Monday, June 22, 2026

नर्मदे हर - अमरकंटक

 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी एवं समकालीन वैचारिक परिदृश्य’ हा अभ्यास वर्ग जूनमध्ये अमरकंटकला ठरला. इतक्या दूर जावं की नं जावं विचारत पडले पण अनायासे नवीन शिकण्याची आणि बघण्याची संधी गमवायची नव्हती. महेशला सुट्टी असल्याने घरची काळजी नव्हती. निकिताची कंपनीही होती पण एकाही गाडीचं आरक्षण उपलब्ध नाही. शिवाय थेट गाडी नाही. गुगल करून आकडेमोड केली आणि म्हटलं ’देख लेंगे’. काळजी करायला ही काही कुटुंबाची ट्रीप नव्हती. केळकर सरांनी नागपूरहून अमरकंटकला कारने जाऊया म्हटल्यावर निदान जाण्याचा प्रश्न सुटला. बरोबर सँडविच, ठेपले घेतले होते. जंगलातल्या डोंगरावर असलेल्या या स्थळाच्या माथ्यावर पोचायचं होतं. हजारएक मीटर उंचीवर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर मैकल, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या सान्निध्यात कुठेशी अमरकंटक वसलेलं आहे,  ते भारतातलं अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं एवढीच माहिती या स्थानाबद्दल होती. त्याचं एक कारण तिथलं नर्मदानदीचं उगमस्थान. तर निघालो. 

नागपूरच्यापुढे पेंच अभयारण्य पार करून जबलपूरमार्गे घटीया, बिछीया अशी याकारांत गावं ओलांडत कार जात होती. मध्यप्रदेशातली खेडी अपेक्षेपेक्षा स्वच्छ, बरीच घरं पांढर्‍या रंगात रंगवलेली अशी नेटकी पाहून आश्चर्य वाटलं. जसजसं अमरकंटक जवळ येऊ लागलं, तसतसं परिसरातली घनदाट वनराई , वनराई नसून जंगल आणि मोहक वाटणार्‍या डोंगररांगा गूढ वाटू लागल्या. रस्त्यातून सुर्र्कन जाणारे ससे आणि लांबून चमकणारे कोल्ह्याच्या पिल्लांचे डोळे दिसू लागले. समोरुन दहा-पंधरा मिनीटांनी एखादीच गाडी येत होती. मागे एकही दिसत नव्हती. इथे गाडी बंद पडली तर ! पुन्हा मनात.. ’देख लेंगे’

नऊ साडेनऊ तासांनी अभ्यासवर्गाच्या जागी म्हणजे अमरकंटकजवळच्या भव्य इंदिरा गांधी जनजातीय विश्वविद्यालयात पोचलो. सोय उत्तम होती. शुद्ध गोड हिंदी बोलणार्‍या आयोजकांनी स्वागत केलं. गरमागरम जेवलो. एक एक गाड्या येऊ लागल्या होत्या. दमल्याने अनौपचारिक काव्य संमेलनात श्रोता म्हणून सहभागी व्हायचंही त्राण उरलं नाही. गाडी घ्यायला येईतो बरं दिसणार नाही म्हणून दोन तीन कविता ऐकल्या. इंदोरच्या वाणीने (महिला) स्वत: गाऊन सुंदर स्वरचित शारदास्तवन सादर केलं. मग एका प्राध्यापकांनी एक न-कविता सादर केली. ’आदमी दौ कौडीका’ असं ध्रुवपद आलं की ते 'आदमी?' म्हणत आणि आम्ही कोरसमध्ये ’दो कौडीका’ म्हणायचो. ती कविता संपल्यावर मनोमन हुश्श् केलं. केळकर सरांनी झकास वात्रटिका आणि निकिताने एक जोशपूर्ण कविता गाऊन सादर केली. दरम्यान न-कवितावाले ’एक और नज्म’ का काहीतरी म्हणत पुन्हा सरसावले तेव्हा ’देख लेंगे’ चा धोका न पत्करता मी चतुराईने गाडीत जाऊन बसले.  

भव्य विद्यापीठ परिसरातल्या तिमजली ट्रान्झिट क्वार्टरमध्ये राहण्याची व्यवस्थित सोय केलेली होती पण आम्ही दोघी म्हणजे एकूण चार कौड्या तिथे पोचेतो वीज गेलेली. साहजिक लिफ्ट बंद. एक बेडूक उडी मारून अंगावर. मग आमचा कलकलाट. टॉर्च लावायचा तर मोबाईलपण एका काडीवर आलेला. पुन्हा एकदा मनात ’देख लेंगे’ म्हटलं. पण काय देखणार कारण अंधार गुडुप. तेवढ्यात वीज आली . ट्न्न आवाज करुन जीव भांड्यात पडला. हलका पाऊस पडून गेल्याने  हवेत रात्री गारवा होता त्यामुळे शांत झोप लागली. 

सकाळी ठरल्या वेळी कुलदीप घ्यायला आला. न्याहारी करून अभ्यासवर्गाच्या सभागृहात पोचलो. देशभरातून सत्तरेक लोक आले होते. महिला कमी होत्या. बीजभाषण उत्तम झाले. पाठोपाठ एक एक सत्र सुरू झाली. उत्तम हिंदीतून सगळे वक्ते अभ्यासपूर्ण बोलत होते. निकीताला इतकी हिंदी ऐकायची सवय नसल्याने एका सूचनेचा तिने अर्थ विचारला. ’वॉशरूम इज अपस्टेअर्स’ हा अर्थ ऐकताच ती हसत बसली. 

’भारतीय साहित्य की मूलदृष्टी’, ’भारतीय साहित्यपर वैश्विक प्रभाव’, ’समकालीन वैचारिक परिदृश्य’ इ, विषयांवर सविस्तर आणि दीर्घ उद्बोधन व नंतर प्रश्नोत्तरं होत होती. (अभ्यासवर्गाचा दर्जेदार आशय हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) भोजनव्यवस्था चांगली होती पण मेसचं असल्याने असेल सगळ्या मसाल्यांची चव एकसारखी होती. कोफ्ता करी असो वा आलूवडा वा दाल, डोळे मिटले तर काय खातोय हे ओळखू यायचं नाही त्यामुळे आपण फारच आध्यात्मिक झालो काय असं वाटू लागलं. खरं तर हा प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नव्हतं, तर साहित्य, निसर्ग, अध्यात्म आणि शांतता याचा एकजिनसी अनुभव होता. (कदाचित म्हणूनच पदार्थांची चव एकसारखी लागत असावी 😊 ) 

रविवारी कितीतरी दिवसांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. न्याहारी करून पुन्हा सत्रांना सुरुवात झाली. कालच्या विषयांचे उर्वरित मुद्दे व सारांश असं आजचं स्वरूप होतं. प्रत्येक सत्राआधी विस्तृत पुस्तक परिचय होता. बंगालच्या ’आनंदमठ’ पासून आंध्रातील प्रख्यात ’पोतन्ना’ भागवतापर्यंत विविध पुस्तकं जवळून कळली. तेलंगणाच्या एका विद्वानांनी पोतन्ना भागवत त्यातल्या वृत्तबद्ध रचनांच्या उदाहरणासह त्यांच्या द. भारतीय हेलातल्या हिंदीमध्ये इतकं भन्नाट सादर केलं की तेलुगुतले काही संदर्भ समजत नसूनही सगळे दंग होऊन ऐकत राहिले. 

समारोपीय सत्र संपताच एकमेकांचे संपर्क नोंदवून, जेवून, सामान डिकित टाकून सर्वांचा निरोप घेतला. 

------------

रात्री एक वाजता बिलासपूरहून ट्रेन होती. तिथे पोचायला साडेआठला पेंड्रा रोड नामक स्टेशनपासून गाडी होती. मधल्या वेळात अमरकंटक दर्शन करायचं ठरलं. गीतांजलीचं आरक्षण अद्याप वेटिंग होतं. ती काळजी दर्शवताच सोबतचे दिनेशजी म्हणाले, "मोहिनीजी, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." त्यामुळे ’देख लेंगे’ म्हणत विद्यापीठ सोडलं. वाटेत दोन तीन मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जलेश्वर महादेव हे मंदिर बारावं ज्योतिर्लिंग असल्याचा दावा करत होतं. एक भाग छत्तीसगडमधला लागे तर पुढचा भाग म. प्रदेशातला त्यामुळे आता नेमकं कोणत्या राज्यात आहोत हे पाहणं सोडून दिलं. एक गोष्ट कॉमन होती. निसर्गाची समृद्धी. दर्शनार्थी टिपीकल उत्तर भारतीय. भांगात सिंदूर भरलेल्या आणि ब्रोकेडच्या चकचकीत साड्यांमधल्या बायका. हाताशी लागतील ते कपडे घातलेले पुरूष. स्वस्त फिल्मी कपड्यातल्या सावळ्या तरूण मुली. भडक रंगवलेल्या मंदिरांच्या परिसरात जिकडे तिकडे लाल चुनरींच्या गाठी बांधलेल्या. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल फोन आणि देवाला पार्श्वभूमीवर ठेवून सेल्फी काढायची धडपड. एक माणूस तर डोकं पिंडीवर टेकलेलं आणि बुबुळ फोटो काढणार्‍याकडे फिरवलेलं अशा चमत्कारिक स्थितीत बराच वेळ होता. बटबटीत सजावट, भक्तांचं मोठमोठ्याने बोलणं, घंटा बडवणं, बाहेर खेळणी, जांभळं, पूजेचं सामान विकणार्‍यांचा कोलाहल यामुळे प्रसन्न वाटेना. 

अनुपपूर जिल्ह्यातल्या अमरकंटकमध्ये प्रवेश करताना मात्र पर्यटनातून आलेली समृद्धी आणि वेगळीच शांतता जाणवू लागली. टोकदार डोंगरांच्या माथ्यावरचं ईश्वरी आलय या अर्थाने अमरकंटक नाव पडल्याचं सांगतात. कालिदासाच्या साहित्यात याचा ’अमरकुटा’ असा उल्लेख आहे, ज्याचा अमरकंटक अपभ्रंश झाला असंही ऐकलं. शिव-पार्वतीने इथे तपस्या केली होती असं मानतात त्यामुळे याला तीर्थराज मानलं जातं. नर्मदेबरोबरच हे सोन आणि जोहिला या नद्यांचंही उगमस्थान असल्याचं तिथे गेल्यावर कळलं. यातली जोहिला बघण्याचा काही योग आला नाही. या नद्यांविषयी एक आख्यायिका कळली ती थोडक्यात -

अमरकंटक नावाच्या राजाला नर्मदा नावाची सुस्वरूप मुलगी होती. राजाने तिचा विवाह शोण ‍(सोन !) राजाशी ठरवला. विवाहाच्या वेळीच त्यांची प्रत्यक्ष भेट होणार होती. परंतु आपला मृत्यू जवळ आल्याची राजाला जाणीव झाल्याने त्याने घाईघाईने नर्मदेला राज्याभिषेक करून राज्यकारभार तिच्या हाती सोपवला. राजा निवर्तला. कालांतराने आधीच ठरलेला विवाह पार पडावा म्हणून प्रतीकात्मक आपली अंगठी झोला (जोहिला !) नावाच्या दासीबरोबर तिने शोण राजाकडे पाठवली. झोला दासीच नर्मदा आहे असं समजून त्यानं तिचं प्रेमाने स्वागत केलं. झोला धूर्त होती. संधीचा फायदा घेऊन तिने विवाह उरकून घेतला. इकडे वाट पाहून नर्मदेने शोण राजाकडे जाण्याचा निर्णय घेतला. झोलाने तिची ओळख नाकारली. खिन्न मनाने नर्मदा तिथून निघाली पण परत न जाता मैकल पर्वतावर ध्यानस्थ बसून शंकराला प्रार्थना केली. त्या समाधीत नर्मदा देहरूपाने विरघळली आणि पाण्याच्या रूपाने खाली वाहू लागली. नर्मदा नदी झाली.. भारतातील सर्वात प्राचीन नदी. चंद्रवंशातल्या पुरुखा राजाने तपश्चर्या करून शिवशंकराला प्रसन्न केले. त्याने मागितलेल्या वराप्रमाणे शिवशंकराने नर्मदेला पृथ्वीवर पाठवले. अशीही तिच्या उत्पत्तीविषयी आणखी एक कथा ऐकली. 

नर्मदेवरच पीएचडी केलेल्या दिनेशजींचं वाक्य आठवलं- गंगा धर्म का, जमुना प्रेम का, नर्मदा भक्ती का, गोदावरी तप का प्रतीक है. 

Pataleshwar Temple | Sonmuda

साहजिक अमरकंटकचं मुख्य आकर्षण म्हणजे नर्मदा उगम कुंड पण केळकर सरांच्या ताईच्या ओळखीतून सोबत आलेल्या वाटाड्याच्या सूचनेनुसार आधी युनेस्को हेरिटेजच्या अंतर्गत आलेल्या कलचुरी काळातील पाताळेश्वर मंदिरात गेलो. हे तत्कालिन शंकराचार्यांनी ११ व्या शतकात राजाच्या साहाय्याने वसवलेलं मंदिर. दहाव्या शतकात हा प्रदेश चेदी शासकाच्या ताब्यात होता. आजही त्या काळातली मंदिरं आणि इतर भग्नावशेष दृष्टीस पडतात. 

या परिसरातलं कुंड हेच मूळ उगमस्थान असं काही स्थानिक म्हणतात पण त्याला मान्यता नाही असं वाटाड्या म्हणाला. या मंदिरांची वास्तुकला पाहण्यासारखी आहे. सुबक दगडी बांधकाम, कोरीव शिल्पं पण आत दिवे नसल्याने गडद अंधार्‍या गाभार्‍याच्या जाळीला डोळे लावून विष्णू आणि शिवलिंगाचं दर्शन घेतलं. 

परिसरातच एका भल्या मोठ्या पिंपळपारावर मोबाईल चार्जिंगला लावून बसलेल्या साधूबुवाशेजारी बसून कॉफी घेतली. 'नदीष्ट' मध्ये लेखकाला भेटणार्‍या माणसांसारखी अनेक माणसं इथे वावरत असणार. त्यात ही तर नर्मदामैय्या. या माणसांसाठी ही नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती पोषणकर्ती आहे, सोबती आहे. काहींसाठी  गुरू आहे, कुणासाठी साधना आहे तर कुणासाठी उपजीविकेचं साधन. 

रस्ता ओलांडून शुभ्र कमानीतून समोरच्या नर्मदा मंदिर परिसरात प्रवेश केला. सर्वत्र घंटानाद, मंत्रोच्चार आणि भक्तिभावाने भारलेलं वातावरण होतं. डावीकडे धर्मशाळा, उजवीकडे उगम-परिसर. हे देवीचं ३९वं शक्तीपीठ असून त्याला ‘चंद्रिकापीठ’ म्हणतात. कमानीपाशी दोन मध्यमवयीन, देखण्या, केशरी वस्त्रातल्या, तेजस्वी म्हणता येतील अशा बायका दिसल्या. केस अगदी बारीक कापलेले. जवळ एकेक काठी आणि पिशवी होती. 'वॉल्डन' लिहिणार्‍या थोरोचा ’simplify, simplify’ हा मंत्र आचरत निसर्गाशी तादात्म्य पावल्या असाव्यात, इतक्या निश्चिंत, प्रसन्न दिसत होत्या.  

Narmadamaiya udgam mandir | Kund | ShreeYantra  

काही थकलेले पण चेहर्‍यावर अतीव समाधान असलेले परिक्रमावासी दिसत होते. त्यांच्यासाठी कुणी उलट जाऊ नये म्हणून एका रेषेच्या पलीकडे वेगळॆ प्रवेशद्वार व निर्गमन स्थान होते कारण परिक्रमा करताना नर्मदा नदी नेहमी परिक्रमावासीयाच्या उजव्या हाताला असावी असा नियम आहे. नर्मदा ही भारतातील एकमेव अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. अमरकंटकच्या या उगमापासून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपरिक नियम आहे. 

हा कुंड परिसर पूर्ण पांढर्‍या संगमरवरात बांधलेला आहे. पण पाण्यात टाकलेल्या चढावामुळे पाणी गढूळ दिसत होतं. तेच काही जण बाटल्यात भरून घेत होते. मी फक्त पाण्याला स्पर्श करुन डोळ्याला लावलं आणि नमस्कार करून मैयाच्या दर्शनाला

गाभार्‍यात गेले. बाहेर एक छोटा दगडी हत्ती आहे. त्याखालून गेलं की पापं नष्ट होतात असा समज आहे. अभ्यासवर्गात दिल्ली विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेनं ती कशी त्याखालून जाऊ शकली वगैरे वर्णन केलं असल्याने उत्सुकता होती. बारीक माणसाची आणि लहान मुलांची पापं लगेच नष्ट होत होती तर जाड किंवा वयस्कर माणसं मध्येच अडकून पापासकट परतत होती. काहींना तर नातेवाईक ओढून काढत होते. एकूण स्थिती पाहून आम्ही पापं तशीच ठेवायचा निर्णय घेतला. प्रसाद विकत घेतला , निकिता आणि मी एका भिंतीवर लिहिलेलं नर्मदाष्टक चालीत म्हटलं आणि बाहेर आलो. अभ्यासवर्गातली आणखी काही मंडळी बाहेर भेटली. 

लगतच भीमाने वनवासात असताना बांधलेलं कमळाचं तळं होतं. किनारा अस्वच्छ , जलपर्णी वाढलेली पण तळं मात्र सुंदर होतं. नाव इंद्रदमन. ते इंद्रियदमन असावं असं मी मनाशी ठरवून टाकलं.   

वेळेअभावी कपिलधारा दूधधारा धबधबा पाहण्याचा विचार एकमताने रद्द केला. (हॅ, मग काय पाहिलं !) ४० वर्षांपासून (हे जरा अतीच वाटलं) निर्माण स्थितीत असलेल्या श्रीयंत्राला भेट दिली. त्याचं प्रवेशद्वार हा आता अमरकंटकचा आयकॉन झालं आहे. त्याचा टॉप व्ह्यू सुरेख होता. अजूनही ते अपूर्ण आहे. पुढे गर्द झाडीतून प्रवास करत सोनमूडा इथे पोचलो. 

इथून सोन नदीचा उगम पाहण्याचा अनुभव वेगळाच होता. डोंगरांच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीचं दृश्य देखणं होतं पण नदीचा प्रवाह उन्हाने आटून अधेमध्ये बारीक धाराच दिसत होत्या. माकडांना चुकवत शंभर फूट खाली व्ह्यू पॉईंटला जाऊन पाहिलं तर अफाट पसरलेलं विविध हिरव्या छटा ल्यालेलं अफाट जंगल आणि त्यातच विलीन होत चाललेला सूर्याचा केशरी गोल. पुन्हा वर चढून कमानीबाहेर आलो. वाटाड्याच्या भावाचं समोरच विविध वस्तू भांडार होतं. त्याची पुतणी धावत येऊन काकाला बिलगली. गल्ल्यावर निवांत बसलेल्या तिच्या आईने जेठजींकडे लक्ष जाताच घाईने डोक्यावर पल्लू ओढला. 

पुढच्या वळणावर 'माई की बगिया' हे रमणीय ठिकाण वाटाड्याने दाखवलं. स्थानिक श्रद्धेनुसार नर्मदामैया इथे खेळायला येई. फुलझाडं, औषधी वनस्पती आणि हिरवाईने नटलेला हा परिसर अतिशय शांत होता. गर्दीही कमी होती. 

------------

एव्हाना आमचा सिंड्रेला टाईम झाल्याने वाटेत ठरल्या ठिकाणी वाटाड्याला सोडलं. विस्तीर्ण पठारावर लांब एक कार दिसत होती. तिथून डावीकडे वळलात की खाली पेंड्रा रोड रेल्वे स्थानकाकडे जाता येईल असं सांगून ’नर्मदे हर’ म्हणत तो उतरला. पठार संपले पण रस्त्याचा अंदाज येईना. ’देख लेंगे’ म्हणत डावीकडे वळलो आणि रस्ता लागला. डोंगररस्त्यांमधून जाताना पुन्हा एकदा जंगलाचं मनोहारी दर्शन घडलं. साग, साल, बांबू आणि अनामिक..बहुधा औषधी वनस्पतींची (असं वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणतात ) उभी झाडं दाटीने दिसत होती. वळणाचा रस्ता संपतच नव्हता. बरोबर जातोय का हे पाहावं तर जंगलात इंटरनेटने आणि मग बॅटरीने केव्हाच साथ सोडलेली. आगे भी जाने ना तू - पीछे भी जाने ना तू अशी भुलभुलैया गत झालेली. निकिता बहुतेक हनुमान चालीसा किंवा भीमरूपी... काही तरी पुटपुटत होती. माहित नाही का, पण मी निश्चिंत होते. परिक्रमा म्हणजे केवळ धार्मिक प्रवास नसून आत्मशोध आणि अहंकार गळून पडण्याचा प्रवास आहे असं म्हणतात. परिक्रमा न करताच, आत्मशोध वगैरे नाही पण आमचा अहंकार थोड्या वेळासाठी गळून पडला असावा. मग परिक्रमेचा अनुभव काय असेल ! पादचारी परिक्रमावासींना तर दंडवतच !

एकदाची एक गाडी समोरून आली आणि त्या चालकाने बहुधा रस्ता योग्य असल्याची खात्री दिली पण त्याच्या गालात तोबरा असल्याने आम्हाला पुन्हा शंका आली. रस्त्यात अधूनमधून माकडांचे कळप, वळणावळणाचे घाटरस्ते दिसत होते. हिरवीगार झाडं आता अंधारामुळे काळपट दिसू लागली. चुकून एखादा माणूसप्राणी किंवा गाडी दिसताच थांबून टाळ्या पिटून आम्ही 'ओ भैया.. इधर इधर.. पेंड्रा ? पेंड्रा?' ओरडायचो व तो ’बरोबर’ अशी खूण करायचा, अखेर गाडी पेंड्रा रोड स्टेशनला पोचली. 

हे जेमतेम एका प्लॅटफॉर्मचं, एखादी चुकार गाडी येणारं, एखादे रामूकाका बसलेलं ,इवलं पत्र्याचं छत असलेलं स्टेशन असणार असं समजून केळकर सरांचा निरोप घेऊन आत शिरलो तर ते चक्क आधुनिक स्टेशन निघालं. kiosk वर तिकिट काढलं तोवर बाकी मंडळी पण अशीच वाटचाल करत येऊन पोचली. पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर दिल्लीला जाणारी मंडळी होती. एकमेकांना हात हलवून आम्ही 'कल हम कहा तुम कहा' भावनेने दोन्ही तीरांवरून ओरडून माफक गप्पा मारल्या. दरम्यान आमची गाडी आली. आरक्षण नव्हतं. पुन्हा ’देख लेंगे’. टीटीई येताच मी अपडाऊन अनुभवातले विनम्र भाव चेहर्‍यावर आणून काय ते खरं सांगितलं. त्याने बरं असा हात केला. पुढच्या गीतांजलीचं आरक्षण अजूनही वेटिंग होतं. मला मी गीतांजलीच्या दारातल्या पॅसेजमध्ये उकीडवी बसलेली दिसू लागले. ती काळजी दर्शवताच दिनेशजी पुन्हा म्हणाले, "कहाँ ना, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते." ”वो ’आगे’ अभी पास मे आ गया ना", हे शब्द मी गिळले.

काळोखामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं. आता उस्लापूर नामक अगम्य स्टेशनला पोचलो. तिथून बिलासपूरला जायचं होतं. सांगली-मिरजेसारखं हे जुळं प्रकरण होतं. रिक्शात फिल्मी गाणी ऐकत दिनेशजी, पांडेजी, मी आणि निकिता बिलासपूरला पोचलो. नागपूरसारखं मोठं शहर आहे ते. भव्य स्टेशन पाहून तर सीएसटीची आठवण झाली. कँटीनला मिळेल ते जेवलो आणि वेटिंग रूमला आराम करत गीतांजलीची वाट पाहू लागलो. गाडी दोन तास उशीरा आल्याने झोपेने वटारलेल्या डोळ्यांनी आत प्रवेश केला. दरम्यान आरक्षण कन्फर्म झालं होतं. खरं आहे, जिंदगीमे इतना आगे का नही सोचा करते. नर्मदे हर !


Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून शिकत अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी.  तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. 

त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.     

#AIEthics #ResponibleNetizen

- Published in February 2026 in #Mulanche_Masik

Monday, January 26, 2026

महिलोन्नती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन


संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’ 

गावाची उन्नती, गावकर्‍यांच कल्याण यातच त्यांचं अध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर  त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.

खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांनी भारतभर राष्ट्रधर्माचा विचार पेरला. केवळ प्रबोधनच केलं नाही तर १९४२ च्या ब्रिटीशांविरूद्ध झालेल्या क्रांती आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 'देश हा देवची पवित्र । कायदा त्याचे व्यवस्था सूत्र' यावर भर दिला. इतका व्यापक विचार करणार्‍या राष्ट्रसंतांच्या नजरेतून देशाचा अर्धा भाग असलेल्या महिलांची उन्नती हा मुद्दा सुटला असता तरच नवल! म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात - 

'महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले' 

राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे  पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच  त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. 

-------------

१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-  

तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने 

आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची  उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं. 

संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले ....       पण माउली तिथेच राहिली . 

स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितात

देवाने निर्मिली ही क्षिती,  तिचे उदरी खाणी किती 

परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती,  कोठेच नाही 

महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. 

'गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. '

इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं. 

प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे. 

------------

परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा,  प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा

शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है 

काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्‍या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात. 

--------------------

आता कुठे राहिलंय तसं काही,  केवळ विशीतली सहर शेख  मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ? 

याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता. 

एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां,  सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ? 

इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.

अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत. त्यामुळे राष्ट्रसंतांचे विचार आजही कालबाह्य झालेले नाहीत. 

---------------

स्त्रियांनी आपल्या कक्षा रुंदाव्यात हे सांगताना आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना —  ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं. 

त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तीळगूळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.

याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत. 

राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं,  तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.  

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"  

यावरूनच जोशींनी  शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला.  त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला. 

याच धर्तीवर अविकसित समाजातील स्त्रियांना विकासापर्यंत त्यांना न्यायचं तर त्यांना आधी त्यांच्या परिस्थितीची , हक्कांची जाणीव करून द्यायला हवी हे भान तुकडोजी महाराजांना होतं.

-----------

अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात,  तिला पाप-पुण्याची भीती दाखवतात,  तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो. 

बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो. 

अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ"  अशी भाषा आपण ऐकतो. लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की 

* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे. 

* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.

* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच  साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.

----------------

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील.... 

शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात

जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे,  जिवापाडे पडले हे 

पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’ 



 ----------------------------


परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला,  जानेवारी २०२६

Thursday, January 1, 2026

मुलाखत - मा. तारा भवाळकर


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात त्रैमासिक ’दौत लेखणी’ साठी मी घेतलेली , ज्येष्ठ सहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत. 

( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

------------------------------------------ 

प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ? 

मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही. 

तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे. 

माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊

मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं  वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.  

-------------------------------------------

प्रश्न :  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्‍या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं ! 

मा. तारा भवाळकर : 

आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.

आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्‍यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्‍याचदा उपेक्षा केली जाते. 

प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा? 

मा. तारा भवाळकर : 

वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.

--------------------------------------

प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची  प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता? 

मा. तारा भवाळकर : 

तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं. 

----------------------------

प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?

मा. तारा भवाळकर : 

साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा,  कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं ! 

परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे. 

आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं. 

मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊 

अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात. 

-----------------------

प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !

मा. तारा भवाळकर : 

मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले. 

७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊

सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला. 

विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले. 

मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.

--------------------------------

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का? 

मा. तारा भवाळकर : 

समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे,  एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही. 

साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे.  संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.

-----------------------

प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला.  शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?  

मा. तारा भवाळकर : 

एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.  

लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !

सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे. 

आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्‍या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो. 

तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा. 

उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय ! 

------------------

प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं  आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?

मा. तारा भवाळकर : 

वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत. 

शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले?  ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड  कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्‍या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार. 

माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं. 

------------------

प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं?  तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?

मा. तारा भवाळकर : 

नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील  नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊

------------------------------

प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं?  सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का? 

मा. तारा भवाळकर : 

नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊

शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा. 

------------------

मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक


Wednesday, December 31, 2025

अलिबागसे आयेले

विविध भाषांवर प्रेम आणि प्रभुत्व असणारी मैत्रिण श्रुती आणि तिचा हरहुन्नरी पत्रकार पती विदर्भातून अलिबागला जातात काय आणि आपापले उद्योग सांभाळून तिथे थेट resort च्या व्यवसायात उतरतात काय! हे कुतूहल शमवायला आणि एक छोटी सुट्टी घालवायला आम्ही काही मैत्रिणी त्यांच्या अलिबागजवळच्या  ViViRa's Resorts (Poseidon's Retreat) ला तिच्या आमंत्रणावरून डिसेम्बरमध्ये जाऊन आलो. 

Poseidon म्हणजे ग्रीक पुराणातला समुद्रदेव.



आम्हाला चिकचिक मुंबईत फार थांबायचं नसल्याने ट्रेनमधून उतरून टॅक्सीने आम्ही थेट  गेट वे ऑफ इंडियाला पोचलो. गेट वे ऑफ इंडियापासून फेरी बोटीने मांडवा आणि तिथून पळत बस पकडून इथे केव्हा पोचलो कळलंही नाही. फेरी बोटीच्या भोवतीने उडणारे समुद्र पक्षी सफर रंजक करत होते. मांडवा फक्त अग्नीपथमध्ये ऐकलेलं. पण अगदी किनारपट्टीवरचं कोणतही गाव असावं तसंच आहे. बर्‍याच सेलेब्रिटींचे अलिबागला बंगले असल्याने आणि एकूणच मुंबईकर प्रवाशांमुळे  M2M क्रूझ वगैरे, जेट्टी ज्यात गाड्यांच्या मॉडेल आणि साईझनुसार भाडं आकारलं जातं याचीही वर्दळ होती. शेजारी बसलेल्या पारशीबाईने मांडवा उतरके दौडनेका नही तो अलिबाग जानेवाली बस फुल हो जायेगी , अशी मह्त्वाची टीप दिली होती. 

Resort च्या आवारातच श्रुतीचं घर असल्यामुळे आम्हाला शब्दश: घरच्यासारखं वाटत होतं. या दोघांइतक्याच राजे काकूही जातीने काळजी घेत होत्या. Group साठी प्रशस्त dormitory, खास श्रुती टच असलेलं कोकणी सुग्रास भोजन, आवारातच स्वीमिंग पूल, पायाखाली हिरवळ आणि राखणीला काळे तुकतुकीत चपळ जिंजर, गार्लिक (कुत्री बरं का ) अजून काय हवं!

त्यात पल्लवीच्या लेकाचं लग्न ठरल्याने तिला श्रुतीच्या मदतीने आम्ही .......... केळवणही केलं. तुपाची धार धरलेला गरमागरम मऊसूत शुभ्र उकडीचा मोदक आणि तिने एक मेथीची कसली तरी भन्नाट भाजी केली होती. आयतं जेवण ही अजूनही बायकांसाठी सुखाची परमावधी असते. मेनू वगैरे नंतर.

संध्याकाळी जवळच्या वर्सोली बीचला गेलो. भटकलो. खिदळलो. गुडघ्यातला क्रॅम्प विसरून सायकली चालवल्या. घोडागाडीत बसलो. डोळे भरून निवांत सूर्यास्त पाहिला. 

दुसर्‍या दिवशी मुरूड-जंजिरा सफर केली. रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात वसलेला हा एक अभेद्य जलदुर्ग आहे. मुरूड किनाऱ्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर. तिथे जायला बोटी आहेत. या किल्ल्याची उभारणी पंधराव्या शतकात झाली. पुढे सिद्दी शासकांनी त्याचा विस्तार करून तिथेआपल्या सत्तेचं केंद्र तयार केलं. शिवाजी महाराज तसेच इतर अनेक सत्ताधीशांनी हा किल्ला जिंकण्याचे प्रयत्न केले, परंतु त्याच्या मजबूत तटबंदीमुळे आणि सागरी संरक्षणामुळे ते शक्य झालं नाही. किल्ल्याभोवती उंच तटबंदी, १९ बुरुज, मोठं प्रवेशद्वार, राजवाड्यांचे अवशेष, मशिदी आणि गोड्या पाण्याची तळी पाहायला मिळतात. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी असूनही इथे गोड्या पाण्याचे साठे आढळणं हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. 


तरीही पडझड प्रचंड झाल्याने भग्नावस्थेतला हा किल्ला पाहताना कससं वाटलं. फार न भटकता बुरुजाशी बसून निरीक्षण केलं. तळ्यालगतच्या पायर्‍यांवर बसून राहिलो. बोटीच्या वेळेनुसार संध्याकाळच्या आत परत निघावं लागतं. 

मुलं लहान असतान अलिबागला आलो होतो पण बोटीची वेळ संपल्याने जाता आलं नव्हतं. येताना वाटेत काशिद बीचवर जेवलो. उष्मा वाढत चालल्याने समुद्रस्नानाचा मोह टाळला. तिथल्या  हॅवॉक मध्ये पहुडल्यावर समुद्राची गाज ऐकत डोळे मिटले तेवढ्यानेही मस्त वाटलं. परत निघालो. उन्हं उतरल्याने नागाव बीचवर तरी जायचंच असं ठरवलं. 

तर ही गर्दी. सगळी मुंबई जणू तिथे लोटली होती. आत शिरल्यावर गाडी उलट वळवताही येईना मग कंपलसरी बीचवर गेलो. गर्दीतून सुटका करून घेऊन परत निघालो ते थेट रिसॉर्टवरच्या स्विमिंग पूलमध्ये शिरलो. गप्पा, मस्ती, पत्ते, शब्दक्रीडा खेळ आणि तेव्हा थंडी असल्याने या जोडीबरोबर त्या देखण्या निसर्गरम्य resort वरचं कॅम्प फायर. झकास ब्रेक झाला.


मुंबईहून परतीची ट्रेन होती. मध्ये ४ ता हातात होते म्हणून टॅक्सि ठरवून साऊथ मुंबई दर्शन केलं. पिरामल हाऊस ते अंबानींच अ‍ॅटिलिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट, सेलेब्रितींची घरं , मुख्यमंत्री निवासस्थान असं करत शेवटी नया व्यापारमधला म्हातारीचा बूट वगैरे बघून कमला नेहरु उद्यानात   

#अलिबाग से आयेले लोग हॅपी मूडमें बैठे रहे. दुसर्‍या दिवशी घरी पोचू तेव्हा एका मैत्रिणीच्या आयुष्यात काही अघटित घडणार आहे याची तेव्हा आम्हाला सुतराम कल्पना नव्हती. 


Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. तरीही 'हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो हे खरं.

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. वा रे गब्रू 😊 म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. आपण तशा post fwd करतो women's day ला. झालंच तर सत्कार बित्कार. तरीही हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची' अपेक्षा योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. स्वेच्छेने गृहिणी होणाऱ्या महिला हे आनंदाने करू शकत असल्या तरी या अहोरात्र सेवा योजनेचा त्यांना कंटाळा येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला,आवडो की नावडो, स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता झेपेल तेवढंच करियर करतात. या 'ग्लास सिलिंग' वर अधूनमधून येणारे लेख उसासे टाकत वाचतात. परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. बऱ्याच गृहिणी आपण कमावत नाही हा अपराधीभाव घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठी हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली.