धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्या त्या टपोर्या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढलं. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला सुझी म्हणूया. बॉयकट, सावळा वर्ण, स्कर्ट किंवा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्या या गोड गोबर्या, सुझीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे.
आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल, हाफ डे लागेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. सुझी फाटकात उभी राहून आमचे हे संवाद ऐकत हसत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे ये गायलोगको कही भी कायको बैठने देते रे, आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’.
तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास इदर नही चलेगा, वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती होगी खाना. बच्चो की पढाई पक्का वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.
मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. (एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती.)
रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्या बाजूने चढणार्या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून सुझी आम्हाला तोंडघशी पाडत असे. दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’.
रविवारी सुझी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. सुझीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. सुझी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)
आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला निगरगट्टपणॆ ’आप लोगोमे इतना चलता है’ म्हणत काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने खिन्न होऊन मला हे सांगितल्रं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. मी तर तिला घेऊन त्याच्याशी भांडायलाच निघाले पण ’वो सॉरी बोल भी दिया तो तु उसको अंदरसे बदल सकेगी क्या’ असा मला निरूत्तर करणारा प्रश्न टाकून तिने तो विषय संपवला. सुझीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगलं मुंबईचं स्थळ आलं. मुलाला जssरा टक्कल होतं पण शिक्षण, नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अच्छे आने के लिए करते है क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझं लग्न ठरलं तेव्हा महेश टकला नसल्याचं तिला हायसं वाटलं.
आता सगळे फोनवर. व्हॉट्सअॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की सुझी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की कोरोनाका काडा भी उससे अच्छा. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर !!" मग खिदळत पुन्हा विचारते , ’हाँ तो मै कहाँ थी..!!!.’
अपडाऊनचे दिवस
ReplyDelete