Friday, January 22, 2016

स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची (अनुवाद)


स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची

ऐकलय का कधी
पुरूषांपेक्षा वेगळया..
अशा स्त्रीच्या भावविश्वाबद्दल....?

घर, प्रेम, समाज याशिवाय..
तिची स्वत:चीही जमीन असल्याचं
सांगू शकता तुम्ही...
एखाद्या स्त्रीला?

देऊ शकता
युगानुयुगे स्वत:चं घर शोधणार्‍या
एखाद्या अस्वस्थ स्त्रीला
तिच्या घराचा पत्ता?

कसं शक्य होतं असेल स्त्रीला
आपल्या भावजीवनात
रममाणं होणं..
अन त्याच क्षणी ते सारं पुसून टाकणं !
केलात विचार कधी..?

स्वप्नात एखादीमागे धावताना..
पाहिलत कधी तुम्ही तिला
नात्यांच्या युद्धभूमीवर..
स्वत:शीच लढताना?

शरीराच्या भूगोलापल्याड जाऊन
तिच्या मनाची गाठ उकलून..
जाणून घ्यावासा वाटला कधी...
तिच्या आतला.. उफाळणारा इतिहास?

वाचलात कधी
मौनाच्या उंबरठ्य़ाआड दडलेला
’ब्र’ उच्चारायाला आसुसलेला.. तिचा चेहरा?

तिच्यात वंशाचं बीज रूजवताना
अनुभवलत कधी..
तुमच्यामधे खोलवर विस्तारत..
सामावत गेलेल्या..तिच्या मुळांना ?

उमगलं कधी तुम्हाला
एका स्त्रीभोवती गुरफटलेलं..
नात्यागोत्याचं व्याकरण ?

उलगडता येईल तुम्हाला
एखाद्या स्त्रीला?
येईल का करून पाहता
एका स्त्रीच्या नजरेतून ...
’स्त्रीत्वा’ची व्याख्या?

आणि नसेल जमत यातलं काहीच..
तर
काय माहितीये हो तुम्हाला
एका ’स्त्री’बद्दल !!
शेजे आणि पेजेच्या गरजेपलीकडे..???

मूळ संथाली कवयित्री : निर्मला पुतुल
अनुवाद : मोहिनी मोडक

1 comment:

  1. I have read the original poem of Nirmala Putul. The translation has been done with great passion and authenticity.

    ReplyDelete