होम

Saturday, April 2, 2011

रंगायन

रंगायन

सप्तरंग शोभे इंद्रधनुवर
तनामनावर रंगधुंदी
रंग केवळ संवेदना नेत्रांची
की प्रकाशाची नजरबंदी ! ॥


रौद्र रूपाचा शौर्याचा रंग लाल
आरक्तसे गाल प्रेमरंगी
पिवळे केशरी विरक्त वैरागी
जीव़न निस्संगी त्यक्त त्यागी ॥


हिरव्या सृजनाची गतीची हाक
निसर्गाची साद पानोपानी
नभाची नीलिमा निळाच सागर
मनातला मोर नीलवर्णी ॥


मंद शांत पारवा शीतल श्वेत
सदा शुचिर्भूत धवलता
फुलते अबोली, गुलबक्षी कळी
कुसुंबी जांभळी कोमलता ॥


वसंत पालवी पोपटी कोवळी
शेंदरी झळाळी ग्रीष्म रती
चिंब वर्षासवे रंगे ओली मेंदी
शुभ्र कौमुदी शारदराती ॥


शिशीर गात्री पानगळ पिवळी
हेमंत नव्हाळी रोमरोमी
उत्सवाचे ऋतु होळी बहुरंगी
अवघे एकरंगी कोण मी! ॥


शैशवाचा रंग नितळसे पाणी
मन आरस्पानी खुललेले
तारूण्य झळकते लख्ख सोनेरी
वार्धक्य चंदेरी पिकलेले ॥


करडा अंधार अशुभ चाहूली
काळी बाहुली कवाडावर
काळ्यातच रंग सारे सामावले
काळा तीळ खुले गालावर ॥


उगवता सूर्य बदलती संग
सरडयाचे रंग माणसाचे
नसे बहिरंग न सगेसोयरे
परि गोड गरे फणसाचे ॥


आत्मरंग दीन जिथे वर्णभेद
माणूस लेक काळ्या आईचा
कर्पूरगौर राधेचा कृष्ण निळा
विठ्ठल सावळा जनाईचा ॥


सप्तरंग सप्तसूर एकरूप
विश्व रंगरूप विवीधांगी
ईश्वरी कुंचला सृष्टीचा सोहळा
जीव रंगांधळा अंतरंगी ॥

6 comments:

  1. एकदम कविता का बुवा ?
    ही तुझ्या शैलीतील वाटत नाही.

    ReplyDelete
  2. कविता मस्त आहे.पण तिला रंगायन हे नांव देण्यामागचे प्रयोजन कळले नाही.
    राजश्री

    ReplyDelete
  3. भाग्यश्री, शैली बिईली कसली आलीय गं, कवितेच्या प्रांतात उगाच जरा खुडबूड करतेय.

    ReplyDelete
  4. माझ्या माहितीप्रमाणे अयन म्हणजे बदल किंवा प्रवास असे आहे.

    ReplyDelete