Showing posts with label पिढयातलं अंतर. Show all posts
Showing posts with label पिढयातलं अंतर. Show all posts

Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून शिकत अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी.  तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. 

त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.     

#AIEthics #ResponibleNetizen

- Published in February 2026 in #Mulanche_Masik

Friday, August 9, 2024

वाचन -आनंदसोहळा

 चला, जरा आपल्या व्यक्तिमत्वाचा किनई विकास करूया, असं म्हणून कुणी वाचत नसतं. अपवाद म्हणून सुद्धा तशा उद्देशाने कुणी वाचत असेल तर तो सफल होणे नाही. तरीही तुमच्या आयुष्य़ातला टर्निंग पॉईंट कोणता असं कुणी विचारलं तर मी म्हणेन ’पुस्तक’ माझ्या अयुष्य़ात आलं तो. चांगली पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाहीत, पण लाभली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे अगदी काही भव्यदिव्य घडलं नाही तरी ते मस्त होतं.

मी पहिलं मोठठं पुस्तक वाचलं ते मॅक्झीम गॉर्कीच ’आई’, तेव्हा सहावी सातवीत असेन, बरचसं कळलं नाही पण एका वेगळ्याच रशियन पार्श्वभूमीच्या जगाची ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्र जुळलं ते कायमचं. मग नवे शब्द मनात रूंजी घालायला लागले. कवी लेखकांच्या प्रतिभेने थक्क व्हायला लागले. त्या वयात मला अतिशय अद्भुत वाटलेलं एक वाक्य आजही आठवतं, बहुधा ह.ना.आपट्यांच असावं. "चंद्र सूर्य यांच्या झांजा वाजवत काळ वेगाने पुढे सरकत होता" किती सुंदर प्रतिमा, चंद्र सूर्याच्या गोलाकाराला झांजेची उपमा, झांजेच्या दोन पाखी एकमेकाला चाटून जातात निनाद करतात, तसा दिवस आणि रात्रीचा सुरेल संबंध, जगाचं पुढे जाणं ..हे सगळं फक्त एका वाक्यात किती कौशल्याने गुंफता येतं. त्या वाक्यावर खिळून राहिल्याचं आठवतं. असं वाचता वाचता "हा मुग्ध सोहळा हिरवा, मौनाला अंकुर फुटले...." अशी आपली गत होते. कवयित्री अरूणा ढेरे या सृजनशीलतेची अचूक व्याख्या करतात. कवी किंवा लेखक आपल्या संजीवक प्रतिभेतून शब्दांवर अर्थाचं पाणी शिंपडून त्याला जिवंत करतात, हेच खरं सृजन. आपलं मन मोकळं करण्यासाठी आपल्याला नेमक्या शब्दांची आणि आंतरिक उर्मीची खूप गरज असते! या दोन्ही गोष्टी वाचनाने साध्य होतात. वाचन आणि रसग्रहण याचा अनुभव "अणूहुनिया तोकडा, तुका आकाशाएवढा ॥" असा असतो. 


जिव्होर्दानो ब्रुनो या विचारवंतांनी असं म्हटलंय की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. इथे पुलंचा अविस्मरणीय सखाराम गटणे आठवतो. जगणं आणि वाचणं याचा सुतराम संबंध नसेल तर गटणे सारखं भाबडं वाचन म्हणजे पुलंच्या भाषेत जीवनाच्या प्रवाहात अडकलेला साहित्याचा बोळा. आपली वाचनाची दिशा योग्य आहे की नाही हे एकदा समजून घेतलं तर आपली स्वयंनिर्णयाची शक्ती वाढून नवनव्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वाङ्मयीन प्रयोगाला (बापरे!) आपण सामोरे जाऊ शकतो. पण मग उत्तम साहित्याची निवड करायची तरी कशी? याचं उत्तर नाटककार विजय तेंडुलकर देतात. आयुष्याबदलची आपली समजूत जे वाढवतं ते उत्तम साहित्य अशी नेमकी व्याख्या ते करतात. साहित्य एनरिचिंग असायला हवं. पहिल्या दोन-चार पानात ते जोखता येतं. 

बर्‍याच यशस्वी व्यक्तींमागे एखादं पुस्तक असतं. धीरूभाई अंबानी म्हणतात मी पुस्तके वाचली म्हणून माझे क्षितीज विस्तारले, मी मोठी स्वप्ने पाहू लागलो, मोठा विचार करू लागलो आणि म्हणून मी मोठा झालो. मायक्रोसोऑफ्टचे बिल गेट्स शाळेतून मधेच बाहेर पडलेले पण वाचन सोडले नाही, त्यांचे ’द रोड अहेड’ हे पुस्तक त्यांच्या प्रवासाची साक्ष देतं. विप्रोचे अझीम प्रेमजी म्हणतात नेतृत्व गुण वाढत राहण्यासाठी आणि आत्मचिंतनासाठी मी प्रवासात कायम वाचन करतो. अमिताभ बच्चनच्या अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाला उत्तम वाचनाचा भक्कम पाया आहे. हे तर सगळे सेलेब्रिटीज आहेत. अनेक चळवळीतील कार्यकर्ते मग ते समाजवादी असोत, संघाचे असोत, अंनिस चे असोत, कोणत्याही विचारधारेचे असोत पण त्यांच्यात एक समान धागा असतो, बहुतेक कार्यकर्ते म्हणतात वाचन माझा सोबती आहे. ते नसतं तर अशा काही वेळा होत्या, जेव्हा आम्ही जगावं की नाही, कशासाठी जगावं या द्वंद्वात होतो तेव्हा आमच्या जगण्याच्या अंधारवाटा या वाचनानं प्रकाशमान केल्यात. त्या सर्व ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल आम्ही कृतज्ञच रहायला पाहिजे. बहुसंख्य यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात पुस्तकांची भूमिका मह्त्त्वाची असली तरी वाचन हे जीवनात  यशस्वी होण्याचा हेतू समोर ठेवून करायची गरज नसते. यश हे दर्जेदार वाचनाचं बायप्रॉडक्ट आहे.


प्रेरणादायी पुस्तकं काय करू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण गोळे. वयाच्या १६व्या वर्षी याने भांडणातून एकावर वस्त-याने वार केला, केस झाली, तो तुरुंगात गेला, घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. इतर लहान सहान गुन्हे नावावर होतेच. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. गांधींजींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि त्यानेदेखील न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगी झाली. ही बातमी मटामअध्ये वाचल्याचं मला स्मरतंय. एकूण व्यक्तीला आमूलाग्र बदलवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमधे आहे. 


माझे नेटवर्किंगचे विद्यार्थी म्हणत की आम्ही आपल्या क्षेत्रातलं वाचलं की पुरे ना, हे अवांतर बिवांतर वाचन हवंच कशाला? परंतु उत्तम करियर साठी तुमच्याकडे वैश्विक नजर व्हावी. शाम मनोहर या उत्सुकतेने झोपणार्‍या लेखकाचं लेखन फारसं झेपलं नसलं तरी त्यांचा ’वर्ल्ड व्ह्यू’ हा शब्द मला फार आवडतो. ही नजर पुस्तकच आपल्याला देतात. ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे करियर करायचं आहे त्यांनी तर वेगवेगळ्या भाषांमधलं ,इंग्रजीतलं वाचन देखील वाढवायला हवं. पुस्तकांच्या साथीने चढलेल्या पायर्‍या मानसिक समृद्धीबरोबरच आर्थिक समृद्धीलाही जाऊन भिडतात. परंतु आजच्या मार्क्सवादी पिढीला हे पटवणं सोपं नाहीये. जागतिकीकरणाच्या लाटेनं आजच्या पिढीला या संतसाहित्यापासून दूर नेलं आहे. आपण कसे दिसतो त्याचा म्हणजे बहिरंगाचा विचार ही पिढी जास्त करते. सेलेब्रिटींचा आपल्यावर इतका प्रभाव आहे की स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. इथेच पुस्तकं मदतीला येतात. पुस्तकं आपल्याला जमिनीवर ठेवतात. हा दिखाऊपणा, उथळपणा आपण मुलांच्या माथी तर मारत नाही आहोत हे समजून घेण्यासाठी आधी आपण आतून विकसित व्हायला हवं. त्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांबद्दल आपलं वाचन उत्तम असायला हवं. ललित साहित्य आयुष्याला पंख देतं तर वैचारिक साहित्य त्याला वास्तवाच्या जमिनीवर परत आणतं. ललित वाचक पटकन दुसर्‍याची बाजू समजून घेऊ शकतो. कारण वाचताना त्याला प्रत्येक पात्राची बाजू समजून घ्यायची सवय लागलेली असते. त्याला सहवेदना पटकन जाणवतात. एखादी कलाकृती वाचता-वाचता तो आतून बदलून गेलेला असतो. वैचारिक वाचनाच्या बाबतीत मी असं म्हणेन त्यातून व्यक्तिमत्वात ठामपणा येतो, प्रगल्भता येते. 


होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’ नावाच्या या कथेत लेखकाला दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्याचं शेवटचं पान कधीच येत नाही. म्हणजे त्यातला ज्ञानाचा झरा कधीच आटत नाही. माझी मावशी अवांतर वाचन करतेच पण धार्मिक ग्रंथांचं पारायण करत असते.. मी तिला म्हणायचे की तेच ते वाचण्यापेक्षा त्या वेळात तू इतर काही उत्पादक काम का करत नाहीस, दुसरं काही का वाचत का नाहीस. तीच ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, गीता तू कितीवेळा वाचशील आता. तिच्याशी बोललयानंतर नीटच कळलं की प्रत्येक वाचनात आकलनाचं नवं दार उघडलं जाण्याच्या शक्यता असतात. त्यातल्या नवनव्या मार्मिक ठिकाणांचा शोध लागतो. ठरावीक विचारांचं केंद्र बदललं की प्रश्न पडतात. उत्तरं मिळवण्याच्या प्रयत्नात नवं, स्वत:चं ‘चिंतन’ सुरू होतं आणि शेवटचं पान कधी येतच नाही. 


मी जरी तंत्रशाखेकडे वळले तरी वाचनाची साथ सुटली नाही. सुरूवातीला मला वाटायचं की जगातलं सार शहाणपण आहे ते फक्त पुस्तकात. हे वाचू की ते वाचू . मात्र बहिणाबाई वाचताना जाणवतं की आपल्या अवतीभवती असणारे अनेक साधे सरळ लोक आपल्यापेक्षा शहाणे आहेत, कारण  हे ‘शहाणपण’ त्यांच्या जगण्यामधून आलेलं असतं. जगण्याला भिडण्यासाठी साहित्यासारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नसते. ते थेटपणे, निधड्या छातीने जगण्याला भिडतात आणि धडपडत नव्याने घडतात . किशोर शांताबाई काळ्यांचं कोल्हाट्याचं पोर, अशोक पवार सारख्या भटक्या माणसाचं जग, बलुतं, गोलपीठा, बालकांड सारखी आत्मचरित्र आपल्या काळजाला भिडतात याचं कारण ते लेखक जे ‘जगतात’ तेच लिहितात. अभिनेता भूमिका संपली की नामानिराळा होऊ शकतो पण लेखक/कवी आणि त्याचे साहित्यातून उमटणारे विचार हे कायम एकच असायला हवे ना. नाहीतर एखाद्या पर्यावरणवाद्याने स्वत:च पाण्याचा अपव्यय करावा तसं मला हे विसंगत वाटतं. 

समजा एखादा उत्तम वाचक ऑफीसमधली स्टेशनरी सर्रास घरी आणत असेल किंवा भाजीवालीने चुकून पाच रूपये कमी घेतले म्हणून खूश होत असेल तर माझ्या मते त्याचं वाचन हा निव्वळ टाईमपास आहे. चांगला वाचक नकळतपणे एक चांगला माणूस व्हायला हवा. जगण्याबद्द्लचा एकूणच विधीनिषेध वाचनातून आपल्या मनात रूजायलाच हवा .‘चांगला माणूस’ होण्यासाठी साहित्य आणि इतर सर्व कलांची काही एक ओळख, त्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. सामाजिक विषयांवरची पुस्तकं यासाठी मदत करतात. मग ते राजेंद्र्सिंह यांच जोहड असो, अनील अवचटांची पुस्तकं असो, कोसला असो किंवा व्हिक्टर ह्यूगोचं ’ला मिझरेबल्स’.  


वाचनाची देणगी माणसाला लाभली नसती तर! दळवी, माडगूळकर, पाध्ये असे लेखक सांगतात की वाचनानं त्यांचं जगणं समूहलक्ष्यी बनवलं. जेवढं आत खळबळत असतं ते अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरवायचं असेल तर त्याला लागणारा शब्दसाठा केवळ वाचनातून उपसता येतो. आपण जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर जगात असतो. हे उद्धृत कुठे वाचलं आठवत नाही पण त्याचं सार असं -भोवतीचं जगड्ब्याळ विश्व, असंख्य आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, नद्यानाले, झाडं, फुलं, फळं, पशुपक्षी, अफाट पसरलेला निसर्ग- आपल्याआधी अब्जावधी वर्षांपासून... आपल्यानंतरही असणारा, आपल्या आसपास वावरणारी, नात्यानी-बिननात्यांनी, रक्तानं-बिनारक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं, प्रसंग-घटनांनी, भावना-संवेदनांनी, व्यवहारांनी, सहेतुक-अहेतुक, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं.आणि आपल्या आत - स्वतःच्या आतलं एक अतिशय गूढ, अनाकलनीय, गुंतागुंतीचं असं आंतरिक विश्व ...या सगळ्यातलं अवाढव्यपण, विराटपण, विशालपण, औदार्य आणि संकुचितपण, अथांगता आणि उथळपण, सौंदर्य आणि कुरुपपण, भव्यदिव्यता आणि क्षूद्रपण, रौद्रभीषणता आणि नाजूकपण, क्रूरता आणि प्रसन्नपण, शांतता आणि कल्लोळ, नियमबद्धता आणि गोंधळ, सुसंगती आणि विसंगती, अर्थपूर्णता आणि निरर्थकत्व या सगळ्याशी आपण एकाचवेळी जोडले आणि जखडले जात असतो. हे जोडलेपण आपल्याला हवं असतं आणि नसतंही. या जखडण्यातून तर आपली सुटकाच नसते. या सगळ्या जोडण्या-जखडण्याच्या ताणतणावातून, संघर्षातून, अस्वस्थतेतून या सगळ्याचा अर्थ शोधण्याचा ध्यास आपल्याला लागतो. अच्युत गोडबोले म्हणतात तसं हे सारं आपल्याला कळलं पाहिजे असं वाटायला लागतं. वाचन नसले तर आपले अडत नाही पण ते नसले तर आपण सहजपणे घडतही नाही. जगण्याबद्दलच प्रचंड कुतूहल आपल्याला वाचनातून शमवता येतं. स्वान्त सुखाय वाचता येतं, समूहलक्ष्यी होण्यासाठी वाचता येतं, आणि जगणं सुंदर करण्यासाठी वाचता येत. 


त्यामुळे आमचा मुलगा वाचतच नाही हो, अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं ,आधी ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या अतिशय लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी तिला एक महिन्याने यायला सांगितले. ती १ महिन्याने पुन्हा गेली. गांधीजींनी त्या मुलाला ’बाळा, तू गोड खाणे बंद कर’ असे सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की मग हे तुम्ही महिन्याभरापूर्वीच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली, त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला आणि आज मी त्याला हे ठामपणे सांगतो आहे’. आता हे खरंच घलं आहे का, मला माहीत नाही. ह्याचा मथितार्थ इतकाच की मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी आपण स्वत: काय वाचतो आणि किती वाचतो ते तपासून पाहूया. आपलं वाचन whatsapp च्या मेसेज पुरतं मर्यादित आहे? पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! 

माझ्या लहान भाचीला कुणी बसून आकडे म्हण असं शिकवलेलं नाही. मग लक्षात आलं की ‘एक दोन तीन चार - राने झाली हिरवीगार’ असं आकड्यांशी यमक जुळवलेलं एक गाणं तिची आजी तिला म्हणून दाखवते. शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर  मुलांची आस्वादक्षमता वाढते, त्यांना कविता आवडायला लागतात. आपल्याकडे बालकवींपासून आजच्या संदीप खरेंपर्यंत उतामोत्तम कविता उपलब्ध आहेत. कमीत कमी शब्दात मोठा आशय सांगणार्‍या कविता त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला हव्यात. हे कुतूहल वाढत गेलं तर मुलांना पर्यावरणासह आजूबाजूचं जग, वेगवेगळे देश जाणून घ्यावेसे वाटतात. काळ बदलला तरी देशोदेशीची माणसं आतून तशीच असतात हे सांगणारी पुलंची अपूर्वाई आणि पूर्वरंग त्यांच्या मदतीला येतील. संदर्भांच्या विपुलतेसह देशोदेशीचं पर्यटन घडवून आणणारी मीना प्रभूंची पुस्तकं इथे मदतीला येतील.

मुलं वाचतच नसतील तर या वेळात आपण त्यांना महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो. आपण त्यांना वेळ दिला नाही तर त्याची भरपाई करायला माध्यमं २४ तास उपलब्ध आहेत. मग उद्या मुलं आपल्याला म्हणतील, this मिडीया ie टीव्ही or कॉम्प्युटर, it has spent more time raising us than you have तेव्हा उशीर झालेला असेल. 


अशी वेळ निघून जाते आणि पालकांवर काय वेळ येते पाहा, "काल घरातली वीज गेली होती. कॉम्प्युटर ,टीव्ही सगळं बंद त्यामुळे मी माझ्या घरातल्या लोकांशी जरा गप्पा मारल्या आणि मला कळलं ...अरे वा...मस्त आहेत की ही माणसं !!! " एका टीनएजर मुलाची, आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारी ही प्रतिक्रिया बोचरा विनोद म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्स वर फिरत असते. त्यामुळे पुस्तकांचा आजच्या घडीचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तंत्रज्ञान असं समाज म्हणतो ! आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलं सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात मग ती वाचणार केव्हा. एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय. यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा  मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. त्यामुळे मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांना ई-बुक्स बद्दल सांगायला हवं. तेवढही वाचण शक्य नसेल तर आता ऑडीओ बुक्स चा पर्यार सुद्धा उपलब्ध आहे. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. http://www.awesomelibrary.org/Classroom/English/Literature/Elementary_Li... ह्या साईटवर रुडयार्ड किपलींगच्या 'जंगल बुक' पासून ते चार्ल डिकन्सच्या 'ए क्रिस्मस कॅरल' पर्यंत ऑनलाईन पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. http://www.pitara.com, पाच वर्षांपूर्वी अरविंद गुप्तांनी arvindguptatoys.com हे संकेतस्थळ चालू करून त्यावर डिजिटाईज केलेली पुस्तके ठेवायला सुरुवात केली. आणि आजमितीला एक हजारच्यावर दर्जेदार पुस्तके ह्या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहेत. शिक्षणशास्त्र, जागतिक शांतता, पर्यावरण, विज्ञान-गणितातले प्रयोग, उत्तम बालसाहित्य अशा अनेक विषयांवरची पुस्तके इथे आहेत. 

http://www.arvindguptatoys.com या साईट वर हिंदी, मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवरचा बालविभाग http://www.britishcouncil.org/kids अत्यंत वाचनिय आणि माहितीपूर्ण आहे. थोडक्यात वाचनाची आवड निर्माण करणं आणि जोआपसणं हे कॉम्प्युटरच्या मदतीने सहज शक्य आहे. काळाबरोबर मनोरंजनाची माध्यमं बदलणार हे आपण स्वीकारतो मग वाचनाची माध्यमं पारंपरिकच हवी हा अट्टाहास का! 


अर्थात हे खरय की हातात पुस्तक घेऊन वाचणं आणि डिजीटल वाचन यात खूप फरक आहे. कॉम्प्युटर वर टाईप करण्यापेक्षा हातात लेखणी धरून लिहीणं हा एक उत्कट मानसशास्त्रीय अनुभव असतो. हेही खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली यातलं काही अनुभवता येत नाही. नाही म्हणायला आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो. पण त्यात दोन धोके आहेत, सगळं दृश्य समोर असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. 

कवी गुलजार म्हणतात.. 

"जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का

अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है

वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी, लेकिन .....

किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "

हे कटू सत्य स्वीकारतानाच वाचनाचं माध्यम बदलतं आहे याची आपण आता सकारात्मक नोंद घ्यायला हवी. 

भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा वाचनाचा हेतू तत्वत: असायला हवा पण निखळ आनंद मिळवणं हाच त्यामागचा खरा हेतू. मग ते छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक,व्ह्लॉग सारखं डिजीटल माध्यम, छापील वर्तमानपत्र असो किंवा त्याची इंटरनेट आवृती, त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो वाचकांपर्यंत पोचला म्हणजे झालं. वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा आनंदसोहळा आहे. त्या तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःच्या साथीने गायला पाहिजे असा हा राग आहे. 


Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Friday, December 25, 2015

जनरेशन गॅप- रस्सीखेच


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी या विषयावरील ’रस्सीखेच’ हे सदर सरत्या वर्षाबरोबर आपलाही निरोप घेतं आहे. या विषयाशी निगडीत पिढ्यांमधील वैचारिक तफावत, सामाजिक, कौटुंबिक, राहणीमानातील बदल, पालकत्वाकडे पाहण्यात झालेला फरक, स्त्रियांकडे बघण्य़ाचे कालचे आणि आजचे दृष्टीकोन, वाचनाच्या बदललेल्या पद्धती, जुनी आणि नवी शैक्षणिक मूल्ये, अभिव्यक्तीची बदलत गेलेली शैली, तंत्रज्ञानामुळे रूंदावलेली दरी यासारख्या अनेक मुद्द्यांचा परामर्ष या सदरात घेतला गेला. इ-मेल वर बर्‍याच वाचकांनी आपले अभिप्राय दिले. वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हा एक अतिशय आनंदाचा अनुभव होता. जगाचा विचार केला तर दोन पिढ्यांमधील अंतराची- जनरेशन गॅपची- कल्पना आक्रसते आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी पिढी बदलते, असे साधारणपणे मानले जाते. आता जगभरातली दोन पिढ्यांमधील अंतराची कल्पना जेमतेम सहा वर्षांवर येऊन पोचली आहे

काही बाबतीत मात्र भारतीय पिढ्यांमधे जनरेशन गॅप नाहीच की काय असं वाटायला लागतं. सन्माननीय अपवाद वगळता जुन्या मंडळींच्या कल्पना इतक्या पक्क्या झालेल्या असतात की, नवं सगळं त्यांना वाईट, अयोग्य, असभ्य वगैरे वाटत राहतं. नुकत्याच घडलेल्या शबरीमला मंदीरातील महिलांच्या स्कॅनिंग विषयीच्या विचाराचं उदाहरण घेतलं तर वरवर यावर नाराजी प्रकट करणार्‍या बहुसंख्य महिला सुद्धा मनातून मासिक धर्माला पिढ्या न पिढ्य़ा अपवित्रच मानत आल्या आहेत. शिवाय ते इतकं ठासून बिंबवलं जातं की आजच्या पिढीच्या देखील कित्येक तरूणी त्या बाबतीत विज्ञाननिष्ठ विचार करायला धजावत नाहीत. त्याच वेळेला दुसरीकडे भारतीय पिढ्यांमधे प्रचंड जनरेशन गॅप आढळून येते, उदा. द्यायचे तर आपणच कौतुकाने इंग्रजी माध्यमात घातलेला मुलगा किती सहजतेने संगणक, मोबाईल वापरतो, फाडफाड इंग्लिश बोलतो आणि आपण किती अडाणी आहोत, अशा न्यूनगंडाने अनेक पालक आज ग्रासलेले आहेत.

प्रत्येक मागच्या पिढीजवळ नव्या पिढीच्या तुलनेने संयम, आदर, त्यागी वृत्ती असते तर नव्या पिढीजवळ उमेद, बंडखोरी आणि ’मला काय हवय’ या बाबतीत स्पष्टपणा असतो. वेगाने धावू पाहणारी पिढी आर्थिकदृष्ट्या बऱ्याच लवकर सक्षम होत आहे. वडिलांनी निवृत्तीच्या वेळेतो केली तेवढी कमाई मुलं वर्षात करतात. त्यातून आत्मविश्वास वाढतो पण काहीसा अहंकार ही निर्माण होतो. यात समन्वय साधायचा तर मागच्या पिढीने दिलेल्या संस्कारांचे दोर बळकट हवेत. संस्कार म्हणजे फक्त ’शुभंकरोति’ म्हणणे नव्हे, माणूस घडवणे. कुठलीही असली तरी पौगंडावस्थेतील पिढी नेहमीच सैरभैर अवस्थेत असते. संस्कृतीतून, इतिहासामधून नेमकं काय घ्यायला हवं हे त्यांना समजत नसतं. परंतु सभोवतालातून, आजूबाजूच्या व्यक्तींमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांकडून ते अभावितपणे खूप काही घेत असतात. नैतिक अधिकार प्रत्यक्ष कृतीतूनच कमवावा लागतो हे निश्चित. मुलं आपलं सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण आपल्या मागच्या पिढीशी वागायला हवं.

पिढ्यांमधलं अंतर आवर्जून कमी करायचं तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या जागी उभे राहून परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित एकमेकांच्या वागण्य़ाचा कार्यकारणभाव समजणं सोपं जाईल. नव्या पिढीचे जगण्याचे मार्ग वेगळे असतील पण ते अयोग्य नसतील असा विश्वास निर्माण होईल आणि मागची पिढी तरूणाई ला ’आऊटडेटेड’ वाटणार नाही.

जुनं ते सोनं हे बहुतांशी खरं असलं तरी सर्वच जुनं ते सोनं नाही. सरसकट एखाद्या पिढीला दोष देण्य़ापेक्षा जुन्यातलं आजही काय लागू होतं किंवा ते नव्या रूपात लागू करता ये ईल का याचा विचार करणं आणि काळानुसार बदलणं खरच इतकं अवघड आहे का! आल्फ्रेड नोबेल यांनी डायनॅमाईट सारख्या विनाशकाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की एकीकडे संशोधनातून जगाला विध्वंसाची साधने उपलब्ध करून देणारे नोबेल आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून हादरले, बदलले, इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल पारितोषिक..विशेषत: शांततेसाठी, जगविख्यात आहे. म्हणजे माणसात अगदी आमूलाग्र बदल होणं सुद्धा अशक्य नसतं. बदलाच्या लाटांमुळे थोडी खळबळ होईलही पण अथांग काळाबरोबर वाहत चाललेलं माणूसपणाचं तारू भरकटणार नाही एवढं नक्की. असा विचार केला तर जगणं सुखकर आणि आयुष्य सुंदर होईल. त्यासाठी मागच्या ,आजच्या आणि सळसळत्या वयातल्या उद्याच्या पिढीनही एकमेकांना इतकच सांगावं, ’कुछ तुम चलो, कुछ हम चले, दूरियां यों मिटाते चलें’.

Friday, November 20, 2015

जनरेशन गॅप - परदेश


’आजीबाई आजीबाई थकलात का? नेटवर नातवाला भेटलात का?
मुलांना शिकवून केला गुन्हा (!), परदेशी गेल्या लेकी सुना
नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हाऊन जा
नातवाने वाचला नन्नाचा पाढा, रिकामा राहिला आजीचा वाडा’
या विषादपूर्ण ओळी व्हॉट्स ऍप वर वाचल्या. सहानुभूती साहजिक आजीच्या वाट्याला जाते आणि आजची पिढी- मुलं, सुना, नातवंडं दुष्ट ठरतात. खरं तर कुठलीच पिढी सरसकट काळी किंवा पांढर्‍या रंगाची नसते. मागच्या पिढीला येथेच सोडून परदेशी गेलेले सगळेच निष्ठूर, कृतघ्न वगैरे नसतात.

एका स्नेह्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला, संशोधन केले आणि पुढे लग्न करून तेथेच स्थायिक झाला. सुरूवातीला ते मुलाच्या प्रगतीचे गोडवे गाताना थकत नसत कारण मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होताना बघणे हेच प्रत्येक पालकाप्रमाणे त्यांच्याही आयुष्याचे ध्येय होते. त्यातले अप्रूप आणि नावीन्य ओसरल्यावर आणि विशेषत: पत्नी निवर्तल्यावर त्यांना एकटे वाटू लागले. मुलाने तिकडे राहण्यास बोलावले परंतु तिथले हवामान, तिथली संस्कृती याच्याशी जुळवून न घेऊ शकल्याने ते भारतात परतले आणि एकटे राहू लागले. काही नातलगांनी ’एवढं शिकवलं मुलाला पण संस्कार तेवढे करायचे राहिले, आता घ्या’, ’आपल्या देशासाठी काही करायला नको, नुसती डॉलरची हाव!" वगैरे मुक्ताफळे उधळली. अशा नातलगांपैकी कित्येकांना परदेशी गेलेल्यांबद्दल असूया असते, आपल्याही मुलांनी परदेशी जावं असं स्वप्न असतं आणि नाहीच जमलं तर त्यांना एकदम ’देशप्रेम’ वगैरे आठवतं. आपल्याकडेही स्वेच्छेने किंवा नाईलाजाने गावी राहणारे आईबाप आणि शहरात स्थायिक झालेली पुढची पिढी हे चित्र काहीसे असेच नाही का! भारतात राहणारे सगळेच आपल्या देशासाठी काही महान कार्य वगैरे करतात का? कित्येक जण इथेच आयुष्य घालवूनही मॉल संस्कृतीचे गुणगान करीत येथील प्रत्येक गोष्टीला नाके मुरडत असतात. आजच्या काळात नवनवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, वैश्विक अनुभव घेण्यासाठी परदेशी जाणे म्हणजे पाप नाही. अर्थात आजन्म तिथे राहून स्वत:ला अकारण श्रेष्ट समजणे आणि स्वदेशाला नावे ठेवणे नक्कीच गैर आहे.

 'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात अपर्णा वेलणकर यांनी मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. विदेशात व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर परत आलेले अनेक जण भारतातील लाल फीतीच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला कंटाळून पुन्हा परदेशी जातात. आपल्या समाजात अनेक रुढी,परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते त्यामुळे काहींच्या पत्नीचा परत येण्याला विरोध असतो. तिकडे जाऊन लोक संस्कृती विसरतात असाही एक आक्षेप घेतला जातो. ते तिकडे पूर्ण समरस होऊ शकत नाहीत आणि इकडे पुन्हा स्वीकारले जात नाहीत. एक अनुभव वाचनात आला, त्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका स्त्रीला तिच्या भारतातल्या आईने सुचवलं, "दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस." त्यातल्या त्यात तिथे भारतीय सणवार एकत्र येऊन साजरे करून भारतात नसल्याची उणीव भरून काढण्याचा ते आपल्या परीने प्रयत्न करतात. भारतीय कार्यक्रमांचे, कलाकारांचे तिकडे आवर्जून स्वागत करतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली नाळ देशाशी जोडून ठेवतात. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत त्यांच्यामुळे भर पडत राहते. अनेक परदेशस्थ भारतीयांनी येथील अनेक सामाजिक प्रकल्पांना भरघोस मदत दिलेली आहे. ती घ्यायला आणि त्यांच्यातल्या कुणाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला की लगेच ते ’भारतीय वंशाचे’ आहेत म्हणून श्रेय घ्यायला मात्र आपण तयार असतो.

थोडक्यात परदेशी गेलेल्या सगळ्यांना एक तर नायक नाहीतर खलनायक ठरवण्याची टोकाची मानसिकता आपण बदलायला हवी. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या देशाचे काही देणे लागतो की नाही! निश्चितच. विशेषत: येथील आयआयएम, आयआयटी सारख्या अनेक नामांकित शिक्षणसंस्थातील विद्यार्थी त्या संस्थांचा शिडीसारखा उपयोग करतात आणि परदेशी निघून जातात. या पिढीने हे विसरता कामा नये की येथील सवलतींचा फायदा घेऊन मिळवलेल्या विशेष ज्ञानाचा देशाला उपयोग करून देणे त्यांचेही कर्तव्य आहे. ते त्यांनी इथे राहून पार पाडावे अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथून. आजच्या पिढीत हे भान जपणार्‍यांची संख्या हळूहळू वाढते आहे ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्रेनड्रेनच्या प्रश्नाचा सुवर्णमध्य साधणार्‍यांची, परदेशात जाऊन उच्चशिक्षण आणि अनुभव घेऊन, जगाच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देऊ शकतील असे फॅशन, वैद्यकीय क्षेत्रा पासून सौर उर्जेपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी परतणार्‍यांची संख्या वाढते आहे. (संदर्भ: इकॉ. टाईम्स २४-१-१५) ’स्नॅपडील’ या वेबसाईटद्वारा येथील रोजगारनिर्मितीत भर घालणार्‍या रोहित बन्सल आणि कुणाल बहल सारखे, अनेक परदेशस्थ भारतीय तरूण विवीध उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी मायदेशाची निवड करू लागले आहेत. स्वदेशाबद्दलची बांधीलकी केवळ देशात राहूनच जपता येते आणि तरच देशप्रेम सिद्ध होते असे नाही तर देशासाठी असे काही तरी केल्यामुळे सिद्ध होते.

प्रत्येक दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आता पंचक्रोशी किंवा प्रांत ओलांडण्यापुरता उरला नाही तर सातासमुद्रापार पोचला आहे. वेलणकरांनी म्हटल्यानुसार जागतिकीकरणाची अपरिहार्यता म्हणून पुढच्या पिढीच्या रूपाने स्वदेश-परदेशाच्या निवडीचा संघर्ष तुमच्याही आयुष्यात रोरावत येईल तेव्हा मूल्यसंस्कारांची मुळे घट्ट रोवून त्याला आनंदाने आणि खुल्या मनाने सामोरे जायला हवे. 

Friday, October 16, 2015

जनरेशन गॅप -वाचन


’वाचनाने मला काय दिले’ या विषयावर खास पालकांसाठी आयोजित एका निबंध स्पर्धेचे परिक्षण करण्याची मला संधी मिळाली. सगळ्या निबंधांमधे एक समान धागा होता तो म्हणजे आजची पिढी पुस्तकांशिवाय ’घडते’ (!) आहे याबद्दलची खंत आणि अस्वस्थता. कवी गुलजार हीच खंत व्यक्त करताना म्हणतात..
 "जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी,
लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय.

यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. हे खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही. पुस्तकातल्या माहितीचा ज्ञानात आणि ज्ञानाचा ’शहाणीवेत’ हळूहळू रूपांतरित होत जाणारा सुंदर प्रवास, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली अनुभवता येत नाही. आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. त्यात दोन धोके आहेत, मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. यावर जर पालक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले तर या माध्यमांच्या मदतीने कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो.

 आजीआजोबांनी मुलांना गोष्टी सांगण्याची प्रथा विभक्त कुटुंबांबरोबर कमी होत गेली आहे. एकत्र कुटुंबांमधेही आजीआजोबांना आता टीव्ही मालिका पाहायच्या असतात. ज्या आजीआजोबांना आजही नातवंडाच्या बौद्धिक विकासासाठी काही करावसं वाटतं त्यांच्यात आणि नातवंडांमधे तंत्रज्ञानाच्या मार्‍यामुळे खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आपोआप येणारे वाक्प्रचार, म्हणी, जुने शब्द याला नातवंड मुकतायत. शब्दकोडी सोडवणं, वर्डगेम्स अशा प्रयोगातून शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर त्या शब्दातून उमटणार्‍या चित्रांवर, गीतांवर, निसर्गावर, पर्यावरणावर प्रेम करायला मुलं आपोआप शिकतील. मात्र त्यांच्या बालसुलभ कुतुहलाला आपण संवादातून प्रोत्साहन द्यायला हवं.

 परंतु आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलांशी बोलायचं केव्हा! ती सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात. या संदर्भात जेनेल हॉफमन या अमेरिकन आईचं उदाहरण वाचनात आलं. मुलाला तिने मोबाईल बरोबर एक १८ कलमी नियमावली दिली. मुलांनी फोन कसा, किती, कुठे, का वापरावा याची ती जणू आचारसंहिताच होती. अशी काळजी घेतली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे पुढे उद्भवणारे प्रश्न आधीच निकाली निघून त्याचा सकारात्मक वापर होण्याच्या शक्यता वाढतील. मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांच्या तंत्रप्रेमाचा उपयोग करून त्यांना ई-बुक्स, ऑडीओ बुक्स ची ओळख करून द्यायला हवी. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. awesomelibrary.org ह्या साईटवर इंग्रजी तर मराठी आणि हिंदीत हा खजिना उपलब्ध आहे arvindguptatoys.com या साईटवर. भारतीय पात्र असणा-या कथांसाठी pitara.com ही साईट उत्तम आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर http://www.britishcouncil.org/kids हा वाचनिय आणि माहितीपूर्ण बालविभाग आहे. (संदर्भ:पालकनीती) पण हे सगळं घडून यायचं असेल तर पालकांनी आधी स्वत: तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी. तंत्रज्ञान आणि मुलं ही जोडी फोडणं आता अवघड आहे पण पालकांना त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं प्रयत्नांती शक्य आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीक सारख्या वाहिन्यांवरचे साहित्यातही न सापडणार्‍या अनेक विषयांवरचे दर्जेदार माहितीपट मुलांसह पालकांनी आवर्जून बघावेत. वाचनापासून दुरावलेल्या मुलांच्या वैचारिक कक्षा रूंदावण्याचे इतर पर्याय शोधणे आता भाग आहे. ’आमचा मुलगा अजिबात वाचत नाही हो’ अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं की ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी त्यांना एक महिन्याने पुन्हा बोलावले आणि मग त्या मुलाला गोड खाणे बंद कर असे समजावून सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की हे तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली आणि मग त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला". मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी पालकांनी स्वत:ला विचारावं, आपलं वाचन whatsapp च्या मेसेजेस पुरतं मर्यादित आहे, पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! घरातील वातावरण वाचनाला पोषक असेल तर मुलं आपोआप पुस्तकांकडे वळतील. मात्र त्यातूनही ती वाचत नसतील तर किमान त्यांना वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचायचा आग्रह करायला हवा. ते ही होत नसेल तर आपण त्यांना त्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, त्यावर मुलांसमोर सोप्या भाषेत चर्चा करू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो.

 आईने मुलाला झोपवताना गोधडी पांघरली काय आणि ब्लॅंकेट पांघरलं काय, खरी उब त्या पांघरूणापेक्षाही तिच्या स्पर्शात असते. मुलांच्या वाचनाच्या प्रश्नाकडे, वाचनाच्या बदलत्या माध्यमांकडे आता आपण याच दृष्टीने पाहायला हवं. जगातलं उत्तमोत्तम साहित्य डिजीटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागलं आहे. भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा पुस्तक वाचनाचा खरा हेतू तर निखळ आनंद हा त्याचा आणखी एक फायदा. छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक सारखं डिजीटल माध्यम (अर्थात अतिरेक टाळून) त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो मुलांपर्यंत पोचला म्हणजे झालं. -

Friday, August 21, 2015

जनरेशन गॅप - अपरात्री ऑनलाईन


"हे ’ऑनलाईन’ म्हणजे नेमकं काय असतं ग?" नात्यातल्या एका वयस्कर बाईंनी अचानक विचारलं. "ऑनलाईन म्हणजे ’आपण आत्ता नेटवर्क वापरत आहोत’ याची खूण. का हो काकू!" "काही नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या नातीचं ठरलेलं लग्न मोडलं. आपला होणारा नवरा रात्रीबेरात्री ऑनलाईन असतो का हे तपासायला तिची नात स्वत: ऑनलाईन गेली म्हणे, झालं भलतच, इतक्या रात्री ऑनलाईन असणारी मुलगी ’चांगली’ नसणार या कारणाने त्या मुलाने लग्नाला चक्क नकार दिला" "अरेच्चा, पण मग तो मुलगा स्वत: अपरात्री ऑनलाईन होता त्याचं काय!" "खरय, पण शेवटी ’मुलीच्या जातीला’ कळायला पाहिजे नं !" इति काकू.

 पिढ्या बदलल्या तरी एक गोष्ट फार संथ गतीने बदलते आहे, ती म्हणजे समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर. मुळात महत्वाचे काम असल्याशिवाय अपरात्री मोबाईल वापरणे योग्य नाही, मग वापरकर्ता कुणीही असो. परंतु ’बाईच्या जातीने’ मोबाईल वापरला की पारंपरिक विचारसरणीच्या मंडळींच्या कपाळावर आठी पडते. मागे उ.प्रदेश चे एक खासदार सैनी यांनी मुक्ताफळे उधळली होती, "मुलींना मोबाईल वापरू देऊ नका. आमच्या आईबहिणींनी मोबाईल वापरला नाही, त्यांचे कुठे काय बिघडले!" बाघपत पंचायतीने तर मोबाईलमुळे मुली पळून जाऊन लग्न करतात तसेच त्यांचे संसारातले लक्ष उडते ,त्यामुळे ’४० वर्षांखालील स्त्रियांनी मोबाईल वापरू नये’ असा अचाट फतवा काढला होता. त्यानंतर म.प्र तील एक खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले होते, "लग्नाआधी मुलींना मोबाईल दिला तर त्या मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे." माध्यमातून टीका झाल्यावर या मंडळींनी मग सारवासारव केली हा भाग वेगळा. मुळात मुली लग्न करायला एकट्या तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच या सगळ्या उदाहरणात त्या मुलींसह ’मर्यादा’ वगैरे ओलांडणारी मुले ही आहेत. ती मात्र या मोबाईलबंदी पासून मुक्त आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वेडापायी तरूण पिढी वेळेचा अपव्यय करते आहे,

मानवी तासांचा हिशेब केला तर देशाचाही वेळ अनुत्पादक कामात वाया घालवते आहे. त्यातून शारिरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या देखील वाढत आहेत हे सारे खरे असले तरी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. जेनेल हॉफमन या अमेरिकन आईने आपल्या टीनएजर मुलाला मोबाईल देताना तो कसा, केव्हा, कुठे आणि किती वापरावा याबद्दल एक आचारसंहिताच करून दिली होती. असे काही उपाय करायचे सोडून सगळ्या समस्यांचे खापर फक्त मुलींच्या मोबाईल वापरावर फोडणे कितपत योग्य आहे? ’तिखट झाला चहा आणि कालवण झालं गोड सासू म्हणते सुनेला तुझ्या ’व्हॉट्सअप’ ला उठू दे फोड’ अशा अर्थाच्या थोड्या खोचक, थोड्या मिश्कील ओळी सध्या मोबाईलवर फिरत आहेत. खरं तर लग्नानंतर संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रियांना या मोबाईलमुळे थोडा मोकळा श्वास घेता येतो आहे. शाळा-महाविद्यालयामधलं दुरावलेलं मैत्र पुन्हा जोडता येतं आहे. घरची-बाहेरची कामं, पैपाहुणा, सणवार, मुलं, त्यांच्या activities, स्वत:चं लहानमोठं करियर या सगळ्याशी ती आजही ’कनेक्टेड’ आहे, उलट या चाकोरीतही एक नावीन्य, चैतन्य, आत्मविश्वास तिला जाणवतो. मुलांच्या प्रश्नांना पटकन मोबाईलमधे पाहून उत्तर देणारी स्मार्ट आई आता जाहिरातींमधून दिसते. मोबाईलच्या नादात डाळ करपावी किंवा कामे विसरून जावी एवढी ती बावळट नक्कीच नाही. ’आमच्या वेळी नव्ह्तं असलं काही फॅड’ असं तिला म्हणणारी मागची पिढी आज स्वत: मात्र टीव्हीला खिळून बसलेली असते. त्यांच्या काळी या गोष्टी उपलब्धच नव्ह्त्या तर त्यात त्यांच्या संयमाची परीक्षा आली कुठे? आजच्या पुरूषांच्या बाबतीत तर, गोष्टीतल्या जादूगाराचा प्राण जसा पोपटात असायचा तसा त्यांचा मोबाईलमधे असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोबाईल विना जगू शकणारे पुरूष अपवादात्मक तसेच मोबाईलच्या अगदीच आहारी गेलेल्या स्त्रियाही अपवादात्मक. स्त्रिया तंत्रज्ञानाचा, विशेषत: मोबाईलचा वापर करतात तेव्हा संपर्काचे, माहिती मिळवण्याचे, माणसांशी जोडले जाण्याचे, सुरक्षिततेचे आणि काही अंशी आत्मनिर्भर होण्याचे जणू आयुध त्यांना लाभते.

परंतु स्त्रीचं स्वत:चं विश्व असणं ही कल्पनाच मुळात समाजाच्या पचनी पडत नाही. बहुतेक स्त्रिया नवर्‍याने नवा मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल वापरताना दिसतात, अर्थात तिने कायम त्यागमूर्ती, वात्सल्यमूर्ती, संसाराचा कणा असणं हेच अपेक्षित असतं. असावं ना! पण तिला स्वत:चीही स्पेस असायला हवी की नको! मोबाईलमुळे स्त्रीचे संपर्कक्षेत्र वाढते, तिचे पतीवरील अवलंबित्व बरेचसे कमी होते याने काही पुरूषांचा अहंकार दुखावतो. वरवर स्त्रियांच्या प्रगतीच्या वल्गना केल्या तरी समाजाला मनातून ’जात्यावर बसून ओवी गाणारी नऊवारीतली सात्विक स्त्री’ ही प्रतिमा सर्वात जास्त भावते. अशा वृत्तीबाबत ना.ग.गोरे म्हणत, "या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं". एकूणच या चित्राला तडा जायला लागला की बर्‍याच घरातून तिच्या मोबाईल वापरावर तिरकस टीका होऊ लागते, समाजातले स्वघोषित नैतिक पहारेकरी स्त्रियांवरील मोबाईलबंदी सारखे आचरट उपाय शोधू लागतात.

 फ़ोक्सवॅगन ची एक सामाजिक जाहिरात आहे. जाहिरात सुरू होते ती सिनेमागृहात प्रेक्षक येऊन बसत असतानाच्या दृश्यासह. पड्द्यावर सिनेमा आधीची जाहिरात सुरू होते, त्यात फ़ोक्सवॅगन चालवणारे स्टिअरिंगवरचे हात तेवढे दिसतात, प्रेक्षक श्वास रोखून बघू लागतात, गाडीचा वेग वाढतो, आता गाडी नुसतीच सुसाट पुढे जात राहते. एव्हाना कंटाळलेले प्रेक्षक चुळबूळ करू लागतात. आपापला मोबाईल काढून सगळे त्यात डोकावू लागतात आणि अचानक जोरात आवाज येतो, पड्द्यावरील गाडीचा अपघात झालेला असतो. खाली मेसेज येतो, ’वाहन चालविताना मोबाईल वापरणे धोक्याचे आहे.’ खरं तर वाहन चालवतानाच नव्हे, आपल्या उद्देशांकडे, सुंदर जगण्याकडे, उत्तम पालकत्वाकडे आपला प्रवास सुरू असताना देखील मोबाईलचा अतिवापर हितकारक नाही हे सांगणारी ही जाहिरात सर्वांनाच लागू होते. फक्त स्त्रियांना नव्हे. -

Friday, July 24, 2015

जनरेशन गॅप - पोशाख


"डोईचा पदर आला खांद्यावरी.. भरल्या बाजारी जाईन मी.." असं म्हणणार्‍या संत जनाबाईंनी तत्कालीन समाजातील स्त्रीच्या पेहरावाबद्दलच नव्हे तर तिच्या एकूण वर्तनाबद्दल असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलं. अर्थात यामुळे परिस्थिती फारशी बदलली नाही. पाश्चात्य पोषाख घालायचा नाही ही नवर्‍याची अट कटाक्षाने पाळण्याच्या बदल्यात पहिल्या महिला डॉक्टर, आनंदीबाई जोशींना तर अमेरिकेतील थंडी असह्य होऊन क्षयरोगामुळे स्वत:चा जीव गमवावा लागला. आता असे जाचक नियम काहीसे शिथील झाले असले तरी अजूनही मुलींच्या/स्त्रियांच्या पेहरावाकडे मागच्या पिढीचेच नव्हे तर सबंध समाजाचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.

 निर्भयावरील बीबीसी ने केलेल्या वादग्रस्त माहितीपटात आरोपीच्या वकिलानी जी काही मुक्ताफळे उधळली त्यात त्यानी आजच्या मुलींच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर आणि राहणीवर आक्षेप घेतला होता. त्याने आरोपीचे समर्थन करताना म्हटले होते की समाजाने घालून दिलेली चौकट ओलांडणार्‍या मुलीच अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आहेत. त्या वकिलाच्या मानसिकतेचा वरवर जोरदार निषेध होत असला तरी आतून कुठेतरी बहुसंख्य लोकांचे तेच मत आहे. अशा स्वरूपाचे विधान दोन वर्षापूर्वी कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने देखील केले होते. या मध्ययुगीन काळातील विचारांना विरोध करण्यासाठी, ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच, त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले होते. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा स्त्रियांनी त्या मोर्चात वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला. आपल्याही समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न समजलेल्या काही मूर्ख प्रसिद्धीलोलुप स्त्रियांमुळे, संस्कृती आणि अब्रू जपण्याच्या भितीने समाज सरसकट सर्वच स्त्रियांच्या पेहरावावर अंकुश ठेवू पाहतो. या बाबतीत पुरोगामी राहायचे की प्रतिगामी ह्याबाबत भारतीय समाज गोंधळलेला आहे. उदा: सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट्स घालणेच योग्य आहे, जलद हालचालींसाठी तोच पोशाख सोयिस्कर आहे हे भारतीय मनाला एव्हाना पटले आहे. (अर्थात तिलाही मौलवींच्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावेच लागले होते) पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात पर्यटनाला आलेल्या परदेशी तरूणींनी सुटसुटीतपणा या निकषाखाली तसा पोशाख घातला तर त्यांचा हेतू ’शरीरप्रदर्शन’ असा मानला जातो. (आठवा ’अतिथी देवो भव!’च्या सरकारी जाहिराती)

मग निदान ’भारतीय पोशाखातील’ मुलींना तरी बिनधोकपणे संचार करता यायला हवा, पण ते तसेही नाही. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ बराच गाजतो आहे. त्यात एक भारतीय वेशातील तरूणी दिल्लीमधील गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकटी चालत जाते. नंतरच्या क्लिप मधे तीच तरूणी पाश्चात्य पोशाखात त्याच ठिकाणांवरून चालत जाते. दोन्ही केसेस मधे छुप्या कॅमेर्‍याने टिपलेल्या, तिच्याकडे बघणार्‍या नजरा, शेरेबाजी यात फारसा काही फरक नसतो. अभारतीय पोशाखामुळे स्त्रिया आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचाराला बळी पडतात या समजुतीला छेद देणारा हा व्हिडीओ आहे.

 मध्यंतरी एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यांना त्यांच्या इंजिनीयर मुलीसाठी एक चांगलेसे स्थळ कळले होते आणि मुलामुलीने एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा कार्यक्रम दोन दिवसावर येऊन ठेपला होता. तिचे वडील म्हणत होते, निदान त्या दिवशी तरी साडी नेस. मुलीचे म्हणणे होते, लग्न ठरले तर लग्नात पारंपरिक विधी करताना नक्की नेसेन मी साडी. एरवी मी जशी असते आणि जशी दिसते तसच त्यांनी मला स्वीकारावं, त्या प्रसंगापुरते स्वत:ला उगाच कृत्रिम रूपात दाखवणे ही उलट त्यांची फसवणूक नाही का! मग आई पुढे आली, "अगं, साडी कशी भारदस्त दिसते, भारताच्या मंगळमोहिमेतील अनेक शास्त्रज्ञ स्त्रियांचे फोटो जगभर झळकले, साडीच नेसलेली होती ना त्यांनी. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या कितीतरी उच्चपदस्थ स्त्रिया आवर्जून साडी नेसतात." मुलगी उत्तरली, " माझा विरोध साडीला नसून साडी नेसण्याच्या सक्तीला आहे. काळानुरूप गैरसोयीचे म्हणून पुरूषांनी धोतर केव्हाच टाकून दिले. साडी तर त्याहून लांबलचक आहे. बहुसंख्य भारतीय स्त्रियांची जीवनपद्धती अतिशय कष्टाची आहे आणि त्यांच्यासाठी साडी हा पोशाख गैरसोयीचा आहे, त्या नाईलाजातून त्याची सवय करून घेतात. त्यातूनही काही स्त्रियांना असेल आवड तर त्यांनी नेसावी, पण ते त्यांनी ठरवावं, इतरांनी नव्हे." आता मात्र तिच्या आजीला राहवले नाही, त्या म्हणाल्या, "ते काहीही असलं तरी साडी हा भारतीय संस्कृतीतला सर्वात सभ्य पोशाख आहे, त्यातच बाई शोभून दिसते" यावर नात म्हणाली," आजी, पुण्यात शंभर वर्षांपूर्वी सकच्छ (कासोटा घालून नऊवारी) आणी विकच्छ (आजची पाचवारी साडी) असा वाद रंगला होता तेव्हा आज ज्या साडीला तू सभ्य वगैरे म्हणतेयस ना, तेव्हाच्या समाजाने हीच पाचवारी साडी नेसणार्‍या स्त्रियांना उच्छृंखल, कुळबुडव्या, वाया गेलेल्या वगैरे म्हटलं होतं. आता ते किती हास्यास्पद वाटतं!

कशाला सभ्य आणि कशाला अयोग्य म्हणायचं हे शेवटी काळाच्या कोणत्या तुकड्यावर उभे राहून आपण त्या गोष्टीकडे पाहतो ना यावर अवलंबून असतं." याचा अर्थ मुलींनी सर्रास तोकडे कपडे घालून फिरावे असा मुळीच नाही, तर त्या त्या परिस्थितीनुसार सोयीचा, सुखकर आणि आरामदायी पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. अर्थात करियर करताना, मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, सामाजिक समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. मात्र पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे योग्य आहे ना, ज्या पार्श्वभूमीवर आपण तो पोशाख घातला आहे त्याने काही औचित्यभंग तर होणार नाही ना याचे भान स्त्री असो वा पुरूष दोघांनाही असायला हवे. समाजस्वास्थ्याची जबाबदारी स्त्री इतकीच पुरूषांची देखील आहे.

Friday, June 12, 2015

जनरेशन गॅप - वानप्रस्थाश्रम


’पुलं आजोबा’ हा प्रख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीपर्यंत पोचवणारा नवा कार्यक्रम. अलिबागला तो नुकताच पाहून आलेली मैत्रिण अगदी भारावून गेली होती. वाचनाच्या वाटेला फारसं न जाणार्‍या आजच्या पिढीला पुलंचा निखळ विनोद, त्यांनी निर्माण केलेली पात्र अनुभवता येतील याचा आनंद तिच्या शब्दांतून ओसंडत होता. आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होण्याचं भाग्य पुलंना लाभलं याचं श्रेय त्यांच्यातल्या दर्जेदार साहित्यिका बरोबरच त्यांच्या चिरतरूण वृत्तीलाही द्यायला हवं. पुलं आज हयात नाहीत. त्यांनी १९७९ साली त्यांच्या एका स्नेह्याला स्वत:च्या एकसष्टीच्या निमित्त्याने पत्र लिहीलं होतं. ’उतारवयात देखील जगाकडे किती उत्फुल्ल मनाने पाहातं येतं’ याचीच ग्वाही हे पत्र देतं.

 कालपरत्वे शरीर कुरकुरू लागणार पण त्याचा परिणाम नात्यांवर होता कामा नये याचं भान असलेले पुलं त्या पत्रात म्हणतात, " पिको हे मस्तक.. दुखोत गुडघे...मैतरीचे धागे..जैसे थे...’ त्यांच्या मिश्कील शैलीत ते पुढे म्हणतात ,"वयाबियाचे हिशेब इतिहास संशोधकांनी ठेवावेत, आपण नव्हे. ’हल्लीची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही’ अशी रडगाणी काय कामाची. खरं तर हल्लीच्या मोगर्‍यालाही, आपले नाक चोंदलेले नसल्यास, कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍या इतकाच छान वास येतो. उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघणे टाळायची गरज नाही."

 अपवाद वगळता किती ज्येष्ठांना हा मोगर्‍याचा सुवास घ्यावासा वाटतो! उन्हातले सोने शोधण्याची नजर असते! आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत एवढ्या भांडवलावर आजच्या पिढीला नाके मुरडण्यातच कित्येकांचा वेळ वाया जातो. अनुभवाची व्याप्ती कालसापेक्ष असली तरी त्याची खोली व्यक्तीसापेक्ष असते हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हा अनेकांचा परवलीचा शब्द असतो. आज जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. प्रत्येक पिढीची एक आगळीवेगळी लय असते. ती ज्येष्ठांनी समजून घ्यायला हवी. प्रत्येक पिढीची एक बंडखोरी असते. ती उमजायला हवी. खरं तर आजच्या पिढीला स्मार्टफोनचे जितके आकर्षण आहे तितकेच त्या पिढीला रेडिओचे होते.

सैगलचा ’देवदास’ पाहिलेली पिढी दिलीपकुमारच्या ’देवदास’ला नावे ठेवत होती. दिलीपकुमारचा ’देवदास’ पाहिलेली पिढी मधली पिढी शाहरूख खानच्या ’देवदास’कडे पाहून डोक्याला हात लावते. त्यापुढची पिढी अभय देओल च्या ’देव डी’ च्या माध्यमातून देवदासचे आधुनिक रूप पाहते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची आस्वादक्षमता आणि योग्य, अयोग्य हे निकष बदलत जातात. आजच्या तरूणाईची वेगवान जीवनशैली आणि मागच्या पिढीचे काहीसे संथ आयुष्य काही सामाईकता राहत नाही आणि पिढीमधील अंतराचे पीळ वाढत जातात. यावर उपाय म्हणजे या अंतराची अपरिहार्यता समजून घेणे आणि काळानुसार स्वत:ला बदलवणे. मात्र हे सोपे नसते. निवृत्त झाल्यावर देखील अनेक ज्येष्ठांच्या डोक्यातून पदाचा रूबाब जात नाही. मग ते घरच्या ज्युनिअर मंडळींना हुकूम सोडू लागतात. कित्येक ज्येष्ट स्त्रियांना स्वयंपाकघराचा ताबा सोडवत नाही. हात पूजेत पण मन मात्र संसारातच गुंतलेलं असतं. राजकारणा सारख्या क्षेत्रात तर निवृत्तीचे अधिकृत वय नाही. त्यामुळे कितीतरी जुनी खोडे तरूण कार्यर्त्यांना संधी द्यायला अजिबात तयार नसतात. कित्येक संस्थांचे प्रमुख वयोवृद्ध झाले तरी संस्थेवरची आपली पकड आणि पद सोडायला तयार नसतात, नवीन पिढीच्या वेगाशी जुळवून तर घेता येत नसते. मग संस्था डबघाईला जाऊ लागतात. अशा ज्येष्ठांचे खरे तर हसे होत असते. ’कुठे थांबावे’ हे आजच्या पिढीला कळत नाहीये असा आरोप करताना ते जुन्या पिढीला तरी नीटसे कळले का याचा त्यांनी विचार करावा.

या ’थांब्या’ बद्दल पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, "परिवार आणि समाजाचा 'सांधा' म्हणजे वानप्रस्थाश्रम. ' वन ' शब्दाचा अर्थ आहे ' वन्यते सेव्यते इति वनम्। ' वृक्षांचे वन असते. वृक्ष सेवेची दीक्षा देतो. वृक्ष शिकवतो की स्वत: मोठे व्हायचे असते आणि दुसऱ्यासाठी पण काम करायचे असते. माझे अस्तित्वसुद्धा दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वृक्ष स्वत: मोठा होतो, व्यापक होतो आणि नंतर नि:स्वार्थ भावाने लोकांना छाया देतो, फळे देतो. केवळ शांती नव्हे विश्वशांती देतो म्हणून वृक्ष हा सेवेचा आदर्श आहे. वृक्षाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे." या संदर्भात इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे उदाहरण आठवल्याशिवाय राहत नाही. आयटी सर्व्हिसेसमधली, आज जगात पंधराव्या क्रमांकावर असलेली कंपनी स्वकर्तृत्त्वावर उभी करणार्‍या मूर्ती यांनी विशाल सिक्का यांच्या नेतृत्त्वाखाली एक उत्तम टीम तयार केली. गतवर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, सारा मानमरातब सोडून, सारी सूत्रे नव्या टीमच्या हाती सोपवली. इन्फोसिस फाऊंडेशनचे काम बघणार्‍या, सेवाभावी वृत्तीच्या ’सुधा’ या पत्नीसह नातींच्या सहवासात मूर्ती रमले आहेत. भारतीय संस्कृतीतील वानप्रस्थाश्रमाची व्याख्या आज खर्‍या अर्थाने जगत आहेत.

असे घडते तेव्हा
 ’पाव सुखे हुए पत्तो पे अदब से रखना.. धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी..’
 ही जाणीव अशा ज्येष्टांबाबत नवीन पिढीमधे सहज रूजते. त्यांना सन्मान मागावा लागत नाही, आपसूकच मिळतो.

Friday, May 22, 2015

जनरेशन गॅप - काळजी


‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असं कवी केशवसुत म्हणाले होते. मुलांपलीकडे जणू दुसरे जगच नसलेले आजचे बहुसंख्य पालक पाहून म्हणावेसे वाटते, ह्या विश्वाचा पसारा आपापल्या मुलांपुरता कारण मुलं हेच पालकांचं विश्व. स्टेशनवर एका आठवड्याच्या उन्हाळी शिबीरासाठी निघालेली १०-१२ वर्ष वयोगटातील तीसचाळीस मुलं, त्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे आईवडील आणि आयोजकांची टीम असा मोठ्ठा घोळका जमला होता. कुणाचे तरी वडील मुलाच्या बुटाच्या नाड्या नीट बांधून देत होते. एक आई मुलाला समजावत होती," एनर्जी बार दिलेत, जेवण आवडलं नाही तर सरळ ते खा हं". दुसरी तिच्या मुलाचे हात सारखे सॅनिटायझर लावून पुसत होती. बहुतेक आईवडील मुलांना कुरवाळत सतत सूचना देत होते, आयोजकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. गाडी हलल्यावर धास्तावलेल्या मनाने पालक पांगले. मुलं शिबीरस्थानी पोचल्यावर अनेक पालक "मुलांशी फोनवर बोलू द्या" म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.

 खरं तर ’घराच्या सुरक्षित कोषाबाहेरच जग’ मुलांना समजावं, त्यांना निसर्ग अनुभवता यावा, नवे मित्र मिळावे, स्वत:ची काम स्वत: करायला शिकता यावी, ’शेअरिंग’ म्हणके काय ते कळावं, त्यांच्यातले सुप्त कलागुण त्यांना जाणवावे यासाठी ही शिबीरं असतात. आईवडिलांनी मुलांचं बोट सोडलच नाही तर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता या मुलांमधे कशी निर्माण होणार? मुलांबद्दल प्रेम असणं, काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण त्याचा अतिरेक मुलांचं मोकळेपण, बालपण हिरावून तर घेत नाही ना! पाल्यांचे अती लाड त्यांच्या धोका पत्करणाच्या मूलभूत क्षमतेला मारक तर ठरत नाहीयेत ना!.
 आजोळी सुट्टी घालवणार्‍या मागच्या पिढीतील बहुतेक घरे अभावग्रस्त असायची तर काही समृद्ध, कित्येक वडिलांना आपलं मूल नक्की कोणत्या इयत्तेत शिकतं हे देखील माहीत नसायचं. हे जरी समर्थनीय नसलं तरी तेव्हा समाधानाच्या कल्पना बर्‍याचशा सारख्या असत त्यामुळे त्या पिढीला खेळत बागडत बालपण मनमुराद उपभोगता आलं. उन्हाळी सुट्ट्या लागल्या की मिळेल त्या वस्तूचं खेळण्यात रूपांतर करणं, धडपडत सायकल शिकणं, आमरसाचा एकत्र आनंद घेणं, पुस्तकं वाचणं, रात्री पत्त्यांचे डाव मांडणं आणि अनायासे लॉजिक शिकणं, गच्चीत बिछाने पसरून चांदणं भरल्या आकाशाकडे पाहात पाहात दमून डोळे मिटणं यातल्या सुखाला आजच्या पिढी पारखी झाली आहे. यात त्यांचा दोष नाही, शेवटी काळ आणि ’सुखाची व्याख्या’ या दोन्ही बदलत जाणार्‍या गोष्टी आहेत. परंतु मूल्य तर शाश्वत असायला हवीत. मुलांच्या निकोप वाढीला आजच्या पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच मारक तर ठरत नाहीये ना !

मुलांच्या बाह्यव्यक्तिमत्व विकासासाठी पंचतारांकित शिबीरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ’घडवण्यावर’ भर देणारी सेवांकुर, निर्माण यासारखी किंवा संघासारख्या संस्थांची बालशिबीरे याचाही पालकांनी विचार करायला हवा. यातून मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्व परिपक्व व्हायला खरी मदत होईल. एका कार्यक्रमात येथील एक प्रसिद्ध उद्योजक सांगत होते, "सध्या माझी मुलं महाविद्यालयात शिकतायत. मला व्यवसायात थोडी मदत देखील करतात. सहसा आम्ही ए.सी. प्रथम वर्गाशिवाय प्रवास करत नाही परंतु आकस्मिक कारण उद्भवल्यास किंवा आवश्यकतेनुसार मी त्यांना तिसर्‍या वर्गाने देखील लांबचे प्रवास करायला लावतो. त्यांचे त्या प्रवासात खरे समाजशिक्षण होते. सुखसोयींची किंमत, कष्टाचे महत्व, गरज आणि चैन यातला फरक समजतो, ’माणसं’ कळतात, समाजात जगण्याचे किती स्तर आहेत ते कळतात, संवेदनशीलता वाढते".
 "पण मुलं एखाद्या वेळेस अडचणीत सापडतील याची भीती नाही वाटत का", असे विचारताच ते म्हणाले," आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना भीती कसली. उलट मुलं स्मार्ट होतात. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रांडेड कपडे किंवा सफाईदार इंग्रजी नाही. स्मार्टनेस म्हणजे निर्णयक्षमता, समयसूचकता, व्यवहारकुशलता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली नाही तर त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल कसे! मग ती आपली म्हणजे पालकांची चूक ठरेल. या सगळ्यामुळे उद्या मोठं झाल्यावर, जगताना, स्वतंत्रपणे व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं तयार होतील." 

Friday, May 8, 2015

जनरेशन गॅप - विज्ञान


"भगवान की लीला" सांगणारा एक मेसेज आला, त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल असही लिहीलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अ‍ॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप(!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा. "ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस असं आई म्हणाली" असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टाईलिश राहणीवरून, चटपटीत वागण्य़ावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्य़ावरून. वृत्ती आणि विचारांनी देखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोन बाळगणारी असती तरच त्यांना खर्‍या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धीवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठेतरी कमी पडली असावी का!

 आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्य मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकीत्सेची भिती असते ती फक्त अंधश्रद्धेला, खर्‍या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ’उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे ’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असाय़ला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. पाकिस्तानसारख्या देशात तर धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की त्याची परिणीती जिहादी तरूणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढ्त्या संख्येत होताना दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍र्‍या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.

 या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स कॉंग्रेसच्या एका परिसंवादात राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’ पासून ते आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव तार्‍याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ’सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वला संदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्य़ापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी तरूणांमधे वैज्ञानिक दॄष्टीकोन विकसित करायला हवा. भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्य़ासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवांशासह त्या नावेस बुडविल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग वर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्ती सांगड घालण्य़ाचा तरूणाईचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा "खरा सनातन धर्म कोणता,' हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, "हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.'

 भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपी च्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोनावर ही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर ती सुद्धा एक देशसेवाच ठरेल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठिण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करणे आणि त्यांची उत्तरे शोधण्य़ासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या पालकांनी केलं तरच इतिहासासारखे आपले भविष्य देखील अभिमान बाळगावा असे घडेल. 

Friday, April 24, 2015

जनरेशन गॅप - अलिया आणि आयक्यू


आजच्या पिढीची स्मार्ट सिनेतारका, ’अलिया भट्ट’ वरून केलेला विनोद कुणीतरी आपल्याला (आणि साधारणपणे आपणही कुणालातरी) पाठवल्याशिवाय सध्या कित्येकांचा दिवस मावळत नाही. एक बरय की हे विनोद निखळ असतात, अश्लील नसतात, फक्त तिच्या बुद्धूपणाची खिल्ली उडवणारे असतात. या विनोदांना हसताना आपला बुद्ध्यांक तिच्यापेक्षा किती बरं उच्च आहे हे जाणवून वाचणारा आतून खूष होतो. मुळात ही आजची अभिनेत्री विनोदाचा विषय ठरली ते एका वाहिनीवरील ’कॉफी विथ करण’ या शोमुळे. यात प्रश्नांच्या फैरीला उत्तर देताना, पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या अचाट 'सामान्य ज्ञाना'ची झलक दाखवली होती. तिच्यावर ’मूर्खशिरोमणि’ असा शिक्का बसायला हे निमित्त झाले. आता किमान देशाच्या राष्ट्रपतींचं नाव तिला माहीत असायला हवं होतं हे निर्विवाद. मात्र केवळ स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नाही आणि 'टीका सकारात्मकपणे, खिलाडूवृत्तीनेही घेता येते' हे दाखवून देण्यासाठी आलियाने तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा ’जीनीयस ऑफ द इयर’ हा एक झकास व्हिडिओ पोस्ट केला आहे. ’ब्रेन जिम’ च्या मदतीने ती तिचं सामान्यज्ञान चांगलच वाढवते हे यात अगदी गमतीदार पद्धतीने दाखवलय. तरीही ’तिला माहीत नाही’ असं काहीतरी या जगात शिल्लक राहतच असा या व्हिडीओचा मार्मिक शेवट, बुद्ध्यांकाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीवर शब्दांवाचून भाष्य करतो.

आयुष्य़ प्रसन्न मनाने जगण्यासाठी त्यात थोडा विनोद हवाच परंतु अलियावरच्या विनोदांच्या निमित्त्याने आपला बुद्ध्यांक किती आहे हे विशेषत: आजच्या पिढीने तपासून पाहायला हवं. स्मरणशक्तीला कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, प्रतिभा आणि विवेक यांची जोड असेल तरच ती सर्वंकष बुद्धीमत्ता. ह्याची जाणीव नसलेली मुलं केवळ घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवतात आणि पालकांसह समाजही त्यांना बुद्धीमान मानू लागतो. इतर चार पैलूंचे ज्ञान नसले तर ही मुलं यशाचं सातत्य राखू शकत नाहीत. आजच्या शिक्षणपद्धतीत केवळ विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅटिकल स्किल्स) विकसित करण्यावर भर असतो. एकाग्रतेचे कौशल्य (अटेन्शन स्किल्स), सर्जनशीलता वाढवणे, चिंतन-मननाची कौशल्ये याकडे लक्ष दिले जात नाही. या कौशल्यांशिवाय व्यवहाराचा आणि यशापयशासह जगण्याचा तोल सावरता येणे कठीणच.

 मध्यंतरी एका स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला. मुलं निमशहरी भागातली पण चुणचुणीत वाटली. त्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. बहुतेक उत्तरं मुलांनी अचूक आणि त्वरित दिली. बरे वाटले, मग सहज त्यांना विचारले,’ ’नक्षलवाद’ म्हणजे काय?’ एकदम शांतता पसरली. जेमतेम एकदोन मुलांनी ’सरकार अन्याय करतं त्याला विरोध’ अशी ढोबळ उत्तरं दिली. उद्या करियर करताना या मुलांना चर्चा, मुलाखती, ग्रुप डिस्कशन्स याला सामोरे जावे लागेल. तिथे बाजी मारण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी नाही तिथे खर्‍या बुद्धीमत्तेचा कस लागेल तेव्हा रोजचे वर्तमानपत्र देखील वाचायचा कंटाळा असलेली ही मुलं त्याला कसं तोंड देणार ! मोबाईलचे नवनवे मॉडेल्स आणि ऍप्स सहजतेने हाताळणार्‍या तरूणाईला बरेचदा अनेक मुलभूत गोष्टी माहीत नसतात. ’पेपरमधे छापून आलय ना! मग ते खरच असलं पाहिजे’ असा मागच्या पिढीचा भाबडा समज असायचा. आजच्या पिढीतील अनेकांचा ’इंटरनेट वर असलेलं सगळं शंभर टक्के अचूक असतं’ असा समज आहे. सर्च इंजिन हा फक्त माहिती पर्यंत पोचवणारा दुवा आहे हे लक्षात घेतलं जात नाही. ’गुगल’ वापरून सामान्यज्ञान उत्तम असण्याचा आभास
म्हणजे चांगला बुद्ध्यांक नव्हे. गुगल किंवा एकूणच तंत्रज्ञानाची मदत घेण्यात गैर काहीच नाही परंतु त्याला व्यासंगाचा, विचारांचा पाया हवा. अन्यथा ही मुलं बरेचदा वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात अयशस्वी ठरतात, वैफल्यग्रस्त होतात. ह्याला जबाबदार आहे ’हुशारी’ ची तोकडी व्याख्या.

 मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित असतो असे मानले जाते. तरीही मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची मदत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते असे या क्षेत्रातले एक तज्ञ डॉ. आनंद जोशी सांगतात. सखोल वाचन, बहुश्रुतता, पर्यटन, वेगवेगळ्या कलांचा आस्वाद, विशेष प्रशिक्षण अशा अनेक मार्गांनी या दोन्ही मेंदूंना चालना दिली जाऊ शकते. हे सगळे केवळ व्यावसायिक यशासाठी करायचे नसून निखळ बौद्धिक आनंदासाठी आणि जगणं सुंदर करण्यासाठी करायचे आहे. तेव्हा विनोदांवर हसता हसता, आपल्यातही एक ’अलिया भट्ट’ लपलेली असते, तिला शोधून काढून तिचा बुद्ध्यांक वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करायला हरकत नाही.

Friday, March 27, 2015

जनरेशन गॅप - अभिरूची


एका संगीतविषयक कार्यक्रमात प्रसिद्ध सिंथेसायझर वादक सत्यजीत प्रभू मागील पिढ्यांपासून आजच्या पिढीपर्यंत संगीतात होत गेलेल्या बदलाबद्दल बोलत होते. सहवादकाने त्यांना म्हटलं, "मेलडी हरवत चाललीय, हल्लीच्या कित्येक गाण्यांचा ’राग’ कोणता हे देखील ओळखता येत नाही, आता ’लुंगी डान्स’ चा राग कुणाला ओळखता तरी येतो का? त्यावर प्रभूंचं उत्तर होत, "मला येतो ना! ....राग ’अनावर’ ". यातला गमतीचा भाग सोडला तरीही आजच्या पिढीच्या कलेबाबतच्या..विशेषत: जनमानस व्यापणार्‍या संगीतकलेबाबतच्या अभिरूचीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहतं.

 असं म्हणतात की साहिर लुधियानवी चित्रपटासाठी गीतलेखन करताना संगीतकारापेक्षा एक रूपया जास्त मानधन घेत असत. गाण्यात सुरांइतकच किंवा त्याही पेक्षा शब्दांचं महत्व अधिक असं त्यांना वाटत असायचं. सिनेगीतातल्या ’काव्या’ला इतकी किंमत असण्याचा तो काळ केव्हाच मागे पडला. आता शब्दांवर सुरांचं केवळ आक्रमणच झालेलं नाही तर अतिक्रमण झालेलं आहे. हिंदी सिनेसंगीतात पंजाबी, इंग्रजी शब्दांच्या मधे आणि वाद्यांच्या दणदणाटात त्यातल्या काव्याला अगदी खालचं स्थान असतं. टॉलस्टॉयच्या मते कला माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा. कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे, जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. हा निकष अनेक टीकाकारांना मान्य नव्ह्ता. आजही तो संगीताच्या बाबतीत मान्य करायचा तर केवळ ठेक्यामुळे सर्वसामान्यांना (मासेस) चटकन भावणारी हिंदीत धुमाकूळ घालणारी ’मुन्नी, फेविकॉल, शीला’ वगैरे प्रकरणं आणि मराठीतली त्याची ’कोंबडी, रिक्षावाला’ वगैरे रूपं महान कलाकृती म्हणून गणली गेली असती. या विरोधी टीकाकारांच्या मते कलाकृती व्यवस्थित कळायला आस्वादकाची तेवढी पात्रता व तयारी असायला हवी आणि म्हणूनच खालावलेल्या अभिरूचीबद्दल फक्त आजच्या पिढीला दोष देता येणार नाही.

आजच्या पिढीचा ’कान’ आणि ’डोळे’ तयार करण्याची जबाबदारी या आधीच्या पिढीची होती. परंतु ८० च्या दशकापासून ’उमराव जान, बाजार’ सारख्या चित्रपटांचे अपवाद सोडले तर सिनेसंगीताचा दर्जा उतरणीला लागला. संगीत नाटकं जवळपास बंद झाली, शास्त्रीय संगीताची समज आणि रसिकांची टक्केवारी अधिकच उणावली. जागतिकीकरणानंतर वाढत गेलेल्या चंगळवादाचा परिणाम संगीतावरही झाला. बाजाराची मागणी तसा पुरवठा करण्याच्या नादात भाषेचा दर्जाही खालावत गेला. आज सोशल नेटवर्किंगवर कित्येकदा अगदी सुमार दर्जाच्या, ट ला ट जुळवणार्‍या कविता शेअर केल्या जातात, त्याला हजारो लाईक्स मिळतात. त्याचीच पुढे ’गाणी’ होतात. ती ’गाजतात’. आशयघन साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्याइतका वेळ आजच्या धावपळीच्या जगात आहे कुणाला! मैफिलींचा श्रोता म्हणून आनंद लुटण्याइतका निवांतपणा कुणाजवळ फारसा नाही. शिवाय आजच्या ’सबकुछ इन्स्टंट’ पिढीला लगेच ’बोssssर होतं’. कलेमधे गुणवत्तेपेक्षा, रियाजापेक्षा सादरीकरणाला अवास्तव महत्व आलं आहे. क्वचित एखादं उत्तम गाणं गायक उत्कटपणे सादर करत असतो आणि अचानक विंगेतून वेगाने एक नर्तकांची फौज येते आणि गायकाला घेरून नाचू लागते, रंगीबिरंगी दिव्यांची जोरात उघडझाप सुरू होते आणि या गदारोळात ते गाणं कुठेतरी हरवून जातं.

 पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये असा आग्रह धरणार्‍या क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्या भागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हल्ली त्याची जागा सवंग ’आयटम सॉंग’ ने घेतली आहे. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असा संकेत होता. दुर्दैवाने या कला(!) प्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरूवात केली आहे, ’नाही रे’ गटाने नव्हे तर गटनेत्यांनी ’आहे रे’ गटाच्या अभिरुचीच्या व्याख्यांना आव्हान द्यायला सुरूवात केली आहे. खरं तर एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी तिच्यातली नैतिक बाजू आणि पर्यायाने गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. या पार्श्वभूमीवर आजही जेव्हा एखादा अभिजीत पोहनकर ’पिया बावरी..’ सारखी दर्जेदार फ्यूजन कलाकृती निर्माण करतो, एखादे काळजाला हात घालणारे सूफी गीत कानावर पडते, ’बिलनच्या नागीनी; पलिकडे जाऊन आनंद शिंदे ’चल ग सखे पंढरीला’ म्हणतात, बालगंधर्व मधली ’चिन्मया सकल हृदया..’ सारखी रिंगटोन एखाद्या विशीतल्या मुलाच्या मोबाईलवर वाजते, विवीध वाहिन्यांवरचे लिटील चॅम्प्स तयारीने गातात, गुलजार, जावेद अख्तर सारख्यांच्या रचना, अमिताभ भट्टाचार्यचे ’रे कबीरा ....’ सारखे अर्थगर्भ गीत मनाचा ठाव घेते तेव्हा जाणवतं..सगळच काही संपलेलं नाही. अल्प प्रमाणात का होईना पण संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत आणि माध्यमांच्या मदतीने ते वेगाने सर्वदूर पोचत आहेत. पिढी बदलते आहे, आस्वादक्षमता बदलते आहे. ती जोपासायला हवी.

साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाटयसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कौशल्य निर्माण होते. लोकप्रियता आणि गुणवत्तेचा समन्वय साधला जाऊ शकतो. तेव्हा गरज आहे ती उमद्या कलाकारांना प्रोत्साहन आणि कलेतील प्रयोगांना दाद देण्याची, नवतेचा स्वीकार करण्याची आणि वैविध्यपूर्ण संगीतकलेचे संस्कार आजच्या पिढीवर करण्याची.

Friday, March 13, 2015

जनरेशन गॅप - कुटुंब


’उन उन खिचडी साजूक तूप.. वेगळं व्हायचं भारीच सुख’ अशी विसूभाऊ बापट यांची एक कविता आहे. विभक्त कुटुंबात हवं तसं जगता येतं असं ध्वनित करणारी. "हल्लीच्या पिढीला माणसं नकोत, आमच्या वेळी पंधरा वीस माणसं घरात असायची, आम्ही केलच ना सार्‍य़ांचं..., यांना मात्र कसलीच जबाबदारी नको, नुसतं स्वातंत्र्य हवं.. "असा काहीसा तक्रारीचा सूर मागच्या पिढीचा असतो. आजही कुटुंबसंस्था हा भारतीय जीवनपद्धतीचा कणा आहे त्यामुळे एकत्र कुटूंबाचं रूपांतर विभक्त कुटूंबांमधे होत जाणं हा समाजाच्या दॄष्टीने अतिशय संवेदनशील मुद्दा आहे.

 ग्रीक आणि भारतीय संस्कॄती काहीशा समकालीन पण ग्रीक संस्कृती लयाला गेली. याची कारणं शोधताना तेथील संशोधकांना असे आढळले की, कुटुंब व्यवस्था खिळखिळी झाली म्हणून ग्रीक संस्कृतीचा -हास झाला. म्हणजेच भारतीय संस्कृती टिकण्य़ामागे आपली कुटुंब व्यवस्था कारणीभूत आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधे अनेक वंशांचे लोक राहतात. या लोकांमध्ये भारतीय लोक सर्वात समाधानी आणि संतुलित असल्याचे आणि त्याचे कारण देखील भारतीय कुटुंब व्यवस्थेमधेच दडले असल्याचे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. एकूण तेथील वाढ्त्या एकल पालकत्वापेक्षा विभक्त (न्यूक्लीअर) का होईना पण कुटुंब असायलाच हवे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातले सर्वजण एकोप्याने जवळ राहत.फक्त सणासुदीला किंवा काही उत्सवाच्या निमित्ताने एकत्र न येता, दु:ख, संकटे, अडचणीत एकमेकांना साथ देत. आर्थिक बचत होई. वाटून घेण्य़ाची सवय होई, मुख्य म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होत असे बरेच फायदे सांगता येतील. पूर्वी शेतीप्रधान जीवनपद्धती असताना आणि माणसांची पोच पंचक्रोशीपर्यंत असताना हे सारे सहजसाध्य होते.

त्याच वेळी या कुटुंबपद्धतीचे अनेक तोटेही होते. या सगळ्य़ात अनेक जणांना वैयक्तिक महत्वाकांक्षांचा बळी द्यावा लागे, घरातल्या वडीलधार्‍या किंवा सर्वाधिक उत्पन्न असणार्‍या व्यक्तीच्या हातात सर्व सूत्रे असत. कमी उत्पन्न मिळवणार्‍यांना, किंवा स्वभावाने गरीब असणार्‍यांना मिंधे आयुष्य जगावे लागे, स्त्रियांचा मानसिक कोंडमारा होई. स्वत:च्याच नवर्‍या-मुलांसह मोकळेपणे वेळ घालवणे अशक्य असे. एकत्र कुटुंबासाठी धूरभरल्या अंधार्‍या स्वयंपाकघरात किलोकिलोच्या पोळ्य़ा करण्य़ात आपल्या आईचे आयुष्य करपून गेल्याची खंत लेखक जयवंत दळवींनी एका लेखात मांडली आहे. ती प्रातिनीधीक आहे. ’करियर’ हा शब्द व्यवहारात आल्यावर यानंतरच्या पिढीत भल्यामोठ्या कुटुंबांची आपोआपच लहान कुटुंब झाली. तेव्हाही दोन पिढ्यांमधे अशीच रस्सीखेच घडून आली.

आता तर ही लहान कुटुंबे अजून लहान होत चौकोनी किंवा त्रिकोणी झाली आहेत. साधारणपणे या स्थित्यंतरासाठी सरसकट आजच्या पिढीला जबाबदार धरलं जातं, त्यांना स्वार्थी, आत्मकेंद्री अशी दूषणं दिली जातात. खरच आजची पिढी अशी आहे का! या बदलाची बहुतेक कारणं परिस्थितीजन्य आहेत, वास्तव आहेत. कामापुरतं आईबापाला वापरून घेऊन मग त्यांच्याकडे पाठ फिरवणार्‍या, उतारवयात त्यांना वार्‍य़ावर सोडणा‍र्‍या काही कॄतघ्न मुलांच्या कहाण्य़ा बातम्यातून आपल्या समोर येतात, क्वचित आजूबाजूला दिसतात. मात्र अशी मुलं मागच्या पिढीत नव्हतीच का! तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातलं इतर कुणीतरी त्यांची जबाबदारी स्वेचछेने अगर नाईलाजाने घेत असे ,त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची राहत असे इतकच. मला वाटतं, माणसं प्रत्येक पिढीत तशीच असतात, चांगली आणि वाईट दोन्ही. बदल होतो तो दॄष्टीकोनात आणि परिस्थितीत. आता आर्थिक रेषेखाली जगणारी कुटुंबे कच्च्याबच्च्यांसह हातावर पोट घेऊन जमेल तसे आणि जमेल तिथे जगत असतात. धनिक वर्गात बहुतेक वेळा इस्टॆटीच्या वादामधून कुटुंब विभक्त होतात. मध्यमवर्गातले पालक मुलांना उच्चशिक्षण देऊन मग करियरसाठी परदेशात किमान महानगरात पाठवतात. इथून पुढे त्यांचे एकत्र राहणे अवघड होत जाते. भौगोलिक, सांस्कॄतिक फरक, जागेची अडचण, व्यक्तीस्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पना, जगण्य़ाची वेगवेगळी उद्दिष्ट्य़ अशी अनेक कारणं यामागे असतात. याशिवाय हेकेखोरपणा, आपली मते लादणे, संशयी, संतापी किंवा विचित्र स्वभाव असे स्वभावदोष सुद्धा संबंधांमधे वितुष्ट आणतात. असे प्रश्न किंवा दोष कोणा एकाच पिढीमधे नाही तर व्यक्तीसापेक्ष असतात, असे असताना फक्त आजच्या पिढीला खलनायक का ठरवले जाते! त्यापेक्षा यावर उपाय शोधले जावेत.

शहरांमधून काही सहनिवास खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधले गेले आहेत, वयस्कर मंडळींसाठी सुद्धा डॆ केअर सेंटर सुरू करण्य़ात आले आहेत. या सोयी नेहमीच परवडतील आणि रूचतील असे नाही, अशांना समवयीन गट करून एका जागी राहता ये ईल, आवडणार्‍या किंवा सामाजिक उपक्रमाला वाहून घेता ये ईल. ’वसुधैव कुटुंबकम’ हे सूत्र स्वीकारून आपला परीघ वाढवता येईल. आपल्या घरात, मुला-नातवंडात आनंदाने जगण्य़ाला सुख म्हणायचे की या बदलांना, हे त्या व्यक्तिच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मात्र पटॊ ना पटॊ, ही जीवनशैली येत्या काळाची अपरिहार्यता असणार आहे. पाळणाघरांच्या प्रमाणात वृद्धाश्रम पण वाढणारच हे एक कटू सत्य आहे. आज घरोघरी एक-दोनच मुले, ती आकांक्षांचे पंख लावून उडून गेली की रिकाम्या घरट्यात उरलेल्या दांपत्याला जगण्य़ाचे वेगवेगळे पर्याय खंत न करता खुल्या मनाने, उमदेपणाने स्वीकारता आले पाहिजे. अर्थात परिस्थिती अजून तरी टोकाला गेलेली नाही. शादी डॉट कॉमने केलेल्या सव्‍‌र्हेमध्ये असे दिसून आले आहे की समाजाच्या विविध स्तरांतल्या, विविध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे ५४ टक्के मुली आणि ५३ टक्के मुलांना एकत्र कुटुंबात म्हणजेच सासू सासरे किंवा आईवडीलांसह राहण्य़ाची इच्छा आहे. आजच्या काळातल्या मुलींना नोकरी करायची असते, वाढते खर्च बघता मुलांनाही बायकोने नोकरी करणे आवश्यक वाटते. मग या सुनांना आणखी जबाबदाऱ्या सांभाळणे शक्य नसते. लग्नानंतर मुलांना सांभाळणं हा मुद्दाही असतोच. अशी अनेक कारणं या निर्णया मागे असतील. सुनेकडून पारंपरिक अपेक्षा पूर्ण होणार नाहीत पण पालकांनाही आपल्या माणसात राहिल्याचा आनंद मिळेल, आधार मिळेल. तडजोडीच्या पार्श्वभूमीवर का असेना हे सर्वेक्षण दिलासादायक आहे.

 भावी पिढीच्या मनस्वास्थ्यासाठी तरी कुटुंबसंस्था टिकवायलाच हवी. हे आव्हान पेलतानाच एक लक्षात घ्यायला हवे की कुटुंब म्हणजे फक्त एका छताखाली राहणं नव्हे. कुटुंब म्हणजे एकत्र नांदणं. एकाच घरातल्या माणसांच्या मनांमधलं अंतर जर खूप असेल तर त्या एकत्र कुटुंबाला विभक्त मानायला हवं, याउलट भौगोलिक अंतर जास्त असूनही मनं जोडलेली असतील तर ते खरं एकत्र कुटुंबच. नाही का!

Friday, February 27, 2015

जनरेशन गॅप - फुलपाखरू


’चालत जायचं ????’ मिनू जवळ जवळ किंचाळलीच. काही कारणामुळे आज तिचे नेहमीचे रिक्षावाले येऊ शकणार नव्हते. बाबा-दादा आपापल्या कामाला आणि आईची गाडी दुरूस्तीला. त्यामुळे आई म्हणाली, "शाळा फार लांब नाहीये तशी, जा एक दिवस पायी. त्यातही मजा असते." पायी जाणे हा पर्याय असू शकतो हे मिनूच्याच नव्हे तर आजच्या पिढीच्या गावी नाही. अर्थात काही खेड्य़ातून आजही अनेक मुलं शाळेसाठी बरीच पायपीट करतात. त्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण काहीसं वाढत असलं तरी या प्रवासात मुलांचं नकळत जीवनशिक्षण आणि निसर्गशिक्षण घडतं. मात्र शहरी-निमशहरी भागातल्या आणि लगतच्या खेड्यातल्यादेखील जीवनपद्धतीतल्या बदलामुळे ही मुलं आता पूर्वीसारखी रमतगमत शाळा कॉलेजात जाऊ शकत नाहीत. वाहतुकीच्या सोयी असताना त्यांनी तसं करावं अशा अपेक्षाही नाहीत पण य़ा बदलांमुळे आणि एकूणच मुक्कामाला पोचण्य़ाच्या घाईमुळे अशा छोट्या प्रवासाबरोबरच जगण्याच्या प्रवासातल्या आनंदाला सुद्धा आजची पिढी मुकते आहे.

 आजच्या पिढीपाशी वेळ नाही. पूर्वीसारख्या तासंतास चालणार्‍या मैफली, वन्समोअर घेणारी संगीत नाटके या ऐवजी ऑडीओ क्लिप्स आल्या. क्रिकेटचे कसोटी सामने पाहायलासुद्धा वेळ नाही त्याचे २०-२० झाले, बातम्या सुपरफास्ट झाल्या, अन्नाचं फास्ट फूड झालं. यात त्यांचा दोष नाही, स्पर्धेत धावायचे म्हणजे वेळ दवडून कसे चालेल? कॉर्पोरेट क्षेत्रात ठराविक काळात दिलेलं उद्दिष्ट साध्य करणं बंधनकारकच नाही तर अनिवार्य असतं. यामध्ये त्या प्रक्रियेपेक्षा साध्यावरच सर्व भर दिला जातो. यातून शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होतात. एक उद्दिष्ट साध्य होते परंतु ते यश क्षणभंगुर ठरते कारण तोवर व्यवस्थापनाने दुसरे उद्दिष्ट दिलेले असते. हे चक्र संपत नाही. या सगळ्य़ात वेळेअभावी जगण्याचा दर्जा खालावत जातो, कलेची अभिजातता काहीशी कमी होऊ लागते. रिअ‍ॅलिटी शो च्या चकचकाटात कलेची खरी ओळख करून देणारे गुरू, कलेची साधना, रियाज, त्यातल्या सौंदर्याचा शोध, त्यासह होणारे सादरीकरण, त्यातून मिळणारा आनंद आणि वाढणारा सांस्कॄतिक दर्जा असे टप्पे पार करण्य़ाइतका वेळ ,उत्साह आणि समज फार कमी होत चालली आहे. या पायर्‍य़ांना कुणी यश मानायलाच तयार नाही. कला आणि क्रीडेच्या क्षेत्रासारखीच परिस्थिती शिक्षणक्षेत्रात आहे. विद्यार्थी गुणवत्तेच्या नव्हे तर गुणांच्या मागे लागले आहेत. कोणताही प्रकल्प करायचा तो झोकून देऊन नवे काही शिकण्यासाठी नाही, तर ग्रेड मिळवण्य़ासाठी. शिकण्याच्या आनंदापेक्षा महत्त्वाचे त्याचे उपयोजित मूल्य. यश म्हणजे जिंकणॆ, यश म्हणजे चषक, यश म्हणजे विजेत्याला मिळणारा अमुक रकमेचा धनादेश.

आजच्या पिढीची यशाची व्याख्या जगण्य़ापेक्षा बाजाराशी नाते सांगते.
’आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक
हाती येताच म्हणतो दाणा, नेऊन मला विक’ याला काही अंशी मागची पिढी जबाबदार आहे. मुलांनी सतत शिखरावर राहावे हा पालकांचा अट्टाहास याला कारणीभूत आहे. त्यांच्या हे लक्षात यायला हवं की शिखरावर सर्वांनाच जागा मिळत नाही. खाली राहणाऱ्यांची संख्या नेहमी जास्त असते आणि तोच समाजाचा मुख्य भाग असतो. समाज जर निकोप घडवायचा असेल तर वैयक्तिक यशाइतकेच किंबहुना अधिक महत्व सामुहिक आनंदाला देता आले पाहिजे. सतत यशस्वी होण्य़ाच्या वेगवान शर्यतीपेक्षा जगणं समृद्ध असणं जास्त आवश्यक आहे. ‘कामात तल्लीन होणे’ हे सुदृढ मनाचं लक्षण आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. (संदर्भ- पालकनीती) मग ते काम कोणतही असो. उत्तम श्रोता असणं, चांगला वाचक असणं, कलेचा रसिकतेने आस्वाद घेता येणं, निसर्गात रमता येणं, सामाजिक बदलांची जाण असणं, शिखरावर पोचलेल्या लोकांबद्दल निखळ भावना जपता येणं, खिलाडू वृत्तीने कौतुक करता येणं, स्वत:च्या क्षमता ओळखून आणि मर्यादा स्वीकारून मुक्त मनाने जगता येणं हे सुद्धा आयुष्याचं उद्दिष्ट्य असू शकतं, हे आजच्या पिढीला पालकांनी सांगायला हवं.

प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे म्हणत, मी जीवनाच्या जत्रेत रमणारा माणूस आहे. जगण्यातलं वैचित्र्य टिपत, वेगळेपण अनुभवत, आजूबाजूच्या गमतीजमती पाहत, वेगवेगळे प्रयोग करत, कधी स्वत:त मश्गूल होत तर कधी कुणाची सोबत करत मजेत जगता येतं हे अशी माणसं त्यांच्या निर्मितीतून आपल्याला सांगून जातात. इतरांचही जगणं समृद्ध करून जातात. एका मुलाला अंगणात फुलपाखराचा कोश दिसतो. त्यातला सुरवंट बाहेर पडण्य़ाची धडपड करताना दिसतो तेव्हा ते न पाहवून आणि त्याचं लवकर फुलपाखरू व्हावं या आशेने मुलगा कोश कापून टाकतो. सुरवंट बाहेर तर पडतो पण त्याचे पंख खुरटलेलेच राहतात. तो उडू शकत नाही. त्याची कोशाबाहेर पडण्याची धडपड ही त्या सुरवंटाची शक्ती वाढवण्य़ासाठी आवश्यक होती, तो टप्पा अनुभवताच न आल्याने त्याचं खर्‍य़ा अर्थाने फुलपाखरू झालच नाही. जगण्यातला टप्प्यांचा आनंद घेऊ न देता, घडण्य़ातली अनुभूती जाणवू न देता जेव्हा आजच्या पिढीला आपण स्पर्धेच्या नादात लवकर फुलपाखरू होण्य़ासाठी भाग पाडतो तेव्हा ती खरं तर खुरट्या पंखांची कीटकं होतात. त्या पंखांना स्वत:चे रंग लेवून विहरण्य़ातला आनंद आपण आता तरी देणार का?
 ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, February 13, 2015

जनरेशन गॅप - प्रेम म्हणजे


" किताबोसे जो जाती राबता था..आज टूट गया है.. लेकिन ..किताबे गिरने उठाने.. के बहाने जो रिश्ते बनते थे .. उनका क्या होगा.." कवी गुलजार सहज शब्दात एक वस्तुस्थिती सांगून जातात. आजच्या इंटरनेट युगात पुस्तकं आपल्याला दुरावलीत, साहजिक त्यांच्यामुळे जुळणारी नाजूक नातीही संपली. अर्थात ती नाती सोशल नेटवर्किंग, कॉलेजमधलं गॅदरिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून जुळत असतात पण पुस्तकांनी दिलेला भक्कम वैचारिक पाया या नात्याला कुठून मिळणार! कालच्या पिढीतल्या कित्येकांचं समंजस प्रेम नैतिक दडपणामुळे अव्यक्त राहिलेलं तर कित्येकांचं आर्थिक, सामाजिक तफावतींमुळे वडीलधार्‍यांनी अस्वीकृत केलेलं.

आजची पिढी या बाबतीत बिनधास्त आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड ,ब्रेकअप हे शब्द सर्रास वापरणारी. मात्र आजच्या पिढीला खरच ’प्रेम’ या शब्दाची उंची, खोली आणि व्याप्ती धड कळते तरी आहे का! प्रेमातला गोडवा, त्यातली हुरहूर, त्यातली असोशी आणि त्याचं गांभीर्य....यातलं किती झिरपतय आजच्या पिढीपर्यंत! ’प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमच आमचं सेम असतं’ असं कवी पाडगावकर म्हणतात. प्रत्येक पिढीची ’प्रेम’ ही भावना, गाभ्यामधे ’सेम’ असेलही पण प्रेमाकडे पाहण्याची पिढीनुसार बदलणारी मानसिकता समजून घ्यायची असेल तर चित्रपटगीतं ऐकावीत. ’छोड दो आचल, जमाना क्या कहेगा’ अशी तेव्हा धीट पण आता मर्यादशील वाटणारी प्रेमगीतं केव्हाच कालबाह्य झाली. ’बाहोमे आ सोणीये बस एक रात के लिये..तू मेरा हीरो’ अशी आजची गाणी आहेत. ’जनम जनम का साथ ’ वरून ’बस एक रात’ म्हणजेच ’चले तो चांद तक..नही तो शाम तक’ इथपर्यंत प्रेम या संकल्पनेची व्याख्या ठिसूळ होत जाताना दिसतेय. बॉयफ्रेंडने फेसबुक वरील त्याचे ’कमिटेड’ हे स्टेटस बदलून ’सिंगल’ असे केले. हा ’धक्का’(!) सहन न होऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीने मध्यंतरी आत्महत्या केली. आपण अपलोड केलेल्या फोटोला मिळणारे लाईक्स आणि ’कमेंट’ हा आता मुलांसाठी जणू जीवनमरणा इतका महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या हल्ल्यांच्या, मैत्रिणीच्या नकळत तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिला अंकित करायचे एक शस्त्र म्हणून तो वापरल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत.

या सगळ्यामागे कारण एकच.. प्रेम, मैत्री आणि शारिरीक आकर्षण या शब्दांमधल्या सीमारेषा अपरिपक्व वयातील मुलांना स्पष्ट समजलेल्या नाहीत. ते नातं तुटलं की त्याचे परिणाम अभ्यास, करियर, घर यावर तर होतातच पण त्या व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात. आजच्या पिढीला सांगायला हवंय की ’प्रेमात पडणं’ ही आयुष्यातली अत्यंत सुंदर आणि महत्वाची घडामोड असली तरी प्रेम म्हणजेच आयुष्य नव्हे. कवी संदीप खरे दोन ओळीत  प्रेमाचे सार सांगून जातात..
’प्रेमात म्हणे आरंभ गोड अन अंतापास विराणी
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी’
प्रेमाची पहिली पायरी त्यागाची असते. आयुष्यातल्या प्राथमिकता ओळखून मनाला जीवनाशी जोडण्याचे जे नैसर्गिक नियम असतात ते पाळले गेले तर ते खरे प्रेम. जिथे नकारात्मकता असते, प्रेम दूर जाण्याची सतत भिती असते, स्वत:मधल्या त्रुटी स्वीकारून नकार पचवण्याची ताकद नसते, ते प्रेम नाहीच असे अभ्यासक म्हणतात. मुलांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा, हे फक्त आकर्षण तर नाही? यात आपला स्वार्थ आणि अहंकार तर दडलेला नाही ना? प्रतिसादाचा अट्टाहास तर नाही? कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना साथ देऊ शकू का? नसाल तर पुढचं पाऊल टाकू नका कारण तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे अजून समजलेलं नाही.

 दोष फक्त तरूणाईचा नाही. प्रेम या कल्पनेभोवती माध्यमातील जाहिरातींच अर्थकारण केंद्रित झालं आहे. प्रेमाच्या वेष्टनात गुंडाळून जर एखादं उत्पादन बाजारात आलं तर ते हातोहात खपतं. साहजिकच आजच्या पिढीला आपल्या आजूबाजूला फक्त प्रेमाचं फास्टफूडसारखं ’इन्स्टंट’ स्वरूप दिसतय. पालकांनी मुद्दाम वेळ काढून माध्यमांवरून कोसळणार्‍या माहितीतून नेमके काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे मुलांना सांगायला हवे. पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिक शिक्षणाबाबत बोलायला संकोच वाटत असेल तर kidshealth.org सारख्या अनेक संकेतस्थळांची, वैद्यकीय तज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. बाहेरून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य ती माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली तर ’धोक्याची वळणं’ नीट पार करता येतील. मुलांमधे या वयात साठून राहिलेली प्रचंड उर्जा एखाद्या चांगल्या उद्देशाकडे, छानशा छंदाकडे वळवता आली तर बसता उठता प्रेमात पडण्यापेक्षा अधिक उदात्त ध्येय त्यांच्या आयुष्याला लाभेल. त्यातूनही प्रेमात पडलीच तर निदान ही मुलं या भावनेला पुरेशा गांभीर्याने समजू शकतील, कारण प्रेम नावाचं वादळ आयुष्यात काही परवानगी घेऊन येत नाही. मात्र त्यांना हे कळेल..की फक्त whatsapp वर एकमेकांना गुलाब पाठवण्याइतकं प्रेम सोपं नाही, उठसूट ’लव्ह यू, हेट यू’ म्हणण्याइतकं बालीश नक्कीच नाही.

प्रेम म्हणजे अनावर ओढ हे तर खरच पण तेवढच नाही, प्रेम एकमेकांचा आदर, प्रेम म्हणजे सन्मान, प्रेम म्हणजे काळजी, प्रेम म्हणजे एकमेकांच्या साथीने रूजणं आणि वाढणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे तपस्या.. आयुष्यातल्या एकेका अनुभवाबरोबर ही व्याख्या प्रगल्भ होत, बदलत जाते, त्याची अंतिम व्याख्या होऊ शकत नाही कारण ही भावनाच मुळी शब्दांच्या पलीकडली आहे.

Friday, January 30, 2015

जनरेशन गॅप - माध्यमं


सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते," तुला कितीदा सांगितलय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा मग खायचं". हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडीओ काढणा‍र्‍या किंवा त्या पार्श्वभूमीवर ’सेल्फी’ काढणार्‍या महाभागाच व्यंगचित्र देखील पाहण्य़ात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की गेल्या पिढीत मिडीया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी कोशिंबीरीएवढं होतं.

आताच्या पिढीचं तर आयुष्यच माध्यमकेंद्री झालेलं आहे. माध्यमांच्या या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यातील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे. (उदाहरणार्थ एके काळी रेडिओ ऐकणारा तरुण ‘वाया गेलेला’ मानला जात असे हे आज हास्यास्पद वाटते.) तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय हो ऊ शकतात हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळलं हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण लक्षात घ्यायला हवं.

१४५० साली गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश(telegraph) दूरध्वनी (telephone) व छायाचित्र (photography) असे तीन महत्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा,जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक ह्या महत्वाच्या घडामोडींमुळे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्य़ात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोचायला बराच कालावधी जावा लागला त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही, त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार तोवर थोडॆफार सामाजिक आणि सांस्कॄतिक धक्के बसणार. माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्य़ाच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं हा तोल सोपा नाही. मग व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडीया हा आधारच नाही का. कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी हे ’व्यक्त होणंच’ आहे. सोशल मिडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेट सारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरुन जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्य़ा विषयांवर ब्लॉग लेखन करण, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी हो ऊ लागली आहे.

 मागची पिढी अधिक वाचन करायची पण ती पिढी ’काय’ वाचायची हे ही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडीओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडल पर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोड्क्यात आज वाचनसंस्कॄती लोप पावत नसून बदलते आहे इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत. मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. बाईटस (त्वरित प्रतिक्रिया) देण्य़ाच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्य़ाचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ’काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या (अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ’देश’ म्हणून एकसंध राहण्य़ाऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्य़ात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी किंवा अगदीच बाळबोध पणॆ करणार्‍यांची संख्या वाढण्यात होते आहे.

 ही समज खर तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? त्यासाठी शालेय स्तरापासून प्रशिक्षण द्यायला हवे आहे. योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवायला हवी आहे. पारंपारिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देत आहेत, त्यांचे जतन होणे अतिशय महत्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडायला लागली असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्य़ाची जबाबदारी आता आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण हळूहळू सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
 ------------------------------------------------------------------------------------------------------

Friday, January 16, 2015

जनरेशन गॅप - करियर


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी यावर आधारित हा स्तंभ लिहीता लिहीता जाणवले, एकाच व्यक्तीच्या मनात देखील स्वत:च्या जीवनातल्या ट्प्प्यांबाबत अशी दरी असते. वयपरत्वे अनुभवांती आपल्या सवयी, आवडीनिवडी , आचार-विचार अगदी मूल्य आणि श्रद्धा देखील बदलत जाताना दिसतात. मग जर स्वत:तले बदल आपण सहजतेने स्वीकारत पुढे जातो तर पिढ्यांमधील अंतराकडे आपण सहज वृत्तीने का पाहू शकत नाही. पालक होतेवेळेस आपली जी काय वैचारिक- मानसिक घडण झालेली असते ,त्याच मुशीत आपण मुलांना बसवू पाहतो. खर तर कालांतराने आपण पुन्हा बदलतो आणि मागे वळून पाहताना ’तेव्हा आपलं जरा चुकलच’ असं वाटू लागतं, तोवर उशीर झालेला असतो.

 मुलांचं करियर हा आजच्या पालकांच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मुद्दा. स्वातंत्र्योत्तर पिढीला विनासायास नोकर्‍या मिळाल्या. पुलं च्या भाषेत सांगायचे तर, लोक एकदा का बँकेतल्या किंवा पोस्टातल्या नोकरीला चिकटले की तिथेच जन्म काढून मुलाला ’ग्रॅज्युएट’ करून आणि मुलीला ’उजवून’ घराला ’श्रमसाफल्य’ वगैरे नाव देणॆ हीच आयुष्य़ाची इतिकर्तव्यता मानत असत. मधल्या पिढीला त्यामानाने थोडा संघर्ष करावा लागला परंतु तोवर करियर हा शब्द अपवादानेच वापरला जायचा. आता मात्र तो परवलीचा शब्द झाला आहे. करियरची खरी व्याख्या, ’आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणॆ’ अशी आहे. व्यवहारात मात्र ’लठ्ठ पगाराची नोकरी किंवा भरपूर नफा देणारा व्यवसाय’ म्हणजे करियर असे गृहीत धरले जाते. "पैसा कमावणे हे ध्येय असू नये असे नाही, उलट ते अतिशय महत्वाचे आहे पण ते एकमेव ध्येय नसावे. आयुष्यात नाती, छंद, कला, वाचन, सामाजिक भान, पर्यटन एकूणच जीवनानुभवांना मह्त्व नसले तर माणसात आणि यंत्रमानवात फरक तो काय" असे सांगणार्‍या पोस्ट्स पालक वाचतात, फक्त फॉरवर्ड करतात. जावई निवडताना मात्र तो शक्यतो ’आयटी’ तला असावा याची ते काळजी घेतात आणि मुलगा भलत्याच क्षेत्रात जाऊ नये याचीही. त्यासाठी ते खूप कष्ट घेतात. त्या बदल्यात, दहावीपर्यंत मुलाने अबॅकस पासून स्केटींग पर्यंत सर्व क्लासेस करावे, शिवाय भरपूर मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेज मधे प्रवेश मिळवावा, मग एकामागून दुसर्‍या ट्य़ूशन ला धावावे शिवाय आय आय टी किंवा तत्सम परिक्षांची तयारी करावी, बारावीला त्याहून चांगले गुण मिळवून इंजिनीयर वा डॉक्टर व्हावे (आणि स्कॉलरशीप वर परदेशी जाता आले तर मग गंगेत घोडॆ न्हाले.) अशा त्यांच्या ’सामान्य’ अपेक्षा असतात. पालकांच्या दृष्टीने यात चूक काय! चूक एकच, मुलाची कुवत समजून न घेणे. या अपेक्षा पूर्ण न करू शकलेली एक खंतावलेल्या मनाची पिढीच्या पिढी त्यातून घडते आहे. इतर अनेक कला कौशल्ये या मुलांमधे असू शकतात पण साचेबद्ध अपेक्षांच्या चक्रात प्रवाहाविरूद्ध काही करण्य़ाचे त्यांना भय वाटू लागते. अशी ’हरलेल्या मनाची’ मुले मूठभर जिंकलेल्या(!) मुलांकडॆ असूयेने पाहत जमेल ते काम करत आयुष्य रेटत राहतात.

हे बदलायचे तर करियरच्या वेगवेगळ्य़ा पर्यायांचा पालकांनी मनमोकळा स्वीकार केला पाहिजे. आंतरिक सुख आणि भौतिक गरजा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुलांच्या हातात हात घालून केला पाहिजे. प्रख्यात विचारवंत जे. कृष्णमूर्ती पालकत्वाकडे अतिशय उंचावरून पाहतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील स्वत:ला कधी विचारतात का. आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. आपण मुलाकडे आपल्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून पाहाणं आधी बंद करू या. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. त्या नात्यातही सन्मानच असायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात, पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल अशी जीवनदृष्टी त्यांना देणे. त्या आधी ती पालक म्हणून स्वत:त निर्माण करणे. त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत.

अब्राहम लिंकन यांनी गुरूजींना लिहीलेल्या पत्रात फक्त क्रमिक नव्हे तर जीवन शिक्षण देण्याचं आवाहन केलं आहे. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगात प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याचीही जबाबदारी आहे, समाजाप्रती त्याला उत्तम बांधीलकी जपता यायला हवी, साहित्य कलेतही त्यानं रमावं, भरभरून जगावं इतका उदात्त विचार आपण ’पॅकेज’ या शब्दात अडकल्यामुळे करूच शकत नाही. आपण केवळ आजच्या समाजमान्य प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो. तुम्ही म्हणाल हे तत्त्वज्ञान मान्य असलं तरी शेवटी समाज ,’तुमचा मुलगा काय करतो’ हेच विचारणार ,’तुमचा मुलगा कसा आहे’ हे नव्हे, त्याचं काय? खरय, अशा वेळी पालक म्हणून आपण करायचं याचं उत्तर खलिल जिब्रानने त्यांच्या एका कवितेतून दिलं आहे...
 "तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा वाका आनंदानं ! बस इतकच !"