती पण त्याआधी देखील एका मानव-प्रणित विनाशाला जपानला तोंड द्यावं लागलं होतं. अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ मध्ये हिरोशिमावर तर ९ ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉंब टाकला. जपान बिनशर्त शरण आला. दुसरं महायुद्ध थांबलं. परंतु अणुबॉंबमुळे सुमारे सत्तर हजार माणसं मृत्युमुखी पडली तर नंतर त्याच्या दुष्परिणामांनी दोन लाखांहून अधिक माणसे दगावली. त्याचे मानसिक, आर्थिक परिणाम त्या देशाची राखरांगोळी करून गेले. मात्र जगाच्या सहानुभूतीचा फायदा घेत- अमेरिकेच्या नावाने बोटे मोडत- सूडाचे राजकारण करण्यात धन्यता न मानता त्या राखेतून जपानने फिनीक्स पक्षासारखी भरारी घेतली हा इतिहास सर्वश्रुत आहे.

आपत्तीला तोंड देऊन पुन्हा प्रगतीकडे झेप घेण्याची जपानी जिगर आपल्याला थक्क करते. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती आणि जपानची महायुद्धातील पराभवानंतरची नवनिर्मिती या साधारण एकाच कालखंडातल्या घटना. मग आपलं बाळ अजून रांगतच आहे आणि त्यांच्या बाळाने सळसळत्या तारूण्यात पदार्पण केलं ते का! यामागचं गुपित जपानकडून आता तरी आपण जाणून घ्यायला हवं. संकटात माणसाचा खरा कस लागतो असे म्हणतात, अंधारातही जो चोरीचा मोह टाळतो त्यालाच प्रामाणिक म्हणायला हवे. त्सुनामी नंतर ज्या बातम्या येत होत्या त्या खरोखर विलक्षण वाटाव्या अशा आहेत. जपानी लोकांच्या सामाजिक वर्तनाचा तो हृद्य आविष्कार आहे. भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी जे लोक निरनिराळ्या दुकानात खरेदी करत होते , त्यांच्या लक्षात आले की वीजपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हा लोकांनी ज्या वस्तू उचलून घेतल्या होत्या त्या परत त्या त्या ठिकाणी नेऊन ठेवल्या. कोणीही कोणत्याही प्रकारची चोरी करण्याचा किंवा दुकानातून माल लुटण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांना रस्त्यात अडकून पडावे लागले तरी कोणीही सिग्नल तोडण्याचा किंवा पुढे घुसण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे आपत्तीव्यवस्थापन कोणत्याही गोंधळाविना, चेंगराचेंगरीविना, अफवांनी भयभीत न होता तत्परतेने सुरू झाले. या साध्या उदाहरणांवरून जपानकडून आपण खूप काही शिकायला हवं आहे असं प्रकर्षाने जाणवतं.

आज आपण चिनी वस्तूंनी काबीज केलेली बाजारपेठ पाहतो पण त्या वस्तूंच्या गुणवत्तेची आपल्याला मुळीच खात्री नसते. या उलट "मेड इन जपान" या शब्दाचा दुसरा अर्थ जणू गुणवत्ता असा होतो. केवळ व्यवसायातच नव्हे तर दैनंदिन जीवनात, शाळा-महाविद्यालयात, कचेरीत, अगदी घरातदेखील जपलेली गुणवत्तापूर्ण जीवनशैली हे जपान्यांचे वैशिष्ट्य आहे. तिचं नाव ’काईझेन’. काम अधिक चांगले, सोप्या पद्धतीने, कमी श्रमात, कमी वेळेत व कमी खर्चात करता यावे म्हणून जे बदल केले जातात ते म्हणजेच काईझेन. या निरंतर सुधारणेचा ध्यास चपराशापासून अधिकार्‍यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत प्रत्येक जपानी व्यक्तीला आहे पण तो भावनेपुरताच मर्यादित नाही तर कृतीतून दिसतो. याउलट भारतीयांचे देशप्रेम त्यांच्या भावनांमधून ओथंबून वाहते, प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. जपानी माणसांचे देशप्रेम अंत:प्रेरणेतून निर्माण झालेले आहे. ते घोषणांमधून नव्हे तर प्रत्येक बाबतीतील "सुनियोजितता, सुव्यवस्था, स्वच्छता, सद्व्यवहार आणि स्वयंशिस्त" या पंचसूत्रीतून सहजगत्या प्रकट होते. रत्न, तलवार आणि आरसा या ३ गोष्टींना जपानमध्ये महत्व आहे. रत्न हे समृद्धीचे, तलवार हे सामर्थ्याचे तर आरसा हे आत्मपरिक्षणाचे प्रतीक आहे.

जपान हा देशच मुळी एका धाग्यात बांधला गेला आहे. उदाहरण द्यायचे तर तेथे देशभरच्या सगळ्या शाळांतून एकच धडा एकाचवेळी शिकवला जातो. त्यामुळे देशभर कोणत्याही दिवशी त्या त्या वर्गातील मुलेमुली सारखेच शिक्षण घेत असतात. जपानचे सरकार शिक्षणाचे धोरण विचारपूर्वक राबवते. त्यामुळेच आज शंभर टक्के साक्षर, नुसता साक्षर नव्हे तर सुशिक्षित असलेला जपानी समाज प्रगतीपथावर पोहोचला आहे. भारताप्रमाणेच तेथेही प्रामुख्याने स्त्रिया मुलांना वाढवतात. त्यासाठी आधी स्त्री सुशिक्षीत असणे गरजेचे आहे, नव्हे तिने शिक्षित असलेच पाहिजे असे ठरवून स्त्री-शिक्षणावर भर दिलेला आहे. इंग्रजीच्या आक्रमणाला दाद न देता जपानी भाषेने आपला समृद्ध वारसा जपला आहे. सगळे शिक्षण, अगदी उच्च तांत्रिक शिक्षणही जपानीत आणले गेले. बाहेरचे ज्ञान स्वतःच्या भाषेत आणताना शब्दांचा क्लिष्ट अनुवाद माथी मारण्याचा अट्टाहास न करता कितीतरी आधुनिक शब्द जसेच्या तसे जपानीत आणून त्यासाठी सरळ वेगळी लिपी वापरात आणली गेली आहे. जपानच्या सक्षमीकरणात भाषेच्या, शिक्षणपद्धतीच्या एकजिनसीपणाचा महत्त्वाचा वाटा आहे.

जपानमधे बराच काळ वास्तव्य केलेल्या प्रसिद्ध मराठी लेखिका सानिया यांचे जपानविषयीचे निरीक्षण नोंद घेण्यासारखे आहे. त्या निरीक्षणातच जपानच्या प्रगतीशील, विजीगिषु वृत्तीचे मर्म आढळून येते. सानिया म्हणतात "जपानी भाषेमध्ये ‘वाताशी’ या शब्दाचा अर्थ ’मी’ असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ’वाताशी’ या शब्दाचा उपयोग करतात. जिथे मी आवश्यक असतो तिथेही ‘वाताशी’ शिवायच क्रियापद वापरता येते. ’वाताशी’ कमीतकमी वापरणारी जपानी माणसे ’मी’पेक्षा सतत ’आम्ही’ असा विचार करत असतात. व्यक्तीपेक्षा कुटुंब, समूह, समाज, देश अधिक महत्त्वाचा असे त्यांनी मानले आहे. जपानमधे राहताना हे पावलोपावली दिसते." याचा अर्थ जपानमधे सगळे सत्पुरूषच राहतात असे नाही पण जगात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या मोजक्या देशांपैकी हा एक आहे. औद्योगिकीकरणातून निर्माण होणार्‍या चंगळवादी जीवनशैलीच्या प्रभावामुळे जपानी जनजीवनात देखील आंतरिक अस्वस्थता काहीशी वाढू लागली आहे. अधूनमधून काही अप्रिय घटना घडतायत परंतु काय चुकते आहे, तरूणांचे प्रश्न काय आहेत, मूल्ये का बदलतायत याचा सर्वांगानी विचार केला जातो. त्यामुळे एक प्रकारची शांतता, विश्वास जनमानसात भिनलेला असतो.

परिवर्तनाची सुरूवात अंतर्मनापासून होते हे जपानी लोकांना कळले आहे, आपल्याकडे अनेक थोर पुरूषांनी हे तत्त्व आचरणात आणले आहे पण सर्वसामान्य जनतेत ते तत्त्व जपानसारखे का रूजू शकले नाही याचा विचार व्हायला हवा. अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते. कित्येक आपत्तींच्या काळोखातून उमेदीचा-प्रगतीचा झळाळता सूर्य जपानमधे पुनश्च, निरंतर उगवतो आहे या अर्थी त्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल.