Tuesday, March 15, 2016

किताबे (भावानुवाद)

( गुलजार यांच्या ’किताबे’ या कवितेचा मी केलेला भावानुवाद)
मोहिनी 

पुस्तकं 

पुस्तकं.. बंद कपाटाच्या काचेआडून डोकावणारी
जगाकडे आसुसून बघणारी..  पुस्तकं 
आता महिनोन् महिने त्यांची भेट होत नाही.. माणसांशी
पुस्तकांच्या सान्निध्यातली प्रत्येक निवांत संध्याकाळ 
खिळलीय आता.. संगणकाच्या थंड पडद्यावर.
बेचैन.. अस्वस्थ झालीयत पुस्तकं.
ग्लानीत नकळत अवतरतात ..कपाटातून मेजावर
वाट बघत राहतात..आशेनं
कुणी तरी चाळेल.. हाताळेल म्हणून

ज्या गाथा गायल्या त्यांनी एके काळी
ज्यांनी भारलेलं असायचं सारं घर
त्याचा मागमूसही नाही उरला कुठे.
ज्यांच्या कथा असत..त्यात गुंफलेल्या
ती नातीसुद्धा आता छिन्नविछिन्न.. उसवलेली.
नकळत मी उलटलंच एखादं पान.. 
तर
ऐकू येतो त्यातून एक अनावर हुंदका.
शब्दांचे विखरून गेलेले मोती तेवढे घरंगळतात.. पानांवरून.
पर्णहीन फांद्यांसारखी.. ती शुष्क बोडकी अक्षरं
ज्यावर बहरतही नाही.. प्रतिभेची कोवळी पालवी
काचपात्रांच्या दिमाखापुढे
निष्प्रभ झालेल्या मातीच्या भांड्यासारखी
निरूपयोगी.. केविलवाणी
पुस्तकं !

पानं उलटताना जाणवणारी.. संमोहित करणारी
हरवली ती आगळीवेगळी चव.
आता बोटं फक्त क्लिक करतात...निमिषार्धात
अन उलगडत जातं एक अफाट विश्व.. संगणकाच्या पडद्यावर
पुस्तकांशी असलेलं ते नातं
उत्कट 
हळुवार
आपुलकीचं
संपलं...!!

वाचता वाचता निद्रेच्या कुशीत शिरताना
हृदयाशी बिलगलेली पुस्तकं
कधी मांडीवर घेऊन.. तन्मय होऊन.. अनुभवलेली पुस्तकं
तर कधी
नतमस्तक होऊन 
भान हरपून वाचलेली पुस्तकं.
हरवला.. त्यांचा तो अलवार 
स्पर्श

’ज्ञान’ वगैरे...  
आजही मिळवता येतंच की
पण 
त्या अवीट.. अबोल स्मृतींच्या पाकळ्या
पुस्तकातून जपलेल्या.. सुगंधी पानखुणा
पुस्तकं मागता घेताना, पडल्यावर हलकेच उचलून देताना
फुलत जाणार्‍या नवथर नात्यांच्या 
त्या नाजूक कळ्या
त्यांचं काय !! 
त्या कधीच उमलणार नाहीत आता
कदाचित.


No comments:

Post a Comment