Tuesday, September 20, 2011

न्याय

’अजब न्याय’

कन्नड सिनेक्षेत्रातील यशस्वी अभिनेता दर्शन हा सध्या (पंचतारांकित) तुरूंगात ,जामीनाच्या प्रतीक्षेत आहे. बायको-विजयालक्ष्मीला भीषण मारहाण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीशी त्याचे संबंध असल्याच्या चर्चेमुळे पती पत्नीत या विषयावरील वाद विकोपाला गेला व त्याने बायकोला अक्षरश: झोडपून काढले. एवढेच नव्हे, याआधीही काही ना काही कारणावरून दर्शनने बायकोचा प्रचंड छळ केला होता. विस्मयाची बाब म्हणजे दर्शनच्या सिनेक्षेत्रातील मित्रमंडळींच्या दडपणामुळे याच अगतिक विजयालक्ष्मीने ’बाथरूममधे पडल्याने मार लागला’ असा जबाब दिला. तो स्वीकारला गेला नाही हा भाग अलाहिदा!
या कहाणीची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीवर दर्शनशी संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळे दर्शनच्या वैवाहिक जीवनातली ’शांतता व सौख्य’ भंग करण्याचे ’पाप’ निकीताने केले आहे असा ’निष्कर्ष’ कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने काढला. याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तिच्यावर ३ वर्षाची बंदी घातली आहे. या काळात तिला काम मिळणार नाही याची ही संघटना खबरदारी घेईल. तसेच तिला कोणताही खुलासा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाढते विवाहबाह्य संबंध हा सामाजिक चिंतेचा विषय जरूर असावा, पण निदान सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गात तरी त्यावर संबंधितांनी वैध मार्गाने तोडगा काढणे अपेक्षित असते. प्रेम, विवाह हा व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे, व्यावसायिक जीवनाचा नाही. दर्शनच्या आयुष्यातील किमान या दोन स्त्रियांचे उदाहरण बघितले तर बायकोवर नवर्‍याची हुकुमशाही लादली गेली आहे आणि निकीतावर समाजातील तथाकथित नैतिक पहारेकर्‍यांची दडपशाही. जर कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सला वैवाहिक सौहार्दाची एवढी कळकळ आहे तर दर्शनने याआधी बायकोवर केलेल्या अत्याचाराकडे डोळेझाक का केली गेली! निकीताशी त्याचे संबंध असलेच आणि हे गैर मानले तर तिच्याइतकाच दर्शनही दोषी आहे. मग त्याच्यावरही बंदी का घातली गेली नाही? मुळात असा एकांगी न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?

संकुचित भारतीय मानसिकतेचा विचार करता दर्शनवर बायकोला ’फक्त’ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.. त्यामुळे लोक हा प्रसंग विसरून जातील. तुरूंगातून सुटल्यावर दर्शन नव्याने चित्रपट स्वीकारेल, व चर्चेत राहिल्यामुळे कदाचित अधिकच यशस्वी होईल. निकीता बंदीच्या काळात विस्मृतीत जाईल. विजयालक्ष्मीचे भवितव्य तर आता अंधारातच आहे कारण तिने नवर्‍याविरोधात तक्रार करण्याचे भलतेच धाडस केले आहे. उच्चभ्रू(!) समाजातील ही घटना एखाद्या आदिवासी पाड्यावर किंवा दुर्गम खेड्यात, जातपंचायतीने पुरूषी निकषांवर त्याचा निवाडा करावा, अशाच पद्धतीची आहे. पाड्यावरील स्त्रीपेक्षा ’सौभाग्यवती’ विजयालक्ष्मी आणि ’वलयांकित’ सिनेअभिनेत्री निकीता यांची अवस्था वेगळी नाही.
मध्ययुगीन मानसिकतेच्या पट्ट्याने करकचून आवळलेले आधुनिकतेचे ढोल ,पुरूषी हातांनी आपण आणखी किती काळ वाजवणार आहोत!

No comments:

Post a Comment